आपण केवळ परसबाग सांभाळणारे आहात की व्यावसायिक दृष्ट्या रोपवाटिका (नर्सरी) चालवता? काहीही असले तरी बागमासाठी पूर्ण ज्ञान आवश्यक असते.
कोणताही व्यवसाय, छंद जोपासला तरी त्यात अडचणी येतातच. अडचणीवर मात करूनच यशस्वी होता येते. बाग असो वा शेती, जर बी-बियाणे खात्रीचे असेल तरच उत्पन्न हाती येते. याकरिता नेहमी चांगले बी-बियाणेच वापरावे. म्हणजे उत्पन्न केलेल्या फळे, फुले व पालेभाज्यांमध्ये गुणवत्ता उतरेल. अशा फुलेफळे आणि उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात वाढ होते त्या साठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बियाणे निवड करताना चांगले व सुदृढ निरोगी रोग किडी मुक्त बियाणे निवड करावी
चांगल्या बी-बियाणांबद्दल काही मुद्दे ः-
1) निवडलेले / घेतलेले बी-बियाणे वजन, रंग-रुप तसेच आकार याबाबतीत योग्य असावे.
2) योग्य बीज चांगल्या प्रकारे अंकुरित होऊन बहरते व फळे-फुले देते.
3) बीज स्वच्छ, एका आकाराचे असावे, त्यात कचरा, कोंडा, इतर बीज नसावे.
4) बी-बियाणे पूर्णपणे वाळलेले असावे. ते ओलसर नसावे. म्हणजे काही दिवस ठेवले तरी त्यांना बुरशी-भुरा लागणार नाही.
5) बीज निरोगी असले पाहिजे. तुकडा पडलेले, किडीने खाल्लेले व खूप जुने नसावे. किडक्या बीजाचे अंकुरण चांगले होत नाही. त्यामुळे श्रम वाया जातात. बी अंकुरले तरी ते मरते.
6) तुम्ही बी-बियाणे खरेदी करत असाल किंवा पेरत असाल तर त्या बी-बियाणांचा आकार-प्रकार एकसारखा असावा म्हणजे रोपटी एकसमान व सुदृढ होतील.
अंकुरण्याची टक्केवारी ः-
चांगले बी-बियाणे म्हणजे पेरल्यावर 60 ते 70 टक्के उगवून येते ते. कधीही 100 टक्के अंकुरण होत नसते. परंतु 60टक्क्यांपेक्षा कमी अंकुरण झाल्यास ते बी-बियाणे योग्य मानले जात नाही.
जुने बी-बियाणे टाळाः-
जुने बी-बियाणे वापरल्यास त्याचे अंकुरण कमी होते. त्यासाठी नेहमी नवे बीज खरेदी करावे व त्याची पेरणी करावी. नवे बी-बियाणे लवकर उगवूनयेतात. तसेच उगवणीनंतर सर्व रोपटी समान दिसतात.
रोगप्रतिबंधक व कीड प्रतिबंधक बी-बियाणे ः-
कृषिभांडारात व नर्सरीत भाजीपाल्याचे व फुलझाडांचे बीज स्वच्छ केलेले, रोगप्रतिबंधक संस्कार केलेले विकत मिळतात. ते उपचारीत असल्यामुळे कीडप्रतिबंधकही असतात. असे बी-बियाणे पेरले असता रोगाचे वा किडीचे भर राहत नाही. नेहमी खात्रीचेच बी-बियाणे खरेदी करा व शेतात पेरा. म्हणजे उत्पन्न चांगले मिळेल.
रोगट व हलके बीज टाळा ः-
बी-बियाणे हाच पीक उत्पादनाचा महत्त्वाचा व मूळ आधार आहे. म्हणूनच बीज खरेदी करताना सावधानता हवी. रोगट, हलक्या प्रतीचे बीज श्रम, पैसा, खत वाया घत्तलवतात. बीज एका आकाराचे असावे. पोचट, संकुचित, आखडलेले बीज वापरल्यास रोपटीही कमजोर व रेागट येतात. ते वारा, उन्ह, पाऊसमारा यांचा सामना करू शकत नाहीत. याकरिता बी-बियाणे चांगले व खात्रीचेच घ्यावे.
आपल्याच शेतातील बी-बियाणे ः-
बरेच शेतकरी आपले पीक घेतल्यानंतर त्यातील चांगले,टपोरे बी-बियाणे निवडून पुढील पेरणीसाठी रोगप्रतिबंधक संस्कार करून जपून ठेवतात. तर काही शेतकरी केवह चांगल्या बियाण्यांसाठी शेती करतात आणि बियाणे विक्री करतात.
