MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

खतांचा अन्न-वनस्पतींवर होणारा परिणाम

पशुधन व मानव यांचे अन्न असलेल्या वनस्पतींवर खतांचा अनेक प्रकारे परिणाम होत असतो.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
खतांचा अन्न-वनस्पतींवर होणारा परिणाम

खतांचा अन्न-वनस्पतींवर होणारा परिणाम

पशुधन व मानव यांचे अन्न असलेल्या वनस्पतींवर खतांचा अनेक प्रकारे परिणाम होत असतो. (१) उत्पन्न वाढते व त्यामुळे उपलब्ध वनस्पतींचे प्रमाण वाढते, (२) जमिनीत वेगवेगळ्या जातींची पिके घेणे शक्य होते व (३) खनिजे, जीवनसत्त्वे, प्रथिने इत्यादींच्या प्रमाणानुसार वनस्पतींच्या व्यक्तिगत जातीचे रासायनिक संघटन बदलते. खनिज संघटनावर होणाऱ्या खतांच्या परिणामासंबंधी उपलब्ध असलेल्या माहितीच्या मानाने जीवनसत्त्वे, प्रथिनांची प्रत आणि हॉर्मोने [जीवरासायनिक प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणारे पदार्थ, → हॉर्मोने] यांवर होणाऱ्या परिणामासंबंधीची माहिती फारशी उपलब्ध नाही. संशोधनावरून असे निदर्शनास आले आहे की, या बाबतीत मृदा घटकांपेक्षा जलवायुमानाचे (दीर्घकालीन सरासरी हवामानाचे) घटक जास्त परिणामकारक असतात.

चरणाऱ्या जनावरांना त्यांचे खाद्य प्रत्यक्ष जमिनीतून मिळत असते त्यामुळे जमिनीची सुपीकता व खते यांच्याशी निगडीत असलेल्या पोषण उणिवा अशा जनावरांत सामान्यत: दिसून येतात. 

चाऱ्याच्या पिकांत फॉस्फरसाचे अत्यंत अल्प प्रमाण ही चरणाऱ्या जनावरांमध्ये सर्वत्र आढळणारी व आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची पोषण समस्या आहे. दक्षिण आफ्रिकेतील चाऱ्यात फॉस्फरस व कॅल्शियम यांच्या उणिवेमुळे जनावरांचा ‘स्टिफसीक्टी’ नावाचा रोग होतो. कोबाल्टाची उणीव जगाच्या बऱ्याच भागांत आढळते. दूध, लोणी, मांस व इतर प्राणिजन्य पदार्थ यांचा मानवाच्या आहारात भरपूर समावेश असतो, त्यामुळे खते व जमिनीची सुपीकता यांचा पशुधनाच्या उत्पादनावरील परिणाम ही महत्त्वाची बाब आहे. खते व जमिनीची सुपीकता यांचा प्रत्यक्ष परिणाम मानवापेक्षा पशुधनावर जास्त होतो. याचे कारण म्हणजे मानव बहुधा वनस्पतीची जी फळे व धान्य खातो, त्यांवर खोड व पाने यांच्यापेक्षा जमिनीच्या सुपीकतेचा त्या मानाने कमी परिणाम होतो, तर खोड व पाने हीच पशुधनाच्या आहारात जास्त प्रमाणात असतात. आयोडिनाच्या उणिवेमुळे होणारा गलगंड हा विकार हे जमीन व मानवी आरोग्य यांच्यातील प्रत्यक्ष संबंधाचे उत्तम उदाहरण होय. सूक्ष्मजंतू, गांडूळ आणि जमिनीतील इतर जीव यांवरील खताचे परिणाम हीसुद्धा महत्त्वाची बाब आहे. खतांचा योग्य प्रमाणात वापर केला तरच ती धोकादायक नसतात असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

खत देण्याची पद्धत : दिलेल्या खताचा भरपूर फायदा व्हावा म्हणून ते योग्य वेळी व योग्य ठिकाणी देणे आवश्यक असते. खताचे स्वरूप, जमिनीचा प्रकार व पिकाचे स्वरूप तसेच त्याची पोषण द्रव्यांची गरज यांनुसार खत देण्याची पद्धत व वेळ बदलतात. पिकाला नायट्रोजनयुक्त खतांची गरज त्याच्या वाढीच्या सर्व काळात असते. ही खते पाण्यात विद्राव्य असल्यामुळे जमिनीत लवकर मुरून जातात. म्हणून अशा खताची सर्व मात्रा एकदम न देता थोडी थोडी हप्त्याने देतात. सुरुवातीच्या 

मुळांच्या विकासाच्या काळात व वाढीच्या काळात फॉस्फरसाची गरज असते. यामुळे वनस्पतीचे वजन जेव्हा तिच्या शुष्क वजनाच्या १/३ होते त्यावेळी ती फॉस्फरसाच्या एकूण गरजेच्या २/३ फॉस्फरस उपयोगात आणते. फॉस्फरसयुक्त खतातून पिकांना फॉस्फरसाचा पुरवठा हळू होतो. सुपरफॉस्फेटाच्या बाबतीतही ही गोष्ट चांगली प्रत्ययास येते. म्हणून फॉस्फरसयुक्त खतांची सर्व मात्रा पेरणीपूर्वी अगर लागवडीपूर्वी देतात. पोटॅशाचे वर्तन अंशत: नायट्रोजनासारखे व अंशत: फॉस्फरसासारखे असते. नायट्रोजनाप्रमाणे वाढीच्या सर्व काळात त्याचे शोषण होते. तथापि फॉस्फरसयुक्त खताप्रमाणे ते पिकाला हळू मिळते. म्हणून पेरणीच्या वेळेला अगर पूर्वी पोटॅशयुक्त खताची सर्व मात्रा देतात.

