पालापाचोळा, वनस्पतीचे अवशेष, शेण, लेंडी, प्राण्यांची विष्ठा यामध्ये तणांचे बी तसेच राहू शकतात. त्यामुळे त्यांचा वापर न कुजवता केल्यास शेतात तणांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तसेच न कुजलेल्या सेंद्रिय पदार्थात कर्बाचे प्रमाण जास्त आणि नत्राचे प्रमाण कमी असते. त्यामुळे त्यांचा कुजण्याचा वेग खूप कमी असतो. हे सेंद्रिय पदार्थ कुजवणाऱ्या जिवाणूंच्या वाढीसाठी नत्राची गरज असते.[१] शेणखत : शेणखताचा वापर कमी अधिक प्रमाणात केला जातो. एकूण सर्वाधिक वापरले जाणारे हे सेंद्रिय खत आहे त्यात ०.५ ते ०.८ % नत्र, ०.२ ते ०.४% स्फुरद, ०.३ ते ०.५ % पालाश, १५०० ते ३००० पीपीएम लोह, १०० ते १२५ पीपीएम जस्त, ६०० ते ८०० पीपीएम मंगल, २० ते ३० पीपीएम ताम्र असते, एकूण शेणखतापैकी निम्मे नांगरटीवेळी आणि निम्मे लागवडीवेळी वापरल्यास अधिक फायदा होतो, यामुळे शेणखतातील अन्नद्रव्यांची उपलब्धता पिकांच्या कालावधीमध्ये दीर्घकाळ होते. मात्र जनावरांची संख्या वेगाने कमी होत चालल्यामुळे शेतीसाठी शेणखत अपुरे पडत आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा अधिक वापर करणे हा पर्याय होऊ शकत नाही. यासाठी पर्यायी सेंद्रिय खतांचा वापर वाढवला पाहिजे.
[२] कंपोस्ट खत :वेगवेगळ्या सेंद्रिय पदार्थाच्या कुजवण्याच्या प्रक्रियेनंतर कंपोस्ट खत तयार होते Compost manure is produced after the process of decomposition of different organic matterया खताच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये त्यावर मातीचे व्यवस्थित आच्छादन केले पाहिजे, अन्यथा त्यातील नत्राचा ऱ्हास होतो. या खतामध्ये नत्र ०.५ ते ०.६%, स्फुरद ०.४ ते ०.५%, पालाश ०.७० ते ०.८०% इतक्या प्रमाणात असते. या खतात काही प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.[३] उसाचे पाचट : ऊस शेतीमध्ये हेक्टरी १०-१२ टन पाचट उपलब्ध होते. त्यातील सेंद्रिय पदार्थांचा पिकांच्या वाढीसाठी वापर करण्यासंदर्भात प्रयोग करून १९९७-९८ मध्ये शिफारस करण्यात आली. ऊस खोडव्याच्या सरीमध्ये पाचट ठेवून २ वेळा खतमात्रा द्यावी. पहिली मात्रा सरीच्या एका बाजूस ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांच्या आत आणि दुसरी मात्रा १३५ दिवसांनी दुसऱ्या बाजूस द्यावी. बऱ्याच ठिकाणी पाचट जाळले जाते. त्याऐवजी पाचटकुट्टी करून वापरल्यास, उत्पादनामध्ये वाढ मिळू शकते.
[४] गांडूळ खत : शेतातील काडीकचरा, पीक अवशेष, शेण, गांडूळे यांच्या वापरातून हे खत तयार करता येते. याचा जमिनीच्या सुपीकतेवर, पीक उत्पादन आणि उत्पादनाच्या दर्जावर चांगला परिणाम दिसतो. या खतात १.५ ते २.० % नत्र, ०.६० ते ०.८०% स्फुरद, १ ते १.२५ % पालाश, २००० ते ३००० पीपीएम लोह, १५० ते २०० पीपीएम जस्त असते. या खतातून मिळणारे व्हर्मिवॉशही उपयुक्त आढळून आले आहे.५] हिरवळीची खते : हिरवळीची खते हा सेंद्रिय कर्ब जमिनीत वाढवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. ताग, धैचा, चवळी अशी पिके दीड ते दोन महिने शेतात ठेवून नंतर ती शेतात गाडायची असतात. त्यातून सेंद्रिय पदार्थासोबत अन्नद्रव्येही मिळतात. उदा. धंचा पिकात ३.५ % नत्र, ०.६०% स्फुरद, १.२०% पालाश असतो. यातून हेक्टरी ६९ किलो नत्र मिळतो. तागामध्ये २.३०% नत्र, ०.५% स्फुरद, १.८% पालाश असतो. तागापासून हेक्टरी ७५ किलो नत्र मिळतो. चवळी पिकात २.३% नत्र, ०.५% स्फुरद, २.३% इतका पालाश असून, हेक्टरी ५० किलो नत्र मिळतो. जमिनीत जिवाणूंची संख्याही वाढते.
जमिनीचा पोत, मगदूर सुधारल्यामुळे मुळांची वाढ चांगली होते. जमिनीतील क्षारांचा बीमोड आणि निचरा होतो. जमिनीचा कडकपणा कमी होण्यास मदत होते.[६] कोंबडी खत : कोंबडी खतात २ ते २.५ % नत्र, २.५ ते ३.०% स्फुरद, १.२५ ते १.४०% पालाश असते हे खत वापरण्यापूर्वी शेताबाहेरच त्यावर पाणी टाकून त्यातील उष्णता बाहेर काढावी. नंतर ते सुकल्यावर शेतात वापरावे. अन्यथा, या खतातून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे रोपांना इजा होऊ शकते. उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी होतो आणि पीक कोमेजते.७] निंबोळी पेंड : यातून नत्राचा ५% पर्यंत पुरवठा होतो. तसेच कडवटपणामुळे पिकांचे किडीपासून संरक्षणही होण्यास मदत होते. उदा. सूत्रकृमी.
डॉ. प्रमोद जगताप,९४२२०७१२९३(लेखक डॉ.जगताप हे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथे मृदाशास्त्रज्ञ आहेत. आणि डॉ.दुरगुडे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे मृदाशास्त्रज्ञ, तर डॉ. भाकरे हे मृदशास्त्र व कृषी रसायन विभागाचे प्रमुख आहेत.)
Share your comments