एरवी लोकांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा बोलणार म्हटल्यावर तुमच्या डोक्यात विचारांचे चक्रीवादळ सुरू होणे साहजिकच आहे. पण वाडवडील म्हणतात ना बोलणाऱ्यांचे कुळीथ विकले जातात आणि न बोलणाऱ्यांचे गहू पण विकले जात नाहीत. म्हणून मी बोलायला आलोय. कारण माझा बाप ( कांदा उत्पादक शेतकरी ) स्वतःला विकायला बांधावर उभे राहण्यापेक्षा आणि माझ्या सडत चाललेल्या त्वचेकडे बघून मनातल्या मनात कुडण्यापेक्षा मी बोललेलं बरं.माझं वय आज दहा महिन्यांच असलं तरी माझं अस्तित्व शेकडो वर्षांपासूनचे आहे. फरक
एवढाच की पुर्वी मला जास्त दिवस जवळ ठेवण्याची व्यवस्था माझ्या बापाकडे नव्हती त्यामुळे तो मला उशापाशी ठेवायला घाबरायचा.पटकन येईल त्या भावात विकून मोकळा व्हायचा.He used to be free by selling at the price that would come quickly.पण आज माझा बाप मला उरावर घेऊन बसलाय.अक्षरशः छाती दाबतेय त्याची.
हे ही वाचा - तुर पिकात मर, वांझ, मूळकुजव्या किंवा जळणे, उबळणे या अडचणी येणार, त्यासाठी हा महत्वाचा संदेश
तरी आज ना उद्या कांद्याबाबत शासनाचे धोरण बदलेल आणि माझ्या बापाला माझ्यामुळे अपेक्षित दोन पैसे भेटतील अशी खोटी आशा आहेच. कारण सत्ताधाऱ्यांनी खोटी आश्वासने खरी करून सांगितलीत. कधी विजपुरवठा बंद, कधी खतांचा तुटवडा, कधी उळ्याच्या किंमती वाढल्या,
कधी बोगस बियाणांनी थोबाडीत मारली. कधी धुक्याने करपा, कधी औषधांनी वाट लावली. कधी मजुराने लायकी काढली तर कधी वळव्याच्या पावसाने धुतलं. पण शेती निसर्गाचा जुगार आहे अशी म्हण डोक्यात भिनलेल्या माझ्या बापाने मायेचं मंगळसूत्र गहाण ठेवलं.आणि परिस्थितीशी दोन हात करत मला लालबुंद रंगातच जन्माला घातलं. जन्म झाल्या झाल्या यावर्षी कांद्याच विक्रमी उत्पादन झालंय आणि यामुळे बाजारभाव लवकर वाढणार नाहीत अशी राजकारण्यांनी मिडीयामार्फत पेरलेल्या
बातम्या कानावर आल्या. तेव्हाच वाटलं स्वतःच्या पायावर उभे राहण्याआधीच माझे पाय कापण्याचं काम या दळभद्री राजकारण्यांनी केलं. पण माझ्या बापाने गेल्या कित्येक वर्षात माझ्यामुळे ( कांद्यामुळे ) सरकार पाडल्याचे मला ज्ञात असल्याने मी पण धीराने बापाने बनवलेल्या चाळीत जावुन निवांत पडलो. आजच भाव वाढेल उद्याच भाव वाढेल. मला आजच परदेशात जायला मिळेल आणि माझ्या बापाला निदान घामाचा दाम दिल्याच्या आनंदात मी विदेशवारी करेल अशी स्वप्नं पाहतं होतो. पण
शासनाच्या धोरणांनी माझा पासपोर्ट तयार होणार नाही. मला व्हिसा मिळणार नाही. आणि मिळाला तरी बाहेर देशात जायची संधी मिळणार नाही याची व्यवस्था केली. इतकं कमी असावे की काय म्हणून इतर देशांतल्या कांद्याला आयात करण्याची धमकी पण दिली. यावर कळस करतांना मला घेणारे व्यापाऱ्यांच्या गोडावुन वर छापेमारी, निर्यातबंदी, निर्यातमूल्यात वाढ या गोष्टींची भेट दिली.आणि बाजारभाव स्थिर कसे राहतील याची काळजी घेतली. कमवणाऱ्यांपेक्षा खाणारे जास्त आहेत याचा हिशोब ठेवणारे सरकार जगाचा पोशिंदा म्हणून गौरव
करणाऱ्या माझ्या शेतकरी बापाला कधी हिशोबात पकडेल माहीत नाही. पण माझा बाप येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भामट्यांना आणि नतद्रष्ट्या राजकारण्यांना जागा दाखवेल एवढं नक्की. एकीकडे आज माझ्या बापाकडून तुम्हाला एका मताशिवाय दुसरा फायदा नाही.दुसरीकडे विकास कामांमध्ये मिळणारा मलिदा तुम्हाला मिळतोय. म्हणून तुम्ही पुढाऱ्यांनी नेत्यांनी विकासकामे जरूर करावीत पण वर्षानुवर्षे ढीली होत जाणारी बाजारू व्यवस्था सुधरेल, शेतकरयांना मदत होईल म्हणून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून
एखाद्या शिष्टमंडळात शेतकरी म्हणून समाविष्ट होऊन प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, कृषीमंत्री यांना निवेदन देण्याची आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची पण तयारी ठेवावी. नाहीतर फुलांच्या सत्काराऐवजी कांद्याच्या माळा घेऊन सत्कार करायला आणि जाब विचारायला माझा स्वाभिमानी बाप आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या बापाच्या कांद्यासाठी वेळीच योग्य धोरण ठरवा. नाहीतर माझा कांदा पिकवणारा शेतकरी बाप तुमच्या आयुष्यातील ध्येय धोरणांचा वांदा केल्याशिवाय राहणार नाही.
वसंत भामरे
Share your comments