यवतमाळ : बुधवारचा दिवस कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरला. कापसाची अत्यल्प उपलब्धता आणि त्यातच बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी वाढल्याने जिल्ह्यातील चार ठिकाणी कापसाच्या दराने दहा हजाराचा टप्पा ओलांडला. फुलसावंगी बाजारपेठेत कापसाला सर्वाधिक १० हजार ४०० रुपयांचा विक्रमी दर मिळाला. यवतमाळ, राळेगाव आणि वणी बाजारपेठेतही कापसाचा दर दहा हजारांच्या पार झाला. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या ५० वर्षांच्या इतिहासात बुधवारी पहिल्यांदाच कापसाला दहा हजारांहून अधिकचा दर मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सुखावला आहे. पुढील काही दिवस कापसाचे दर चढेच राहण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला. त्यामुळे गत आठ दिवसांपासून कापसाचे दर सारखे वाढत होते. त्यातच सरकीचे दर २८०० रुपयांवरून चार हजार रुपये क्विंटलवर पोहोचल्याने खुल्या बाजारपेठेत कापसाच्या दराला झळाळी मिळाली आहे. पर्यायाने जिल्ह्यात कापसाचे दर विक्रमी १० हजाराचा टप्पा ओलांडू शकले. जिल्ह्यात बुधवारी ३२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली.
जिल्ह्यातील यवतमाळ, फुलसावंगी, राळेगाव, वणी, वाढोणा बाजार, कळंब, घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर या बाजार
समित्यांमध्ये बुधवारी कापसाची आवक वाढली. याचवेळी कापसाचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. कापसाचा हमीदर सहा हजार २५ रुपये आहे. तर खुल्या बाजारात कापसाचे दर दहा हजार ४०० रुपये आहेत. शासकीय दर आणि बाजारपेठेतील दरात चार हजार रुपयांचा फरक आहे. हमी दराच्या तुलनेत खुल्या बाजारात सध्या ६६ टक्के जादा दराने खरेदी सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी सरासरी २५ ते ३० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होते.
अशाप्रकारे बुधवारचा दिवस कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरला. कापसाची अत्यल्प उपलब्धता आणि त्यातच बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी आनंदी दिसुन येत आहेत.
Share your comments