1. कृषीपीडिया

गुलाब लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान ; असे घ्या रोपांची काळजी

KJ Staff
KJ Staff


गुलाब हे निसर्गाची सर्वात सुंदर देणे असून फुलांमध्ये या पिकाचे स्थान सर्वात वरचे असल्यामुळे गुलाबाच्या फुलाला फुलांचा राजा असे संबोधतात. गुलाबामध्ये अनेक आकर्षक जाति, रंगछटा आणि सुहास असल्यामुळे या फुलांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात सातत्याने केला जातो. तसेच आयुर्वेदातही गुलाबाच्या विषयी भरपूर प्रमाणात लिखाण केलेले आहे.  अलीकडच्या औद्योगिक क्रांतीच्या युगातही गुलाबाच्या फुलांचा वापर शोभेसाठी तसेच प्रदूषण टाकण्यासाठी होतो.  गुलाबापासून आत्तर, गुलाब पाणी, जाम, जेली, सरबत, गुलकंद अशा प्रकारचे विविध पदार्थ तयार करतात. त्यामुळे गुलाब हे व्यापार व आहाराच्या दृष्टीने एक महत्त्वाचे फुल पीक आहे.  आधुनिक युगात गुलाबाची फुले कट फ्लॉवर म्हणून वापरतात.  फुलांच्या एकूण व्यापारविषयक उलाढालीत जगात गुलाबाचा पहिला नंबर लागतो.  आपल्या भारतामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात गुलाबाची कट फ्लावर्ससाठी उत्पादन घेतले जात असून महाराष्ट्र लांब दांड्याच्या फुलांच्या उत्पादनात आघाडीवर आहे.. त्यामुळे अशा फुल पिकाची शेती कशी केली जाते याची आपण माहिती घेणार आहोत.

 हवामान- गुलाबाचे पीक उष्ण तसेच समशीतोष्ण हवामानात चांगले येते.  तरीपण उत्तम दर्जाची फुले मिळवण्यासाठी दिवसाचे सरासरी तापमान 25 ते 32 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे सरासरी तापमान 15 ते 17 अंश सेल्सिअस असावे. यासाठी सापेक्ष आद्रता 60 ते 65 टक्के असावी. पाच ते सहा तास स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी गुलाबाची वाढ चांगली होऊन फुले चांगली येतात.  गुलाबाच्या झाडांची वाढ सावलीत नीट होत नाही.

 


जमीन- गुलाब पिकासाठी हलकी ते मध्यम जमीन मानवते. हलक्‍या ते मध्यम जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होतो, परंतु या जमिनी कसदार नसतात. म्हणून अशा जमिनीमध्ये शेणखताचा भरपूर वापर करावा.  उत्तम प्रतीचा जमिनीतून पाण्याचा निचरा नीट होत नाही, परिणामी त्याचा झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. त्या मुळे झाडाची पाने पिवळी पडून पानांवर काळे ठिपके पडतात. शेवटी पाने गळून जातात. साधारणपणे जांभ्या दगडापासून तयार झालेली आम्लयुक्त आणि 5.5 ते 6.5 इतका सामू असलेली जमीन गुलाबाच्या लागवडीसाठी उत्तम असते.

 सुधारित जाती- गुलाबाच्या फुलांचा आकार, रंग, पाकळ्यांची संख्या आणि ठेवण, दांड्याची लांबी, झाडाच्या वाढीचे सवयीनुसार गुलाबाच्या जातीचे प्रकार पडतात.

  • हायब्रिड टी= या गुलाबाच्या प्रकाराची लागवड लांब दांड्याच्या फूलांसाठी मोठ्या प्रमाणावर केली जाते. झाडे मध्यम ते जोरदार वाढतात. फुले मोठी, दुहेरी, आकर्षक रंगाचे आणि झुपकेदार असतात. या प्रकारच्या जातींमध्ये अमेरिकन हेरिटेज, एनिमल्सस्पार्क्स, आरिना, अरुणा, आकाश सुंदरी, अनुराग, अभिसारिका, अर्जुन, हसीना, मृदुला इत्यादी प्रकारच्या अनेक जातींचा समावेश होतो.
  • फ्लोरी बंडा= हायब्रीड टी आणि पोलियनथा या प्रकारातील जातीच्या संकरातूनफ्लोरी  बंडा गुलाबाची निर्मिती झाली आहे.  या प्रकारातील फुले लहान लहान झुपक्यात  येतात.  प्रत्येक फूल हे मोठ्या करायचे असते पण फुलांचा आकार हायब्रीड टीपेक्षा लहान असतो.  या प्रकारात बंजारन, चंद्रमा, डी होश, मर्सडीज, अरुणिमा, हिमांगिनी आईस बर्ग, निलांबरी, प्रेमा इत्यादी जातींचा समावेश होतो.

 मिनिएचर= लहान झाड, लहान आणि झुपक्याने येणारी फुले, लहान पाकळ्या, लहान आणि नाजूक देठ असलेला हा छोटा गुलाब असतो.  या प्रकारातील झाडे लहान आणि काटक असतात. कमी जागेत आणि कुंडीत लावण्यासाठी हा प्रकार उत्तम असतो. 

