एरंडी हे पीक अवर्षण प्रवण भागात सुद्धा चांगले येणारे आहे. साधारण : ४०० ते ५०० मि. लि. पाऊस पडणाऱ्या भागातही हे पीक येऊ शकते. भारतात एरंडीचे पीक ६.७४ लाख हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते व त्यापासून ८.९९ लाख मेट्रीक टन उत्पादन मिळते. महाराष्ट्रात एरंडीचे क्षेत्र ९००० हेक्टर असून त्यापासून मिळणारे उत्पादन २००० मेट्रीक टन आहे.
एरंडी हे पीक जिरायती तसेच बागायती क्षेत्रात घेतले जाते. कोरडवाहू एरंडी शेताच्या बांधावर तसेच बागायती क्षेत्रात ऊस, मिरची, वांगी, केळी इ. मुख्य पिकाभोवती घेता येते. तसेच हे पीक हलक्या आणि मध्यम खोलीच्या जमिनीत सलगपणे घेता येते.
एरंडी या पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जाऊन जमिनीतून अन्नांश व ओलावा शोषून घेत असल्याने हे पीक अवर्षण भागासाठी योग्य आहे. हे पीक सर्वसाधारणपणे लागवडीखाली असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. या सर्व बाबींचा विचार केल्यास एरंडीची लागवड करणे फायदेशीर आहे.
एरंडीचे उपयोग : एरंडी तेलाचा उपयोग औषधी व घरगुती वापराशिवया वंगण, रंग साबण इत्यादी उद्योगात केला जातो. औद्योगिकदृष्ट्या विकसित राष्ट्रांकडून एरंडी तेलास फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तसेच तेल काढल्यावर राहिलेल्या पेंडीचा उपयोग सेंद्रिय खत म्हणून केला जात असल्याने तिला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
महत्त्व : एरंडीपासून अनेक उपयोगी वस्तू तयार होतात म्हणून त्याला निसर्गाची भेट म्हणतात. एरंड्याचे विविध उपयोग औषधीकरिता व विविध घरकामाकरिता केले जातात. डोळ्यात जळजळ होणे, गुडघेदुखी, अपचन काविळ, त्वचा व हृदयविकार ह्यावर पान, फुल, बियाण्याचे तेल, मुळांचा रस इत्यादींचा उपयोग करता येतो.
पाने: पानांमध्ये प्रथिने २५ टक्के, कर्ब ५० टक्के असते. एरंडीची पाने 'इरी रेशिम किड्यांसाठी' एक उत्तम अन्न आहे. जेव्हा ह्या किड्यांना ७५ किलो पाने खाऊ घातली जातात. तेव्हा हे रेशीमकिडे १ किलो रेशीम तयार करू शकतात. हेक्टरी एरंडीला ४५०० किलो पानं येतात. शेतकरी रेशिम उद्योगात रुचि घेत असल्यास रेशीम किड्यांच्या मदतीने ६०० किलो रेशिम तयार होऊ शकते. रेशिम किडे वाळलेली पानेसुद्धा खातात. एरंडीची कोवळी पाने जनावरांसाठी उत्कृष्ट चारा म्हणून वापरता येतात. वाळलेल्या पानांचा चुरा मच्छर, पांढरी माशी इत्यादींना पळवून लावण्याकरिता उपयोगी पडतो, पांढरी माशी इत्यादींना पळवून लावण्याकरिता उपयोगी पडतो. पानं गरम करून जेथे दुखत असेल तेथे गरम पान बांधावे असे पुर्णपणे बरे वाटेपर्यंत करावे.
खोड : खोडाचा मुख्यत्वेकरून उपयोग इंधनाकरिता होतो. कोवळी खोडे मोडून जमिनीत गाडली जातात, जेणेकरून जमिनीची प्रत सुधारेल. खोडाचा लगदा लिखाण, छपाई, कागद गुंडाळणे इ. करिता उपयोगी असतो. वाळलेले खोड, फांद्या मातीचे घर बांधण्यात उपयोगी पडतात. खोडाचा उपयोग छतासाठी होतो.
