1) सल्फर /गंधक
अतिशय सुरक्षित बुरशीनाशक म्हणून सल्फर / गंधक वापरले जाते. भाजीपाला पिके, फळबाग, फुलबाग मध्ये प्रामुख्याने सल्फर वापरले जाते. सल्फर जमिनीतूनही मिळते तसेच पेट्रोलियम पदार्थ बनताना त्यातूनही मिळते. त्याचे इतर अनेक उपयोगही आहेत जसे सल्फ्युरिक अॅॅसिड. फळबागेत बहर येण्यापूर्वी सल्फरची धुरळणी किंवा फवारणी करतात. तसेच छाटणी नंतर नवे शेंडे येताना त्यावर कोणत्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वापर होतो. पावडरी मिल्ड्यू / भुरी, रस्ट, ब्राऊन रॉट, ब्लॅक रॉट, स्क्ँब आदी बुरशीजन्य रोगावर गंधक चालते. याची पावडर चमकदार पिवळ्या रंगाची असते. अनेक बियाण्याला बीज प्रक्रिया म्हणूनही गंधक पावडर चोळली जाते. बुरशी शिवाय फुलकिडे, कोळी, स्केल आदी किडींच्या नियंत्रणासाठी सुद्धा गंधकाचा उपयोग होतो. द्राक्षे, स्ट्राबेरी, बोर, संत्र, मोसंबी, लिंबू यासारख्या फळपिकासाठी गंधक खूप उपयोगी आहे. अनेक बुरशीनाशकाच्या एकत्रित पाने सुष गंधक फवारले तरी चालते. विशेष म्हणजे हे हानिकारक नाही तसेच भूसुधारक म्हणूनही काम करते. जमिनीवर धुरळणी केल्यास जमीनीत बुरशीचे अंश नष्ट होतात, जमिनीचा पेच काही प्रमाणात कमी होतो. तेलबिया पिकासाठी जमिनीतून दिल्यास तेलांश वाढतो.
2- हेक्साकोनॅझोल
धान गहू, कडधान्ये, भुईमूग, आंबा, द्राक्षे अशा विविध पिकावरील भुरी, स्क्रब, ब्लॅक रॉट, विल्ट, अँथ्रोक्नोज सारख्या हानिकारक अशा बुरशीजन्य रोगावर हेक्सकोनॅझोल हे बुरशीनाशक प्रभावीपणे काम करते. टमाटे, कांदा आणि इतर भाजीपाला पिकावर याचा उपयोग होतो. हे औषध प्रतिबंधात्मक, उपचारात्मक आणि बुरशीचा समूळनाश अशा सर्व स्तरावर काम करते. वनस्पतीच्या खोड, पानातून फार त्वरित शोषले जाते आणि दीर्घकाळ पिकाची बुरशीविरोधी प्रतिकार शक्ती कायम ठेवते. मातीतून येणारी बुरशी आणि बियाण्यातून येणारी बुरशी दोन्हीवरही नियंत्रण ठेवते. हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. पशु, पक्षी, मानव या सर्वासाठी अतिशय कमी हानिकारक आहे. कॅप्टब या बुरशीनाशकाबरोबर संयुक्तपणे फवारल्यास अधिक परिणाम कारक ठरते. इतर बुरशीनाशकापेक्षा तिप्पट वेगाने हे बुरशी नाशक रोग नियंत्रणात आणते. पिकावर आलटून पालटून जी बुरशीनाशके फवारावे लागतात त्यात दर दोन तीन फवारणी नंतर हेक्सकोनॅझोल हे बुरशीनाशक फवारल्यास अधिक प्रभावी होऊ शकते. पीक रोगमुक्त राहू शकते.
3)- मेटॅलॅक्सिल
पायथियम आणि फायटोफथोरा प्रकारच्या बुरशीच्या विनाशासाठी मेटॅलॅक्सिल हे बुरशीनाशक वापरले जाते. हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. विशेष करून भाजीपाला पिके यावर पायथियम या बुरशीचा प्रादुर्भाव होतो, तर फायटोफथोरा या बुरशीचा प्रादुर्भाव कडधान्य पिकावर जास्त प्रमाणात होतो. या बुरशीमुळे डाऊनी मिल्ड्यू, ब्लाईट, स्टेम रॉट, रूट रॉट असे बुरशीजन्य रोग होतात. हे बुरशीनाशक जमिनीतून आणि फवारणी द्वारे देता येते
. जमिनीत भूस्तरावर फवारणी करून, ड्रेचिंग आणि बीज प्रक्रिया करून उपयोगात आणले जाते. साधारणपणे फाळणी केल्यानंतर ३० मिनिटात हे औषध पानांद्वारे शोषले जाते. यामुळे बुरशीची वाढ रोखली जाते, उत्पादन थांबते शिवाय आहे ती बुरशी नष्ट होते. वेलवर्गीय भाजीपाला पिकावर डाऊनी मिल्ड्यू आणि बटाटे, मिरची, कापूस, आणि तुरी, मूग, उडीद ,हरभरा ,हळद पिकावर ब्लाईट (करपा) रोग येतो. मुळावर आणि खोडावर या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यावर मुळे कुजतात आणि खोडावर चट्टे पडतात तेथील साल मृत होते. या बुरशीमुळे झाडाची प्रकाश संस्लेशन ( फोटोसिंथेसिस ) क्रिया मंदावते आणि झाडाच्या वाढीवर / उत्पादनावर परिणाम होतो. हे औषध पुन्हा पुन्हा आणि अति प्रमाणात वापरणे घटक आहे. त्याचे अंश उरतात त्यामुळे साठलेले पाणी, जमीन दूषित होते.
4) - कार्बनडेझीम
प्रामुख्याने फायटोफथोरा या बुरशीमुळे पावडरी मिल्ड्यू / भुरी रोग येतो त्याच्या नियंत्रणासाठी तसेच मूळकूज, करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बनडेझीम या बुरशी नाशकांचा वापर केला जातो. मोसंबी, संत्र, लिंबू, स्ट्राबेरी, केळी, डाळिंब अशा फळझाडांवरील भुरी रोग नियंत्रणासाठी या बुरशीनाशकाचा वापर केला जातो. तसेच टमाटे, बटाटे, वांगे, टरबूज, काकडी आणि अन्य भाजीपाला पिके यांच्यावर करपा रोग येतो तसेच फुजारियम विल्ट आणि व्हर्टिसिलियम विल्ट हे रोग येतात त्यामुळे पाने तर कधी पूर्ण झाड जळून जाते. या बुरशीनाशकाची फिकट भुरकी पावडर मिळते तसेच दाणेदार हि मिळते. पिकांच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात दर सात दिवसांनी २/३ वेळा या बुरशीनाशकाची फवारणी केल्यास रोग येत नाही. ड्रेचिंग करून जमिनीतील हानिकारक बुरशी नष्ट करता येते. या बुरशीनाशकासोबत अन्य बुरशीनाशक एकत्र करून फवारले तरी चालते. बीज प्रक्रिया करताना प्रति किलो बियाण्यास ०.२ टक्के हे औषध चोळल्यास रोपे निरोगी राहतात, उगवण पूर्ण होते. हे औषध जास्त प्रमाणात, पुन्हा पुन्हा फवारू नये, त्यामुळे बुरशीच्या प्रतिकारशक्ती तयार होते.
- गोपाल उगले
Share your comments