पिकांची उत्पादकता अधिक हवी तर मातीचे परीक्षण आहे गरजेचे

17 March 2021 06:54 PM By: भरत भास्कर जाधव
माती परीक्षण

माती परीक्षण

शेती क्षेत्रात माती हा अत्यंत महत्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे. सद्यस्थितीत शेतीमधील आधुनिकतेमुळे, किटाकणाशकांच्या, तणनाशकांच्या, रासायनिक खतांच्या अवाजवी वापरामुळे जमिनीची प्रत व सुपीकता खालावली आहे व आता त्या नापीक होण्याच्या मार्गावर आहेत अथवा झाल्याच आहेत. आधुनिक शेतीमुळे जमिनीचे रासायनिक व भौतिक गुणधर्म बदललेले दिसून येतात.

या गुणधर्म बिघाडामागील कारण म्हणजे जमिनीतील घटक अन्नद्रव्याचे, सूक्ष्म जीवणूंचे घटते प्रमाण होय.जमिनीचे बिघडलेले आरोग्य हा सध्याचा महत्वाचा मुद्दा असून यावर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. जमिनीतून अन्न द्रव्ये पूरविण्यातील बदलांचा परिणाम पिकांच्या विविध अवस्थेत व विशिष्ट भागात दिसून येतो परिणामी उत्पादनात घट होते. म्हणून मातीला सुपीक-कसदार बनवण्यासाठी व त्यातील सर्व अन्न द्रव्याची स्थिति जाणून घेण्यासाठी मृदा परीक्षण/तपासणी हे योग्य निदान ठरू शकते.

 माती परीक्षण म्हणजे काय :-

माती परीक्षण म्हणजे शेतीतील प्रातिनिधिक नमुन्यांचे पृथक्करण करून त्यातील उपलब्ध मुख्य,दुय्यम व सूक्ष्म अन्न द्रव्याचे प्रमाण तपासून अहवाला नुसार पिकांचे व खतांचे नियोजन करणे होय.

 

मृदा परीक्षण कधी करावे

 

 • मातीचा नमूना हा वर्षातून आवश्यक असेल तेव्हा घेता येतो.

 • शक्यतो मातीचा नमूना पिके काढल्यानंतर नांगरणी पूर्वी घ्यावा.

 • मातीचा नमूना रब्बी पिकांच्या काढणीनंतर किंवा उन्हाळ्यात घेतल्यास परीक्षण अहवाल पेरणीपर्यंत उपलब्ध होतो.

 • उभ्या पिकांमध्ये मातीचा नमूना घ्यावयाचा असेल तर दोन ओळीमधील मातीचा नमूना घ्यावा.

 • पिकास रासायनिक खत दिले असल्यास तीन महिन्याच्या आत संबंधित जमीनीतून माती नमूना घेऊ नये.

मातीचा नमूना घेताना घ्यावयाची काळजी

 

 • साधारणता शेतीच्या प्रत्येक बांधावरुण २ फुट एवढ अंतर सोडायच कारण त्या ठिकाणी विविध प्रकारची तणे असू शकतात त्यामुळे अन्न द्रव्ये व्यवस्थित तपासता येत नाही.

 • शेतामधील खते साठवण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरीजवळ पाण्याचे पाट, इत्यादि जागामधून मातीचे नमुने घेऊ नये.

 • नमूना घ्यायची जागा स्वच्छ करून घ्यावी व ती जागा जास्त ओलसर नसावी. माती ओली असल्यास ती आधी सुकवून नंतरच प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावी.

 • वेगवेगळ्या थरातील किंवा शेतीतील नमुने एकत्र करू नये.

 • नमूना घेतल्या नंतर त्यातील काडी,कचरा,दगड,गोटे काढून टाकावे. माती नमूना गोळा करतांना रासायनिक खताच्या पिशव्यांचा वापर करू नये.

मातीचा नमूना घेण्यासाठी आवश्यक साहित्ये

मातीचा नमूना घेण्यासाठी टीकास, फावडे, खुरपे, घमेले, मोजमाप पट्टी , पेन पेन्सिल, लेबल, स्वच्छ गोणपाट,कापडी पिशवी इ. साहित्य आवश्यक आहे. (टीप : शक्यतो लाकडी साहित्याने माती खुरावी कारण लोखंडी साहित्याने फेरस चे प्रमाण जास्त आढळून येतात).  

  

मातीचे नमुने घेण्याची पद्धत

 1. सर्वात प्रथम शेतीची पाहणी करावी , पाहणी करताना सदर जमिनीचा रंग,उतार,पोत,खोली,व्यवस्थापन व पीक पद्धती नुसार विभागणी करावी.

 2. विभागणी झाल्यानंतर जमिनीवर नागमोडी वळणाची रेषा काढून घ्यावी. नागमोळी वळणाच्या रेषेच्या प्रत्येकी टोकाला एक इंग्रजी v आकाराचे खड्डे खोदुन घ्यावे.

 3. त्या प्रत्येक खडयातून मध्ये पडलेली माती बाहेर काढावी त्यानंतर त्याच्या बाजूच्या थराला खुरपून माती जमा करावी.

 4. जमिनीच्या प्रकार नुसार एकरी ५ ते १० ठिकाणची माती घ्यावी . अश्या प्रकारे इतर सर्व खड्यातून माती नमुने गोळे केले की ते एका स्वच्छ पोत्यावर एकत्र करावी.

 5. सदर मातीचे हाताने ४ भागात विभागणी करून समोरा-समोरील २ भाग बाजूला काढून टाकावे व उरलेले २ भाग एकत्र करावे व अशीच विभागणी मातीचा नमूना अर्धा ते एक किलो होईपर्यंत करावे.