मातीचे गादी वाफे व आळे तयार करणे ः-
शेतातून पाटाचे पाणी वाहण्यासाठी व्ही आकाराचे मातीचे गादी वाफे तयार केले जातात. वरच्या फुगीर मातीत बी-बियाणे पेरतात तर खालच्या यू आकारातून पाणी वाहते ग्रामीण भागात पाणी पुरवठा संस्था शेताला पाणी देण्याच्या तारखा शेतकर्यांना नेमून देत असतात. या गादी वाफ्यामुळेच शेतात चौफेर पाणी फिरते. शेतकरी याला दारीधरणे म्हणतात. तर आळे हे गोल असते. त्यात झाड किंवा रोपटी लावतात. आळ्याला खोडाच्या मुळाशी घमेल्यासारखा खळगा असल्याने जलसिंचनाचे पाणी साचते व रोपाच्या/झाडाच्या मुळापर्यंत पोहोचते. ही आळी व गादीवाफे पिकासाठी कसे तयार
असावेत/करावेत यासंबंधी काही मुद्दे-
1) गादी वाफ्यात वा आळ्यात वाढणारे निरुपयोगी गवत व इतर रोपटी काढून टाकावीत.
2 ) जिथे बीज पेरले आहे त्या चढावर सेंद्रीय खत किंवा रासायनिक खत फवारावे. म्हणज ेरेापटी तरारून वाढतील.
3 ) माती चांगल्या उन्हातील व रोगप्रतिबंधक औषधे दिलली असावी म्हणजे रोगजंतू वा किडीचा प्रादुर्भाव होणार नाही.
4 ) दरवर्षी तेच ते पीक घेऊ नये. नेहमी आलटून-पालटून शेती करावी. पीकचक्र बदलते असावे.
5) शेतातील माती जेवढी बारीक व नांगरटीने खणलेली असे तर ती पीकवाढीला उत्तम असते.
6) शेती कसत/करत असताना रोपाच्या बाल्यावस्थेत व उभ्या पिकाला पाणी कमी पडू देऊ नये. पाण्याचा ताण शेतपिकाला हानिकारक असतो.
7) शेतात चौफेर जलसिंचन अथवा पाटाचे पाणी फिरले पाहिजे. तसेच जादा झालेले पाणी साचून राहणेही योग्य नाही.
बी-बियाणे आणि पेरणीः-
कोणत्या जातीचे बी रोपायचे आहे, याचा विचार करता पुढील मुद्देही विचारात घ्यावेत.
1) बी-बियाणे अधिक उत्पन्न देणारे असावे.
2) परिसर, हवा-पाणी त्या बी-बियाण्यास पूरक असावे.
3) बीज रोगप्रतिबंधक संस्काराचे व अंकुरणेस समर्थ असावे.
4) बीज आधी भिजवून मग रोपायचे आहे की थेट लावायचे आहे ?
5) बीज थेट शेतात पेरायचे आहे की रोपटी तयार करून ती सारी आखून लावायची आहेत?
रासायनिक खते व खतांचे प्रमाण ः-
बीज पेरणी करून शेती पिकवायची असल्यास, त्या बीजाला योग्य असे कोणते रासायनिक खत किती प्रमाणात, तसेच खताचे प्रमाण आणि आपल्याकडे असणार्या जमिनीचे क्षेत्रफळ विचारात घेऊन निर्णय घ्यावा लागतो.
केव्हा आणि कोणते रासायनिक खत शेताला द्यायचे आहे याचे ज्ञान असले पाहिजे. नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम ही तीन रासायनिक खतांची प्रमुख तत्त्वे आहेत. ती योग्य प्रमाणातच (गरजेएवढी) खरेदी करावीत. ही खते शेताला कमी पडल्यास रोपटी सुदृढ होणार नाहीत की कणसात दाणे भरणार नाहीत.
नायट्रोजनमुळे पिकांची वाढ होते. फॉस्फरस बीज व पिकांच्या उन्नतीस साहाय्यकारी आहे. काहीवेळा या दोन्ही खतांचे मिश्रणद्यावे लागते. तसेच पोटॅशियमही आवश्यकतेनुसार द्यावे लागते. अनुभवी शेतकरी सल्ल्यानुसार तसेच पीकवाढीत कमतरता दिसून येताच वरील रासायनिक खते शेतीला देत असतो. याशिवाय गंधक, कॅल्शियम, लोह, जस्त, तांबे, मॅग्नेशियम, बोरोन यांचे डोसही शेतीला आवश्यकतेनुसार दिले जातात. त्यामुळे पीक आणि पिकाचे कणीस व त्यातले दाणे उन्नत होतात. शेतकर्यांना कृषिविषयक सल्ले टी.व्ही. चॅनेलवरून, कृषी विद्यापीठातून तसेच कृषी तज्ज्ञांकडून मिळू शकतात.
Share your comments