जी खते पाण्यामध्ये 100% विरघळतात व जी विविध पिकांना शास्त्रज्ञाच्या शिफारशीप्रमाणे फवारणीद्वारे किंवा सूक्ष्म ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबत विरघळुन पिकांना दिली जातात त्यांना विद्राव्य खते असे म्हणतात. अशी विद्राव्य खते सर्वसाधारणपणे घनरूप स्वरूपात उपलब्ध होतात व अशा खताची घनरूप पावडर पाण्यामध्ये टाकून तयार झालेले खताचे द्रावण पिकांना फवारून किंवा ठिबक सिंचनाद्वारे पुरवठा केले जाते.
विद्राव्य खतांचा वापर पिकांसाठी कसा केला जाऊ शकतो?
विद्राव्य खते पिकांना सर्वसाधारणपणे खालील प्रकारे पुरवठा केली जातात.
(अ) फवारणीद्वारे पाण्यासोबत विरघळून
(ब) सूक्ष्म ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबत विरघळून
विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे विरघळून पिकांना दिल्यास काय फायदा होतो?
विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबत विरघळून खते व पाणी एकत्रित पिकाला देण्याच्या पद्धतीला फर्टिगेशन असे म्हणतात.
या फर्टिगेशन चे खालील फायदे होतात.
(१) फर्टिगेशनद्वारे खताचा वापर पिकाला झाल्यास खताच्या मात्रेत बचत होते, मजुराच्या खर्चात कपात होते तसेच यंत्रसामुग्री, इंधन,वीज यांची सुद्धा बचत होते. (२) बहुतांश विद्राव्य खते आम्लधर्मी असल्यामुळे त्यांचा क्षार भार कमी असतो व ती सोडियम व क्लोरीन मुक्त असल्यामुळे फर्टिगेशन द्वारे ती पिकांना दिल्यास जमिनीतील पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर होऊन जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते व पीक उत्पादनात वाढ होते. (३) फर्टिगेशनद्वारे विद्राव्य खते दिल्याने योग्य ते अन्नद्रव्य ठराविक प्रमाणात योग्यवेळी पिकाच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात दिले गेल्यामुळे त्याचे शोषण कार्यक्षमरीत्या होते. (४) पिकाच्या वाढीनुसार व अवस्थेनुसार हवामानातील बदल लक्षात घेऊन पिकाला फर्टिगेशन द्वारे अन्नद्रव्य विभागून दिल्या गेल्यामुळे पिकाची उत्पादकता वाढते. (५) फर्टिगेशनद्वारे खते दिल्या गेल्यामुळे झाडाची वाढ जोमाने होते व असे झाड तुलनात्मकदृष्ट्या कीड व रोगास कमी बळी पडते.
हेही वाचा : लिंबूवर्गीय फळबागेतील खोड्कुज, मुळकुज व डिंक्या रोगाचे व्यवस्थापन
विद्राव्य खते फवारणीतून पिकांना दिल्यास काय फायदा होतो?
(१) शास्त्रज्ञाच्या किंवा कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे संबंधित पिकात विद्राव्य खते फवारणीतून पिकांना वाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत फवारून दिल्यास पिकाच्या उत्पादनात वाढ होते. (२) बऱ्याच वेळा अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीतील खते किंवा अन्नद्रव्ये वाहून जातात अशा वेळी पाऊस थांबल्यावर संबंधित पिकाची गरज लक्षात घेऊन शास्त्रज्ञांच्या शिफारशीप्रमाणे फवारून विद्राव्य खताचा संबंधित पिकात वापर केल्यास त्या पिकांना अन्नद्रव्याचा ताबडतोब पुरवठा होऊन संबंधित अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
(३) जमिनीत ओलाव्याचा अभाव असेल किंवा कडक उन्हाळ्यात फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा वापर विकास केल्यास पिकाची पाने टवटवीत होऊन कार्यक्षम राहतात व पिके पाण्याच्या खंडाच्या कालावधीत तग धरू शकतात.
(४) पिकाच्या फुलोऱ्यात मोहोर येण्याच्या काळात फलधारणा होत असताना व फळाची वाढ होण्याच्या काळात फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा शिफारशीप्रमाणे वापर केल्यास पीक उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
(५) पिकाची पाने किडीने खाल्ली गेली असल्यास नवीन पालवी फुटण्यासाठी शिफारशीप्रमाणे फवारणीयुक्त विद्राव्य खतांचा वापर केल्यास त्याचा पिकाला फायदा होतो.