बियाणे : एरंडीची फळे काटेरी व गोलाकार असतात प्रत्येक फळात तीन बिया असतात. बियाण्यांच्या रंगात अतिशय विविधता असते. कोणत्याही दोन बिया सारख्याच रंगाच्या किंवा एकसारख्या नसतात. बियाण्याच्या शंभर दाण्यांचे वजन १० ते १०० ग्रॅमच्या दरम्यान असते. सरासरी वजन ३० ग्रॅम असते. एरंडीच्या बियाण्यांमध्ये ४० - ५५ टक्के तेल, २० टक्के प्रथिने, क्रुड फायबर किंवा सेल्युलोज इ. घटक असतात.
खाद्यपदार्थ म्हणून उपयोग : जरी बियाणे विषारी असले तरी काही विशिष्ट प्रक्रिया करून त्यापासून 'ओजिली इसि' किंवा 'ओनिटशा किंवा ओजिली उगबा ' किंवा 'अवका' असे पदार्थ पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये तयार करतात.
तेल : एरंडीच्या तेलाचे भरपूर व विविध उपयोग असतात. एरंडी तेलाचे एकमेव वैशिष्ट्य हे आहे कि त्यात रिसिनोलिक आम्लपदार्थ असतो. ज्यामध्ये हायड्रॉक्सी (अॅसीड) आम्ल ९० टक्के असते.
औषधी उपयोग : एरंडेल तेलाने अन्नपचन चांगले होते तसेच महिलांच्या गर्भाशयाशी संबंधित आजार ही बरे होतात, यकृताची क्रिया वेगाने होते. कमी मात्रेत कोमट व शुध्द एरंडेल तेल जसे की लहान मुलांनी १/२ ते १ चहाचा चमचा व मोठ्यांनी २ चहाचे चमचे एक पेला कोमट पाण्यासोबत प्राशन करावे.
एरंडेल तेलाला खाण्यायोग्य करण्याकरिता पुढीलप्रमाणे करावे. सुरुवातीला बिया तळून वाटून घ्यावे. नंतर ते उकळावे व जे तेल वर तरंगत असेल ते पळीने वेगळे काढावे. नंतर त्या वेगळ्या काढलेल्या तेलातील पाण्याचे बाष्पीकरण करावे. असे शिजलेले तेल औषधी उपयोगात 'Laxative' म्हणून वापरतात. जास्त प्रमाणात एरंडेल तेलाचा वापर टाळावा. एरंडेल तेल व कोरफडचा रस यामुळे मुळव्याध कमी होतो. पायांच्या भेगा, खाज येणे, घाम येणे यावर एरंडेल तेलामुळे जखमा भरून निघतात. कोमट एरंडेल तेलामुळे हाडांची सांधेदुखीसुद्धा कमी होते. जर रोज दोन वेळा एरंडीच्या पानांना एरंडेल तेल लावून ते पान गरम करून बांधून ठेवले तर एरंडेल तेलाने केस गळणे थांबते, केस काळेकुट्ट राहतात व चकदारसुद्धा बनतात. डोक्याला एरंडेल तेलाने मसाज केल्यास डोकेदुखी थांबते. एक चहाचा चमचाभर एरंडेल तेल व एक चिमुटभर मीठ हे एक पेला पाण्यात घेवून रोज गुळण्या केल्या तर चार दिवसातच दाताचे दुखणे कमी होते. अशा प्रकारे एरंडीचा उपयोग आपल्या नित्य जीवनात होतो.
हवामान : एरंडी हे पीक अवर्षणग्रस्त प्रतिसाद देत असल्याने ४० ते ५० सेंमी पर्यंत पाऊस पडणाऱ्या भागातसुद्धा हे पीक चांगले येऊ शकते. एरंडीस उष्ण व कोरडी हवा मानवते.
जमीन : एरंडीचे पीक सर्वसाधारणपणे लागवडीखाली असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. भारी जमिनीत हे पीक अधिक कालावधी घेऊन जास्त उत्पादन देते.
पूर्व मशागत : या पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जात असल्या कारणाने जमिनीचा नांगरट २० ते ३० सेंमी. खोलवर करावी. त्यावर २ - ३ फुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगली तयार करावी, त्यामुळे बियांची उगवण व रोपांची वाढ योग्य प्रमाणात होते.
एरंडीच्या सुधारित जाती : एरंडीच्या जातींचा आणि संकर वाणांचा कालावधी / उत्पादन, जमीन, पाण्याची उपलब्धता यानुसार कमी- जास्त होऊ शकते.
