जेव्हापासून हरित क्रांतीची सुरुवात झाली तेव्हापासून शेतीमध्ये विविध प्रकारचे संकरित बियाण्यांचा वापर केला जाऊ लागला. परंतु या बियाण्यांच्या माध्यमातून जर जास्त उत्पादन हवे असेल तर रासायनिक खतांचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही.
तसेच यामध्ये तणनाशके, विविध रोगांच्या उच्चाटनासाठी कीटकनाशके यांची फवारणी करणे देखील आवश्यक असते. तसेच बऱ्याचदा शेतकरी बंधू एकच पीक वर्षानुवर्षे घेतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता खूपच कमी होते. तसेच या रासायनिक खतांच्या वापराच्या भाऊगर्दीत सेंद्रिय खतांच्या वापराकडे आपले पूर्णतः दुर्लक्ष झाले. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत जमिनीची सुपीकता राखणे फार महत्त्वाचे आहे. यासाठी जमिनीत टाकण्यात येणारा खतांचे योग्य रीतीने एकत्रीकरण करणे फार आवश्यक असून त्यासाठी एकात्मिक पीक पोषण व्यवस्थापन पद्धती उपयुक्त ठरते.
एकात्मिक पीक पोषण पद्धतीत नेमके काय केले जाते?
आपण जेव्हा उत्पादन वाढीसाठी पिकांना विविध प्रकारची रासायनिक खते, सेंद्रिय खाद्य, हिरवळीचे खते इत्यादी पिकांना पुरवतो. या पद्धतीत रासायनिक खतांसोबत सेंद्रिय खते, हिरवळीचे खते, जिवाणू तसेच सेंद्रिय द्रव्यांचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पूरक खाद्य म्हणून वापर करण्याच्या पद्धतीस एकात्मिक पीक पोषण पद्धती असे म्हणतात. तसेच या पद्धतीमध्ये जमिनीची सुपीकता टिकवणे याला प्राधान्य देण्यात येते त्यासाठी पिकांचे फेरपालट याला देखील तितकेच महत्त्व दिले जाते. पिकांची फेर पालट करण्यासाठी द्विदल पिकांचा समावेश केला जातो.
व्यवस्थित समजून घेऊ एकात्मिक पीक पोषण पद्धत
या पद्धतीमध्ये शेतातील पिकांना जेवढे अन्नद्रव्यांची एकूण गरज असते. त्या एकूण गरजेपैकी अर्धी गरज ही रासायनिक खतांच्या माध्यमातून भागविली जाते व उरलेली अर्धी गरज सेंद्रिय खतांमधून भागवली जाते. यामध्ये दर तीन वर्षाच्या नंतर शेतात हिरवळीचे खते घेतली जातात व जमिनीत गाडले जातात. यामध्ये जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविण्याकडे भर दिला जातो. त्यासाठी पिकांचे सर्व अवशेष म्हणजे ज्वारी सारखे पिकांचे धसकटे, गहू किंवा भात पिकाचे बुटके, सुर्यफूल पिकाचे खोड किंवा भुसा, डाळवर्गीय पिकांचे सर्व अवशेष जमिनीत गाडून सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवली जाते.
नक्की वाचा:Bamboo Cultivation: प्रश्नोत्तराच्या माध्यमातून समजून घ्या बांबू शेती
तसेच जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी बऱ्याच प्रमाणात जीवाणू खतांचा व गांडूळ खत यांचा वापर केला जातो. तसेच एकात्मिक पीक पोषण पद्धती मध्ये जर एखादी जमीन खारवटअसेल तरअशा जमिनीमध्ये भूसुधारक यांचा वापर करून अशा प्रकारच्या जमिनीची सुपीकता वाढविण्याचा प्रयत्न केला जातो.
एकात्मिक पीक पोषण पद्धतीचे फायदे
या पद्धतीमध्ये रासायनिक खतांसोबत सेंद्रिय आणि जैविक खतांचा देखील वापर केला जातो व पिकांना देण्यात येणाऱ्या एकूण खतांमध्ये समतोल साधला जातो. त्यामुळे एकात्मिक पीक पोषण पद्धत वापरल्यामुळे भरघोस उत्पादन तर मिळतेच परंतु जमिनीचा दर्जा देखील मोठ्या प्रमाणात सुधारतो. तसेच रासायनिक खतांसाठी शेतकऱ्यांचा जो काही अवाजवी खर्च होतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते. त्यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होते व जमिनीची सुपीकता उत्तम टिकते.
Share your comments