 6. फळबागेसाठी मातीचा नमूना वेगवेगळ्या थरातून घ्यावा.

 7. स्वतंत्र पिशवीत नमुने टाकावे व त्या पिशवीवर नमुन्यांची खोली नमूद करावी.

मातीचा नमूना घ्यायची खोली पिकानुसार खाली नमूद केल्या प्रमाणे घ्यावी

 

             पिके

       नमूना घ्यायची खोली (से.मी.)

ज्वारी,भुईमुंग, भात, गहू, सोयाबीन, मका इत्यादी.   

० ते १५ / २० 

कपाशी, ऊस, केळी, भाजीपालावर्गीय पिके इत्यादि.  

० ते  ३० / ४५

फळ वर्गीय पीके

० ते ३० ,३० ते ६० व ६० ते ९०

 

मातीचा नमूना कसा पाठवावा

साधरणता २४ तासाच्या आत मातीचा नमूना प्रयोग शाळेत पाठवावा. व खालील दिलेली माहिती लिहून ती त्या पिशवी सोबत पाठवावी.

 1. शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता :-

 2. मातीची खोली से. मी. मध्ये :-

 3. नमूना घेतल्याची तारीख :-

 4. सर्व्हे किवा गट क्रमांक, सातबारा :-

 5. मागील हंगामातील पीक व वाणाची जात :-

 6. शेतीचा प्रकार (बागायत किवा जिरायत) :-

 7. मागील हंगामातील वापरलेली खते :-

 8. पुढील हंगामात घेण्याची पिके :-

 9. जमिनीचा प्रकार :-

 10. पाण्याचा निचरा बरा किवा वाईट :-

 • अश्या प्रकारे हा सोप्या पद्धतीने घेतलेला मातीचा नमूना जवळच्या तालुका/जिल्हा स्तरीय शासकीय किवा खासगी प्रयोगशाळेत नेऊन तपासून घ्यावा .

 • तिथून मिळणाऱ्या अहवालात पिकामधे जे महत्वाचे ३ घटक राहतात नत्र, स्फुरद  आणि पालाश (NPK) हे जास्त आहे ,कमी आहे की मध्यम आहे हे  कळत व त्यानुसार खत द्यायला सोईस्कर जाते.या अहवालात खत कमी असेल तर किती देण्यात यावे जर जास्त असेल तर देऊ नये अशी स्पष्ट शिफारस देलेली असते.

 • जमिनीतील विद्युत वाहकता म्हणजे जमिनीत असणारे अन्न घटक किती चांगल्या प्रकारे वाहतात याचा अंदाज लागतो

 • तसेच जमिनीचा सामू (ph) कळतो. जमिनीचा सामू जर ७ असेल तर जमिनीतील उपलब्ध असणारे अन्न घटक हे पीक सहजासहजी शोषून घेऊ शकतात जर तो ७ पेक्षा कमी किवा जास्त असेल तर जनिनीतील अन्नघटक शोषून घेण्यासाठी पिकांना अडचण जाते मग यावर उपायासाठी काही शिफारसी आहेत, हे या अहवालातून आपल्याला दिल्या जातात. .

 

मृदा परीक्षणामुळे होणारे फायदे    

   

 1. माती परीक्षणामुळे जमिनीतील घटकांचे प्रमाण तसेच जमिनीतील दोष समजतात.

 2. जमीनीतील सेंद्रिय कर्ब (organic carbon) चे प्रमाण कळते जे जमिनीच्या सुपीकतेसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते. ते १% पेक्षा कमी आढळल्यास जमीन आजारी आहे असे मानले जाते . याच्या उपचारासाठी सेंद्रिय खताचा वापर केला जातो यामुळे मातीची पानी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

 3. माती परीक्षणामुळे जमिनीतील मुख्य अन्नद्रव्य, नत्र, स्फुरद, पालश, जमिनीचा सामू (ph), विद्राव्य क्षाराचे प्रमान, मातीतील विद्युत वाहकता, कॅल्शियम, मॅग्नीशियम, आयर्न, इत्यादि याचे प्रमाण कळते.

 4. माती परीक्षणाच्या अहवाला नुसार पिकाला ठराविक प्रमाणात खते देता येतात व खतांची संतुलित मात्रा मिळाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.

 5. माती परीक्षणामुळे जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड व नियोजन करता येते

 6. माती परीक्षणामुळे आवश्यक तेवढेच खत दिल्यामुळे शेतकारीची आर्थिक बचत होते.

 7. जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्माची माहीत मिळते.

 8. माती परीक्षणामुळे जमिनीत संतुलित अन्न द्रव्याचा पुरवठा झाल्याने जमिनीची उत्पादन क्षमता टिकून राहते सुपीकता आजमवता येते .

 9. जमिनीत कमी असलेल्या अन्न द्रव्याची, सूक्ष्मजीवणूची पूर्तता करण्यासाठी सेंद्रिय खताचा म्हणजे (गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खत) याचा वापर होऊ शकतो .

 10. माती परीक्षण तंत्रज्ञानाचा वापर करून पुढील काळात उद्भवणाऱ्या नुकसणाचे अंदाज लावत येतात व सुधारणेसाठी नियोजनबद्ध उपाययोजना करता येतात.

 

लेखक -

 कू. आचल देवेंद्र इंगळे

 बी.एस.सी.कृषी (अंतिम वर्ष विद्यार्थी)

स्व.आर. जीदेशमुख कृषी महाविद्यालय तिवसा . जि अमरावती.

soil testing crop production मातीचे परीक्षण पिकांची उत्पादकता जमिनीची सुपीकता soil fertility
English Summary: If crop productivity is high, soil testing is essential

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.