एरंडीचे सुधारीत वाण / संकर वाण याची माहिती
अ. क्र. वाण एकूण कालावधी (दिवस) खोडाचा रंग तेलाचे शेकडा प्रमाण सरासरी उत्पादन कि. / हे. वैशिष्ट्ये
१ गिरीजा १८० - २०० हिरवा ५० १२०० उंच, बांधावर लावल्यास योग्य. बहुवार्षिक
२ व्हीआय - ९ १५० - १८० हिरवा ४८ १३०० मध्यम उंच, सलग लागवडीस योग्य
३ अरूणा १२० -१५० लाल ५२ १००० मध्यम उंच, सलग लागवडीस योग्य
४ भाग्य ११० -१२० लाल ५१ १२०० बुटकी, आंतरपिकासाठी योग्य
५ सौभाग्य ११० - १२० लाल ५१ १२०० बुटकी, आंतरपिकासाठी योग्य
६ एककेएम - ७३ १३० - १५० ५१ १६०० सुधारीत वाण, बागायती सलग लागवडीस योग्य
७ डीसीएस (ज्योती) - ९ १३० - १५० ५१ १६०० सुधारीत वाण, जिरायती सलग लागवडीस योग्य
८ जी अेयू सी. एयू -२ १०० -१२० हिरवा ५४ १५०० संकर वाण
९ जीसीएच -२ १०० -१२० हिरवा ५४ १७०० संकर वाण
१० जीसीएच -३ १०० -१२० हिरवा ५० १५०० संकर वाण
११ जीसीएच -४ १०० -१२० हिरवा ५० १८०० संकर वाण रोग किडीस प्रतिकारक
१२ जीसीएच -३२ १० -१२० ५० १८०० संकर वाण, मर रोगास प्रतिकारक
पेरणी : जून महिन्यात पावसाला सुरू झाल्यावर जमिनीत पुरेशी ओल व वापसा असताना एरंडीची पेरणी इतर पिकांबरोबर करावी. पाऊस उशिरा सुरू झाल्यास पेरणी ऑगस्टपर्यंत करण्यास हरकत नाही.रब्बी व बागायती पिकांसाठी प्रेरणी सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत करावी.
पेरणी करताना एका ठिकाणी २ बिया ५ ते ७.५ सें. मी. खोलीवर लावल्यात. पेरणी केल्यानंतर १५ दिवसांनी विरळणी करून प्रत्यके ठिकाणी एकाच रोप ठेवावे. हेक्टरी झाडांची संख्या ३०,००० ते ४०,००० असावयास पाहिजे.एरंडीचे बियाणे २४ ते ४८ तास पाण्यात भिजवून लावल्यास बियांची उगवण लवकर व जोमदार होते. एरंडीच्या लागवडीसाठी जातीपरत्वे जमिनीच्या प्रकारानुसार मागीलप्रमाणे बियाणे वापरावे.अन्नद्रव्य पुरवठा : एरंडी पीक नत्र खताला चांगला प्रतिसाद देत असल्याकारणाने जमिनीच्या मगदुराप्रमाणे नत्राची मात्रा दोन/ तीन हप्त्यान द्यावी.
एरंडी हे पीक जास्त पाण्याच्या प्रत्येक अवस्थेला फारच संवेदनशील आहे. यामुळे पिकाच्या आर्थिक उत्पादनासाठी जमिनीत उपलब्ध पाणी, योग्य वाणांचा वापर त्याचप्रमाणे पाणी देण्याची वेळ व पिकाची वाढीची अवस्था या सर्व बाबी विचारात घ्याव्यात. आधी उत्पादनासाठी बुटक्या संकरीत जातींचा वापर करावा. या जातीस वाढीसाठी जास्त पाण्याची गरज नसते. मात्र भारी जमिनीत दिर्धकाल ओलावा उपलब्ध असल्यामुळे पिकांचा कालावधी वाढतो. हा कालावधी कमी व्हावा, म्हणून फुले येण्याच्या पूर्वी थोड्या कालावधीसाठी पाणी देणे बंद करून ताण देणे गरजेचे आहे. यामुळे पिकाचा कालावधी तर कमी होतोच शिवाय एकाच वेळेला जास्त प्रमाणात फुले येतात व उत्पादनात वाढ होते. फुले येण्याच्या कालावधीत मात्र पाण्याचा ताण पडता कामा नये. हा ताण पडला तर त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. विशेषत: या पिकाला जमिनीत एकून उपलब्ध ओलाव्यापैकी ५० % पाणी उडून गेल्यावर पाणी दिल्यास हितावह ठरते. यापेक्षा ओलावा जास्त नाहीसा झाल्याने मात्र पिकाच्या उत्पादनात घट येते.
