कापूस पिकात सुरूवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे, फुलकिडे या या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. शेतकरी बांधवांनी कापूस पिकाबाबत नियमित सर्वेक्षण करून किडींचे योग्य निदान करून व त्यांची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन कपाशीवरील या रस शोषणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी खालील उपाय योजना आवश्यकतेनुसार अमलात आणाव्यात.
(१) कपाशी पिकात वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांद्या पाने इतर पालापाचोळा जमा करून किडीसह नष्ट करावा
(२) कपाशी पिकात आंतरमशागत करून पीक तणविरहित ठेवावे, त्यामुळे किडीच्या पर्यायी खाद्य तणांचा नाश होईल. कपाशीच्या बांधावरील किडीच्या पर्यायी खाद्य तनाचा उदाहरणार्थ अंबाडी, रान भेंडी, इत्यादी तणांचा नाश करावा
(३) कपाशी पिकात माती परीक्षणाच्या आधारावर शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे व नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा. त्यामुळे कपाशी पिकाची कायिक वाढ होणार नाही आणि पीक दाटणार नाही व पर्यायाने अशा पिकावर किडींचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात राहील.
(४) कपाशी पिकावरील रस शोषक किडी वर उपजीविका करणारे नैसर्गिक मित्र कीटक उदाहरणार्थ सिरफीड माशी, कातीन, क्रायसोपा इत्यादींची संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकाचा वापर टाळावा.
(५) कपाशी पिकात पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनाकरिता पिकाच्या समकक्ष उंचीवर पिवळे चिकट सापळे लावावे.
(६ ) कपाशी पिकावर रस शोषणाऱ्या किडी चा लक्षणीय प्रादुर्भाव आढळून आल्यास सुरुवातीला पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा Azadirechtin 0.03 टक्के निंबोळी तेल युक्त आधारित डब्ल्यू एस पी 300 पीपीएम 30 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
(६) वरील सर्व उपाय योजना चा अवलंब करूनही रस शोषण करणाऱ्या किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास म्हणजे सरासरी 10 रस शोषण करणाऱ्या किडी प्रतिपान किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात आढळल्यास गरजेनुसार खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी.
बुप्रोफेझिन 25 टक्के प्रवाही 20 मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा फ्लोनिकअमाईड 50% डब्ल्यू जी 3 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी किंवा फिप्रोनील 5% एस सी 30 मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा Diafenthiuron 50 टक्के डब्ल्यू. पी. 12 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी
या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन गरजेनुसार फवारणी करावी.
टीप : (१) वर निर्देशित बाबींचा वापर गरजेनुसार किंवा आवश्यकतेनुसार पीक निरीक्षणावर आधारित योग्य निदान करून आवश्यकतेनुसार आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन तज्ञांचा सल्ला घेऊनच वापर करावा.
(२) कीडनाशकांचा वापर किंवा रसायनांचा वापर लेबल क्लेम शिफारशीची शहनिशा करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे करावा
(३) अनेक रसायनांचे, अन्नद्रव्यांचे किंवा कोणत्याही बाबीचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी व प्रमाण पाळावे.
(४) फवारणी करताना सुरक्षित फवारणी तंत्राचा वापर करावा तसेच फवारणी करताना सुरक्षा किट वापरावा.
लेखक -
राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम
प्रतिनिधी गोपाल उगले
Share your comments