घनरूप खत देण्याची पद्धती : विकिरण : यामध्ये सर्व खत शेतात सर्वत्र एकसारखे देतात. हे जमीन नांगरण्यापूर्वी, पेरणीपूर्वी काही काळ किंवा उभ्या पिकालाही देतात. पेरणीच्या वेळी खत देणे व उपरिवेशन असे याचे दोन प्रकार आहेत. पेरणीच्या वेळी खत देताना ते सर्वत्र एकसारखे व जमिनीत खोलवर दिले जाते. यावेळी खताची मोठी मात्रा देता येते. उभ्या पिकाला खत देण्याच्या पद्धतीस उपरिवेशन म्हणतात. विशेषत: भात, गहू इत्यादींसारख्या दाट पिकांना नायट्रोजनयुक्त खतांचे उपरिवेशन करतात. कुरणांना फॉस्फरसयुक्त व पोटॅशियमयुक्त खतांचे उपरिवेशन करतात. उपरिवेशनाच्या वेळी खत ओल्या पानांवर पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते, नाहीतर त्यामुळे करचळण (पोळण्यासारखी क्रिया) होते. ही भीती फॉस्फरसयुक्त खतापेक्षा नायट्रोजनयुक्त व पोटॅशियमयुक्त खतांच्या बाबतीत जास्त असते. न्यूझीलंड व अमेरिकेत उपरिवेशनासाठी विमानाचा उपयोग करतात.

या पद्धतीत बी, रोप आणि वाढणारी वनस्पती यांच्या ठिकाणाचा विचार न करता खत दिले जाते. यामध्ये (१) नांगराच्या तासात तळाला व अखंड पट्ट्यात खत देतात. यामुळे खत ओल्या जमिनीत पडून उन्हाळ्यात ते पिकाला जास्त प्रमाणात उपलब्ध होते. भारी चिकण जमिनीला अशा पद्धतीने खत देतात. (२) खोल जागी खत देण्याची पद्धत जपानमध्ये भाताला नायट्रोजनयुक्त खत देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरतात. भारतातही या पद्धतीचा आता वापर करण्यात येतो. या पद्धतीमुळे मुळांच्या पट्ट्यात खत एकसारखे पसरले जाते व ते पृष्ठभागावरून जात नाही. (३) तळजमिनीत खत देण्यासाठी फार शक्तिमान यंत्राचा वापर करतात. आर्द्र व अर्धार्द्र भागातील खूप अम्लीय तळजमिनींना खत देण्यासाठी या पद्धतीची शिफारस करतात. या पद्धतीने विशेषत: फॉस्फरसयुक्त व पोटॅशियमयुक्त खते देतात. त्यामुळे मुळांचा चांगला विकास होतो.

स्थानीय खत देणे : या पद्धतीत खत जमिनीत बी किंवा वनस्पतीच्या जवळ देतात. खताची सापेक्षत: अल्प मात्रा द्यावयाची असेल तेव्हा या पद्धतीचा अवलंब करतात. या पद्धतीने फॉस्फरस व पोटॅशियम यांचे स्थिरीकरण (स्थिरावणे) कमी होते. अशा पद्धतीने खत देण्यासाठी विविध तऱ्हा वापरात आहेत. (१) खत आणि बी पेरणी : यामध्ये खत व बी एकाच वेळेस पेरतात. त्यामुळे खत व बी एकाच फणात पडतात. गहू, ज्वारी, बाजरी, कापूस इ. पिकांना या पद्धतीने फॉस्फरसयुक्त व पोटॅशियमयुक्त खते देणे सोईचे होते. परंतु या पद्धतीने खत दिल्यास पिकाच्या उगवणीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. तूर, हरभरा, घेवडा, वाटाणा या पिकांना या पद्धतीने सहसा खत देत नाहीत. (२) पट्टा पद्धती : यामध्ये अखंड किंवा खंडित पट्ट्यात बियांलगत खत देतात. आळे किंवा बांगडी व ओळ असे याचे प्रकार आहेत. जेव्हा पिकाची लागवड १ ते ३ मी. अंतरावर करतात तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूंनी किंवा बांगडी पद्धतीने खत देतात. केळी, पपई, संत्री, मोसंबी, नारळ, सफरचंद इ. पिकांना अशा प्रकारे खत देण्याची पद्धत प्रचलित आहे. ओळ पद्धतीत खत पिकांच्या दोन ओळींमध्ये अखंड पट्ट्यात देतात. ऊस, बटाटा, तंबाखू, कपाशी व भाजीपाला अशा पिकांना या पद्धतीने खत देतात. (३) पार्श्ववेशन : यामध्ये झाडांच्या ओळींमध्ये किंवा भोवती खत देतात. तसे पाहता या पद्धतीत खत देण्याच्या विविध प्रकारांचा एकत्रित समावेश होतो. बांगडी पद्धत व ओळ पद्धत हे त्यातील सामान्य प्रकार आहेत.

 

शेतकरी मित्र

English Summary: Fertilizer effect on food's and plants Published on: 08 January 2022, 01:40 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters