हरभरा पिकाचे व्यवस्थापन आणि वाणांची माहिती

21 September 2020 06:29 PM


हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. पीक फेरपालटीमध्ये  हरभरा हे एक उपयुक्त द्विदल पीक आहे. हरभऱ्याला मानवी आहारातही अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्यातील हरभरा पिकाखालील क्षेत्र उत्पादन आणि उत्पादकता सतत वाढत आहे. आधुनिक पीक उत्पादन तंत्रज्ञान, सुधारीत वाणांचा वापर केल्यास हरभरा पिकाचे अधिक उत्पादन घेण्यास मदत होते.

हरभरा पिकासाठी कशी लागते जमीन

हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार व चांगल्या  निचऱ्याची जमीन निवडावी. हलकी, पानथळ व चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीस मानवत नाही.

पूर्वमशागत

खरीपाचे पीक निघाल्यानंतर खोल नांगरट करावी, त्यानंतर २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. खरिपामध्ये जर शेणखत दिले नसल्यास ५ टन शेणखत जमिनीत मिसळावे व सप्टेंबरच्या अखेरपर्यंत शेत पेरणीसाठी तयार ठेवावे.

 

पेरणीची वेळ

कोरडवाहू क्षेत्रांमध्ये  पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. बागायती हरभरा २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान केल्यास चांगले उत्पादन येते. काबुली हरभऱ्याची उशिरा पेरणी १० नोव्हेंबरच्या आसपास करावी.

पेरणीची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण

 देशी हरभऱ्याच्या पेरणी करता दोन ओळीतील अंतर ३०  सेंटीमीटर तर दोन झाडातील अंतर १० सेंटिमीटर ठेवावे. काबुली चना करिता दोन ओळीतील अंतर ४५ सेंटिमीटर व झाडातील अंतर १० सेंटिमीटर ठेवावे.  विजय हरभऱ्यासाठी हेक्टरी  ६५ ते ७० किलो तर विशाल दिग्विजय, पिकेव्ही २ या  वाणांकरीता हेक्टरी १०० किलो बियाणे लागते.  पिकेव्ही ४ आणि कृपा करिता १२५ ते १३० किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे लागते.

 बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास दोन ग्रॅम थायरम+ २ ग्रम बॅविस्टीन  किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बीजप्रक्रिया करावी. यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम प्रति १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.

 


हरभऱ्याचे
सुधारित वाण

विजय -

१) जिरायती, बागायती तसेच उशिरा पेरणीकरिता प्रसारित केला आहे.

२) मर रोगास प्रतिकारक्षम

३) पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता.

४)जिरायती हेक्टरी उत्पादन १५  ते १६ क्विंटल , ओलितीखाली ३५-४० क्विंटल,  उशिरा पेरणी केल्यास १६ ते १८ क्विंटल उत्पादन क्षमता विजय या वाणात आहे.‌

 विशाल :-

महाराष्ट्रासाठी प्रसारीत करण्यात आले असून जिरायती क्षेत्रात १४ ते १५ क्विंटल तर बागायती क्षेत्रात ३० ते ३५ क्विंटल उत्पादन या वाणातून आपल्याला मिळते.

विराट :-

हा काबुली टपोऱ्या दाण्यांचा वाण आहे. मर रोगास प्रतिकारक्षम आहे. ओलिताखाली ३० ते ३२ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन आपल्यास मिळू शकते.  

 पिकेव्ही ४ - या वाणाच्या दाण्याचा आकार जास्त टपोरा असुन सरासरी उत्पादन १२  ते १५ क्विंटल आहे.

दिग्विजय - पिवळसर तांबूस टपोरे दाणे असतात. जिरायती  प्रति हेक्टरी १४ ते १५ क्विंटल बागायतीत ३५ ते ४० क्विंटल तर उशिरा पेरणी केल्यास २० ते २२ क्विंटल उत्पादन या वाणापासून आपल्याला मिळते.

हरभरा पिकासाठी कसे कराल खत व्यवस्थापन

प्रति हेक्‍टरी २५ किलो नत्र ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाशची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार खत व्यवस्थापन करावे तसेच हरभरा पीक फुलवरा अवस्थेत असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये २ टक्के युरियाची फवारणी केल्यास उत्पादनात वाढ आढळून आली आहे.

 आंतरमशागत

पिक २० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी आणि एका महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. त्यानंतर एक खुरपणी करावी यामुळे तण नियंत्रण होऊन उत्पादनात वाढ होते.

 पाणी व्यवस्थापन

उगवणीनंतर पहिले पाणी पीक कळी अवस्थेत असताना (४० ते ५० दिवसांनी) द्यावे. दुसरे पाणी घाटे भरतेवेळी ( ७० ते ७५ दिवसांनी) द्यावे.  मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले पाणी कळी अवस्थेत द्यावे. दुसऱ्यांदा पाणी हे घाटे भरतीवेळी तिसरे पाणी द्यावे. हलक्या जमिनीत पिकाची स्थिती पाहून उगवणीनंतर ओलित करावे. तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास उत्पादनात मोठी वाढ आढळून आली आहे.

काढणी-

हरभऱ्याच्या परिपक्वतेचा काळात पाने पिवळी पडतात. घाटे वाळू लागतात, त्यानंतर पिकाची कापणी व मळणी करावी. धान्य सहा ते सात दिवस वाळू घालावे. सरासरी २ ते ३० क्विंटल उत्पादन मिळू शकते.

लेखक –

पूजा लगड

Msc ( Agri)

पूजा माने

Bsc( Agri)

निकिता जंजीरे

Bsc( Agri)

gram crop management gram crop varieties हरभरा पिकाचे व्यवस्थापन हरभरा पिकाचे वाण हरभरा लागवड हरभरा
English Summary: Information on gram crop management and varieties

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.