  • वेलवर्गीय गुलाब= या प्रकारात वेलीसारखी आणि जोमदार वाढणारे गुलाब येतात. कुंपण, भिंती, कमानी आणि मांडव यावर चढविण्यासाठी या प्रकारातील जातीचा उपयोग होतो.
  • सुवासिक गुलाब= या प्रकारात सुगंध देणाऱ्या जातींचा समावेश होतो.  आत्तर, सुगंधी तेल, गुलाब पाणी इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी या प्रकारातील जातींची लागवड केली जाते.

        गुलाब लागवडीसाठी पूर्वतयारी

 लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची आडवी उभी नांगरट करून तणे व धसकटे वेचून घ्यावीत. त्यानंतर वखराच्या दोन तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

 


गुलाबाची लागवड

 गुलाबाची लागवड दोन प्रकारे करतात. त्यातली पहिली पद्धत म्हणजे शेतात खुंट  रोप वाढवून त्यावर डोळे भरणे आणि दुसरी पद्धत म्हणजे तयार कलमे लावणे. उत्पादन लवकर घेण्यासाठी तयार कलमांची लागवड करावी . कलमांची लागवड करण्यासाठी ठराविक अंतरावर दीड फूट लांब व 1.5 फूट रुंद आणि 1.5 फूट खोल आकाराचे खड्डे खणावेत. खड्डे शेणखत आणि माती यांच्या मिश्रणाने 1:1 या प्रमाणात भरून घ्यावेत. कलमांची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यात करावी. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात सुद्धा लागवड करता येते. गुलाबाची लागवड जमिनीचा प्रकार,  जात इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन 60 बाय 60 सेंटिमीटर, किंवा 75 बाय 75 सेमी अंतरावर करावी.

  खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन

 हेक्टरी एकूण 600 किलो नत्र, 200 किलो स्फुरद व 200 किलो पालाश खालीलप्रमाणे विभागून घ्यावे. जून छाटणीनंतर दीडशे किलो नत्र, 100 किलो स्फुरद, व 100 किलो पालाश व त्यानंतर एक महिन्याने दीडशे किलो नत्र प्रति हेक्‍टरी द्यावे. ऑक्टोबर छाटणी नंतर सुद्धा वरीलप्रमाणेच खते द्यावीत. आप पावसाळ्यात पाणी नसताना पंधरा दिवसांनी,  हिवाळ्यात दहा बारा दिवसांनी, आणि उन्हाळ्यात पाच सात दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

  आंतरमशागत

 नियमित खुरपणी करून तने काढावीत. मुळ्या जवळील माती मोकळी करणे महत्त्वाचे आहे. तसेच खुंटावरील फूट वेळोवेळी काढावी. पावसाळ्यात आळ्यामध्ये पाणी साचू देऊ नये.

  गुलाबावरील महत्वाच्या किडी व त्यांचे व्यवस्थापन

 खवले कीड= अतिशय सूक्ष्म कीड असून ती स्वतः भोवती मेना सारखे चिकट पदार्थाचे कवच तयार करून त्यामध्ये राहते. ही कीड फांद्यांवर किंवा पानावर सतत एकाच ठिकाणी राहून अन्नरस शोषून घेते. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास फांद्या आणि पाने सुकून जातात.

 


खवले किडीचे नियंत्रण

 खवले किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट तीस टक्‍के प्रवाही 25 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 मावा= या किडीची पिवळसर हिरवट रंगाची पिल्ले तसेच काळसर तपकिरी रंगाचे प्रौढ किडे कोळी शेंडे, कळ्या आणि पानाच्या मागील बाजूस पुंजक्याने राहुन अन्नरस शोषण करतात. त्यामुळे पाणी, शेंडे आणि कळ्या निस्तेज होऊन त्यांची वाढ खुंटते.

माव्याचे नियंत्रण

 या किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 30 टक्‍के प्रवाही ते 30 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा इमिडाक्लोप्रिड 10 मिली 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 तसेच तुडतुडे, फुलकिडे, पिठ्या ढेकूण, कळ्या खाणाऱ्या अळी, लाल कोळी, सुत्रकृमी इत्यादी प्रकारचे किडी-रोगांचा प्रादुर्भाव गुलाब पिकावर होतो.

     गुलाब पिकावरील महत्वाचे रोग

  • भुरी= बुरशीजन्य रोग असून गुलाबाच्या झाडांवर सर्वत्र आढळून येतो. या रोगामुळे गुलाबाचि कोवळी शेंडे, पाने, शेंडे इत्यादींवर पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ दिसून येते. बुरशीच्या प्रादुर्भाव झालेल्या भागाची वाढ खुंटते आणि पुढे ते भाग सुकून वाढतात

नियंत्रण= या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक 20 ग्रॅम किंवा केरो थेन भुकटी दहा ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून दहा-पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.  केवडा रोग

 या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने झाडाची शेंडे, कळ्या आणि पाकळ्या यावर होतो. या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर वरच्या बाजूस जांभळी लालसर ते गडद तपकिरी रंगाचे वेड्यावाकड्या आकाराचे डाग पडतात. पाने पिवळी पडून वाळू लागतात.

 केवड्याचे नियंत्रण

 या रोगाच्या नियंत्रणासाठी 25 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters