सोयाबीनची पेरणी खरीप हंगामात पावसाला सुरुवात झाल्यानंतर १५ जून ते १५ जुलैपर्यंत व ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच करावी. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते.
सोयाबीनची पेरणी खरीप हंगामात पावसाला सुरुवात झाल्यानंतर १५ जून ते १५ जुलैपर्यंत व ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच करावी. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते.
जमिनीची २ ते ३ वर्षांत किमान एकदा उन्हाळ्यामध्ये एक खोल (३० ते ४५ सें.मी.) नांगरणी करून नांगरणीच्या विरुद्ध दिशेने वखराच्या २-३ पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० गाड्या (५ टन) शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे. शेणखतामुळे जमीन चांगली भुसभुशीत राहते. पिकाच्या मुळ्या खोलवर जाऊन पिकाची जोमदार वाढ होण्यास मदत होते.
बीजप्रक्रिया
सोयाबीनवर येणाऱ्या विविध रोगांसाठी रोग आल्यानंतर बुरशीनाशकांची फवारणी घेण्यापेक्षा पेरणीपूर्वीच बीजप्रक्रिया केल्यास सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रोगांचे व्यवस्थापन उत्तम होते.
पेरणीपूर्वी कार्बोक्झीन (३७.५%) अधिक थायरम (३७.५%) (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम प्रति किलो बीजप्रक्रिया केल्यास कॉलर रॉट, चारकोल रॉट व रोपावस्थेतील अन्य रोगांपासून संरक्षण होते.
या प्रक्रियेनंतर ब्रेडी रायझोबिअम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत (पीएसबी) २५ ग्रॅम प्रत्येकी प्रति किलो बियाणे अशी प्रक्रिया करावी. किंवा बीजप्रक्रियेसाठी वनामकृवि, परभणी निर्मित द्रवरूप जैविक खत रायझोफॉस १० मि.लि. प्रति किलो बियाणे याप्रमाणे वापर करावा.
बियाणे प्रक्रियेनंतर सावलीमध्ये वाळवून शक्य तेवढ्या लवकर पेरणी करावी.
ब्रेडी रायझोबियम या जिवाणू संवर्धनाची पेरणीच्यावेळी बीजप्रक्रिया केल्यास सहजीवी जिवाणूंच्या गाठींची संख्या वाढते. हे जिवाणू हवेतील नत्र शोषून घेऊन जमिनीमध्ये नत्राचे स्थिरीकरण करतात. हे नत्र पिकास उपलब्ध होते. स्फुरद विरघळणारे जिवाणू ‘स्फुरद’ हे अन्नद्रव्य पिकास वाढीच्या काळात उपलब्ध करून देतात.
पेरणी
सोयाबीनची पेरणी खरीप हंगामात पावसाला सुरुवात झाल्यानंतर १५ जून ते १५ जुलै पर्यंत व ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते.
लागवडीचे अंतर व पद्धत
सोयाबीनची पेरणी ४५ × ५ सें.मी. अंतरावर व ३ ते ४ सें.मी. खोलीवर करावी. पेरणीच्या वेळेस बियाणे जास्त खोल पडल्यास व्यवस्थित उगवण होत नाही.
हंगामात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी सोयाबीनची पेरणी बीबीएफ यंत्राने करावी किंवा दर चार ते पाच ओळीनंतर चर काढावेत.
बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पद्धतीचे फायदे
बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पद्धतीमुळे पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरते, त्यामुळे मूलस्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकास, तसेच पुढील हंगामातील पिकांस लाभ होतो. विशेषत: पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो.
अधिक पावसाच्या स्थितीत बीबीएफ पद्धतीमधील रुंद वरंब्यासोबतच्या दोन्ही बाजूकडील सऱ्यांमुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.
गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. परिणामी, बियाण्याची उगवण चांगली होते.
बीबीएफ पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीच्या (सपाट वाफे पद्धत) तुलनेत सरासरी २० ते २५ टक्के पर्यंत अधिक जलसंधारण होते तर २० ते २५ टक्के पर्यंत उत्पादनात वाढ शक्य होऊ शकते.
बियाण्याचे प्रमाण
पेरणीसाठी हेक्टरी ६५ किलो बियाणे वापरावे. हेक्टरी झाडांची संख्या ४.४ ते ४.५ लाख ठेवावी. बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के असावी.
आंतरमशागत
सोयाबीन पिकामध्ये येणाऱ्या तणांचे योग्य वेळी नियंत्रण न केल्यास उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्के पर्यंत घट येवू शकते. त्यामुळे पीक १५ ते २० दिवसांचे असताना पहिली कोळपणी व पीक २५ ते ३० दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. एक खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे.
एकदा सोयाबीनला फुले लागली की कोळपणी करू नये, अन्यथा सोयाबीनच्या मुळ्या तुटून नुकसान होते.
पावसामुळे किंवा मजुरांच्या कमतरतेमुळे निंदणी/कोळपणी करणे शक्य नसल्यास तण नाशकाचा वापर करावा. यामध्ये पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी पेंडीमिथॅलीन (३०% ईसी) २.५ ते ३.३ लिटर प्रति हेक्टर) किंवा मेटाक्लोर (५०% ईसी) किंवा क्लोमाझोन (५० % ईसी) २ लिटर/हे.) प्रति ६०० ते ७०० लिटर पाण्यात मिसळून हेक्टरी फवारावे.
पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी व तणे २ ते ४ पानांच्या अवस्थेत असताना क्लोरीम्युरॉन इथाईल (२५% डब्ल्यूपी) ३६ ग्रॅम प्रति हेक्टर किंवा इमॅझेथापायर (१०% एसएल) किंवा क्विझालोफॉप इथाईल (५% ईसी) १ लिटर प्रति हेक्टर यांचे ६००-७०० लिटर पाण्यामध्ये मिसळून हेक्टरी फवारणी करावी.
तणनाशकाची फवारणी फ्लॅट पॅन किंवा फ्लड जेट नोझल लावून ओलावा असलेल्या जमिनीवरच केली पाहिजे. तणे वाढल्यानंतर तणनाशके फवारल्यास त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही.
Share your comments