पिकांसाठी आवश्यक नत्र, स्फुरद आणि पालाश यांच्या उपलब्धतेसाठी जैविक खते उपयुक्त ठरतात. या खतांचा वापर योग्य प्रकारे केल्यास जमिनीची सुपीकता वाढून पिकांच्या उत्पादनामध्ये १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होते.
काही जिवाणू हवेतील नायट्रोजन (नत्र) शोषून व साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. या जिवाणूंची प्रयोगशाळेत वाढ करून, त्यापासून खते तयार केली जातात. अलीकडे जमिनीतून स्फुरद, पालाश, झिंक व लोह इत्यादी अन्नद्रव्यांची उपलब्धता करणारी जिवाणू खतेही उपलब्ध झाली आहेत.
शेंगावर्गीय पिके आणि भुईमूग बियाण्यास रायझोबियम अधिक पी.एस.बी. ही जिवाणू खते प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो या प्रमाणात पेरणीआधी बीजप्रक्रिया करावी.गहू, ज्वारी, मका या पिकांच्या पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅक्टर + पी.एस.बी. प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
उत्तम परिणाम मिळविण्यासाठी
1) बाजारातून जिवाणू खते आणताना, त्यात उपयुक्त जिवाणू प्रजाती व संख्या असल्याची खात्री करावी.
२) खात्रीलायक ठिकाणावरूनच खरेदी करावी, अन्यथा भेसळीची शक्यता असते.
३) विविध जिवाणू खते एकत्र वापरण्यायोग्य असल्याची काळजी घ्यावी.
४)वापरण्याची पद्धत, वेळ व प्रमाण पाकिटावर दिल्याप्रमाणे वापरावी.
५)बीजप्रक्रिया करताना योग्य व चांगले स्टिकर (चिकट पदार्थ) वापरावे.
६)क्षारपड जमिनीत व इतर खराब झालेल्या जमिनीत वापर करावयाचे असल्यास जिप्सम वा लाइम वापरावे.
७)स्फुरद आणि इतर अन्नद्रव्ये पिकास योग्य प्रमाणात पुरवावीत.
८)जिवाणू खतातील जिवाणू अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी जमिनीत ओलावा आवश्यक आहे.
९)जमिनीत जिवाणू खत मिसळताना किमान ५० किलो शेणखत किंवा गांडूळ खतात मिसळून द्यावे.
जिवाणू खते वापरताना:
१)जिवाणू खते सूर्यप्रकाश व उष्णतेपासून दूर, थंड व कोरड्या जागी साठवावीत.
२) रायझोबियम खते पीकनिहाय वापरावीत.
३) जिवाणू खते रासायनिक खतात मिसळून वापरू नयेत.
४)जिवाणू खते शक्यतो ताजी असावीत.
५) जिवाणू खते दिली तरी पिकांना रासायनिक खतांच्या योग्य मात्रा देणे आवश्यक आहे.
६)जिवाणू खते विकत घेताना पाकिटावरील खताचे नाव, कोणत्या पिकासाठी वापरावे, निर्मात्याचे नाव व पत्ता, उत्पादन तारीख, वापरण्याची अंतिम तारीख, बॅच नंबर आणि वापरण्याची पद्धत इत्यादी माहिती पाहून घ्यावी.
जिवाणू खतांचा वापर प्रामुख्याने बीजप्रक्रियेसाठी करावा.
फायदे :
१)शेंगावर्गीय पिकांमध्ये जिवाणू खतांचा वापर केल्यास नत्रयुक्त गाठींचे प्रमाण मुळांवर वाढते. हे जिवाणू हवा व जमिनीतील नत्र झाडाला उपलब्ध करतात. जिवाणूंमुळे जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विविध रूपांतून मुक्त करून मुळांना उपलब्ध केले जाते.
२)जिवाणू मातीतील सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात कुजवितात. या प्रक्रियेत विविध सेंद्रिय आम्ले तयार होतात, त्यामुळे विविध अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
जिवाणू खतांचे प्रमाण अत्यंत कमी असून, कमी खर्चात उपलब्ध होतात. मात्र, उत्पादनात १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होते.
३)जमिनीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांत उपयुक्त बदल होतात.
४) पिकासाठी वापरलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
शेतातील मातीची सुपीकता टिकण्यास मदत होते.
Share your comments