एरंडीची काढणी वेळेवर होण्यासाठी पाणी देण्याची वेळ विचारता घेणे गरजेचे आहे. त्यासाठी या पिकांस काढणीपूर्वी ३ ते ४ आठवडे अगोदर पाण्याची पाळी देऊ नये. एरंडीची बोंडे तयार झाल्यावर या पिकास पाण्याची गरज नसते. एरंडी या पिकाची इतर पिकाच्या मानाने जमिनीच्या खोल थरातून ओलावा शोषणाची क्षमता जास्त आहे. हे पीक विशेषत: दुष्काळी भागासाठी वरदान आहे.कीड, रोग व त्यांचा बंदोबस्त : एरंडीवर उंटअळी, शेंडे व बोंडे पोखरणाऱ्या अळीचा फार मोठ्या प्रमाणार प्रादुर्भाव आढळून येतो. त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. अळीचे नियंत्रण करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाय करावेत.
उंटअळीचा प्रादुर्भाव थोठ्या प्रमाणात असल्यास हाताने अळ्या वेचून घ्याव्यात व रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. पिकाचे सुरुवातीस १ ते २ महिने उंट अळीपासून सरंक्षण करावे.
जैविक नियंत्रण : 'ट्रायकोग्रामा चिलोनिस' (Trichogramma Chilonis) १३.५ सी. सी. प्रति हेक्टरी सदरहू कीटकांची अंडी सोडवीत. बोंडे पोखरणाऱ्या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी किटकनाशकांची फवारणी करावी. पोखरलेली बोंडे काढून त्यांचा नाश करावा. एरंडीवर महाराष्ट्रा राज्यात मोठ्या प्रमाणात रोग आढळून येत नाही. वरील पद्धतीने नियंत्रण न झाल्यास खालील किटकनाशकांचा वापर करावा.
उंट अळी व बोंडे पोखरणाऱ्या किडी दिसू लागताच मोनोक्रोटोफॉस (०.०५%) किंवा कार्बारील (०.१५%) किंवा क्विनॉलफॉस यांचा १० -१५ दिवसांच्या अंतराने २०० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी २ - ३ वेळा गरजेनुसार फवारणी करावी किंवा क्विनॉलफॉस यांचा १० -१५ दिवसांच्या अंतराने २०० ते ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी २ - ३ वेळा गरजेनुसार फवारणी करवी.
फवारणी : १) पहिली फवारणी : पहिली फवारणी (पेरणी / टोकणीनंतर १ महिन्यांनी)
: जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + राईपनर १०० मिली + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन १०० मिली. + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.
२) दुसरी फवारणी :(२ महिन्यांनी ) : जर्मिनेटर ३०० ते ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + राईपनर २५० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली. + १०० लि.पाणी.
३) तिसरी फवारणी : (३॥ महिन्यांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + २०० लि.पाणी.
४)चौथी फवारणी : (४ महिन्यांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली. + २०० ते २५० लि.पाणी.
काढणी व मळणी : एरंडीचे घड पक्व झाल्यावर पूर्णपणे वाळल्यावर ते तोडून घ्यावेत. ४ - ५ दिवस वाळवावेत. वाळलेले घड काठीने किंवा मोगारीने बडवून बिया वेगळ्या कराव्यात व वारा देऊन स्वच्छ कराव्यात. जिरायती पिकाची घड काढणी साधारणपणे २ - ३ वेळा करावी. तसेच बागायती पिकाची घड काढणी ४ - ५ वेळा करावी. अलीकडे मळणीसाठी थ्रेशर उपलब्ध आहेत. मोठ्या क्षेत्रावर जर एरंडीचे पीक असेल तर मळणीसाठी थ्रेशरचा वापर करावा.
Share your comments