फवारणीसाठी विद्राव्य खताचे द्रावण तयार करताना कोणती काळजी घ्यावी?
(१) विद्राव्य खताचे फवारणीसाठी द्रावण तयार करताना पाण्यात विद्राव्य खत टाकून खत पूर्णपणे पाण्यात विरघळेपर्यंत पाणी ढवळावे.
(२) कॅल्शियम युक्त पाण्यात कीटकनाशके बुरशीनाशके व खते वापरणे टाळावे.
(३) विद्राव्य खताचे द्रावण बोर्डो मिश्रण किंवा लाईम मिक्सर साठविलेल्या डब्यात तयार करू नये
(४) विद्राव्य खते फवारताना अनेक विद्राव्य खते एकत्र करून किंवा अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी करणे शक्यतोवर टाळावे. एकापेक्षा जास्त विद्राव्य खते एकत्र करून फवारणी करावयाची झाल्यास द्रावण तयार करताना कोणते विद्राव्य खत कोणत्या खतात मिसळून फवारणी करणे योग्य किंवा अयोग्य याचा प्रत्यक्ष शास्त्रज्ञाची संपर्क करून माहिती घेऊनच मिश्रण तयार करून फवारणी करावी.
(५) विद्राव्य खताचे द्रावण तयार करून फवारणी करताना संबंधित पिकातील कृषी विद्यापीठाच्या शिफारशीचा संदर्भ घेऊन प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन संतुलित रित्या योग्य वेळी योग्य प्रमाणात फवारून विद्राव्य खतांचा वापर केल्यास पीक उत्पादनात फायदा होतो. फवारणी युक्त विद्राव्य खताची फवारणी शक्यतोवर सकाळी नऊ ते अकरा किंवा सायंकाळी चार ते सहा या वेळेत करावी.
हेही वाचा : खूशखबर ! बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी 10 कोटींचा निधी मंजूर
काही महत्वाच्या विद्राव्य खतांच्या ग्रेड व त्यांची वैशिष्ट्ये
(१) १९ : १९ : १९ : या विद्राव्य खतास स्टार्टर ग्रेड विद्राव्य खत असे म्हणतात. या विद्राव्य खतात नत्र हा अमाईड, अमोनियम व नायट्रेट या तीनही स्वरूपात असतो. या खताचा प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत शाखीय वाढीसाठी उपयोग होतो.
(२) १२ : ६१ : ० : या विद्राव्य खतांच्या ग्रेडला मोनो अमोनियम फॉस्फेट असे म्हणतात. या खताच्या ग्रेडमध्ये अमोनीकल स्वरूपातील नत्र कमी असून पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. नवीन मुळाच्या तसेच जोरदार शाखीय वाढीसाठी व फुलाच्या योग्य वाढीसाठी या खताच्या ग्रेड चा उपयोग होतो.
(३) ० : ५२ : ३४ : या विद्राव्य खताच्या ग्रेडला मोनो पोटॅशियम फॉस्फेट असे म्हणतात. या खतांमध्ये स्फुरद व पालाश अन्नद्रव्याचे प्रमाण भरपूर आहे. फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. फळाच्या योग्य पक्वतेसाठी व आकर्षक रंगा करता विशेष करून हे खत वापरले जाते.
(४) १३ : ० : ४५ : या खताच्या ग्रेड ला पोटॅशियम नायट्रेट असे म्हणतात. या खतांमध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त आहे. फुलोरयानंतरच्या अवस्थेत व पक्वता अवस्थेत या खताची आवश्यकता असते. या खतामुळे अवर्षणप्रवण स्थितीत पिके तग धरु शकतात.
(५) ० : ० : ५० : १८ : या खतास पोटॅशियम सल्फेट असे म्हणतात. पालाश या बरोबरच या खतांमध्ये उपलब्ध स्वरूपातील गंधक सुद्धा असते. पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते. हे खत फवारले असता पिक अवर्षणप्रवण स्थितीत तग धरते.
(६) १३ : ४० : १३ : कपाशी सारख्या पिकात पात्या,फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबून कपाशीच्या बोंडाची संख्या वाढते तर शेंगा वर्गीय पिकात शेंगाची संख्या वाढते.
(७) २४ : २८ : ० : या खतातील नत्र हा नायट्रेट व अमोनीकल स्वरूपातील आहे. शाखीय वाढीच्या तसेच फुलधारणा अवस्थेत या खताचा वापर करता येतो.
(८) कॅल्शियम नायट्रेट : मुळाची वाढ चांगली होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत किंवा शेंगा वाढीच्या अवस्थेत या खताचा वापर केला जाऊ शकतो.
शेतकरी बंधूंनो वर निर्देशित विद्राव्य खताच्या काही महत्त्वाच्या ग्रेड्स वर दिल्या असल्या तरीही याव्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या विविध ग्रेड चा शास्त्रोक्त रीत्या वापर करता येतो
सर्वसाधारणपणे पारंपारिक व विद्राव्य खताची कार्यक्षमता कशी असते ?
शेतकरी बंधूंनो सर्वसाधारणपणे नत्र या अन्नद्रव्या संदर्भात पारंपारिक खतातील कार्यक्षमता 30 ते 40 टक्के तर विद्राव्य खतांची कार्यक्षमता 90 टक्के एवढी असते. स्फुरद या अन्नद्रव्या संदर्भात पारंपारिक खतातील कार्यक्षमता 15 ते 20 टक्के तर विद्राव्य खतातील कार्यक्षमता 80 टक्क्यापर्यंत असते. पालाश यासंदर्भात पारंपारिक खतातील कार्यक्षमता 60 ते 70 टक्के तर विद्राव्य खतातील कार्यक्षमता 80 ते 90 टक्के एवढी असते.
सर्वसाधारणपणे विद्राव्य खताची कार्यक्षमता कोणत्या घटकावर अवलंबून असते ?
शेतकरी बंधूंनो सर्वसाधारणपणे विद्राव्य खताची कार्यक्षमता खालील घटकावर अवलंबून असते.
(१) ठिबक संचाची आखणी व आराखडा
(२) जमिनीचे विविध भौतिक व रासायनिक गुणधर्म उदाहरणार्थ जमिनीचा सामू, विद्युत वाहकता, क्षारांचे प्रमाण, जमिनीचा पोत इत्यादी
(३) ओलितासाठी वापरलेल्या पाण्याची गुणवत्ता किंवा गुणधर्म उदाहरणार्थ ओलिताच्या पाण्याचा सामू ,विद्युत वाहकता, क्षारांचे प्रमाण इत्यादी
(४) जमिनीचे तापमान
(५) वापरत असलेल्या खताची क्षारता
(६) खत देण्याचा कालावधी व खत देण्याची उपकरणे
(७) पिकाच्या वाढीची अवस्था.
विविध पिकांना ठिबक सिंचनातून आणि फवारणीतून विद्राव्य खतांचा वापर शास्त्रोक्त रित्या कसा करावा ?
शेतकरी बंधूंनो विविध फळे भाजीपाला व इतर काही प्रमुख पिकाकरिता संबंधित कृषी विद्यापीठाने ठिबक सिंचनातून विद्राव्य खताच्या वापरासंदर्भात व फवारणीतून द्यावयाच्या विद्राव्य खताच्या वापरासंदर्भात द्यावयाच्या मात्रा ,वेळा व काळजी या संदर्भातील वेळापत्रक शिफारस केले आहे. संबंधित कृषी विद्यापीठातील संबंधित पिकातील ठिबक सिंचनातून आणि फवारणीतून संबंधित पिकात करिताची संबंधित विद्राव्य खताची शिफारस पाहून किंवा संबंधित विषयाचे तज्ञांशी संपर्क करून शास्त्रोक्त रित्या ठिबकद्वारे आणि फवारणीतून विद्राव्य खताचा माती परीक्षणाच्या आधारावर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे घटक म्हणून गरजेनुसार वापर करावा
संतुलित पणे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करून अनाठाई , अवाजवी तसेच अविवेकी रासायनिक खताचा वापर टाळून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवावी व निव्वळ उत्पन्न वाढवावे. शेतकरी बंधूंनो विद्राव्य खता संदर्भात मूलभूत संकल्पना आपणा पर्यंत पोहोचावी या दृष्टीने वरील लिखाण संकलित केले असून गरजेनुसार संबंधित विषयाचे तज्ञाकडून यासंदर्भात अधिक माहिती घेऊन संबंधित कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे त्याचा शास्त्रोक्त रित्या गरजेनुसार वापर करावा.
राजेश डवरे कीटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments