कांदा हे एक महत्त्वाचे पीक असून महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. परंतु लागवडीच्या मानाने जर आपण कांद्याच्या उत्पादकतेचा विचार केला तर ती त्यामानाने खूपच कमी दिसून येते. यामागे बऱ्याच प्रकारची कारणे आहेत परंतु सदोष खत व्यवस्थापन हे देखील प्रमुख कारण सांगता येईल. त्यामुळे या लेखात आपण कांद्याच्या वाढीनुसार कोणत्या प्रकारचे खत व्यवस्थापन करावे, याबद्दल महत्त्वाची माहिती घेऊ.
लागवड करत असाल तर असे करा खत व्यवस्थापन
1-24:24:00- हे खत 76 किलो, एमओपी 40 किलो, मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि 20 किलो गंधक एकत्र करावीत व जमिनीतून द्यावीत.24:24:00 या खतांमध्ये नायट्रेट व अमोनिकल या दोन्ही प्रकारचा नत्र उपलब्ध असल्यामुळे व दोन टक्के गंधक सुद्धा यामध्ये असते त्यामुळे पिकाची जलद व निरोगी वाढ होते.
एवढेच नाही तर कांदापातीचे हिरवेपणा देखील जास्त काळ टिकून राहण्यास मदत मिळते. तसेच हे खत आम्लयुक्त असल्यामुळे लागवड केलेल्या जमिनीचा सामू आणि जमिनीचा पोत सुधारण्यास देखील मदत होते. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे कांद्यामध्ये जे काही डेंगळे व जोड कांद्याचे प्रमाण वाढते ते प्रमाण कमी होते.
लागवडीनंतर सुरवातीची वाढीच्या अवस्था म्हणजेच लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यायची खते
1-10:26:26- हे खत 60 किलो, तसेच मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो एकत्र करून जमिनीतून द्यावे. जर तुम्ही या वाढीच्या अवस्थेत या खताचा वापर केल्यामुळे स्फुरद या महत्त्वाच्या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. तसेच कांदा पिकाच्या मुळांचा विकास होऊन अन्नद्रव्यांचे पोषण क्षमता सुधारते.
या खताच्या वापरामुळे सारख्या आकाराचे कांद्याचे उत्पादन मिळण्यास मदत होते व उत्पादनात 12 टक्क्यांपर्यंत वाढ संभवते.
लागवड केल्यानंतर 45 दिवसांनी हे खत आहे महत्वाचे
1- एसओपी( फिल्ड ग्रेड)- 20 किलो जमिनीतून द्यावे. या खताचा पुरवठा केल्यानंतर कांद्याच्या भरघोस वाढीसाठी पोटॅशची जी काही गरज असते ती भागवली जाते.
लागवडीनंतर 60 दिवसांनी
1-00:52:34- हे खत चार ग्रॅम व त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य एक ग्राम एकत्र करून प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे. यामुळे कांदा पिकाला कंद पोषणाच्या काळात सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होते व कंदाचा आकार वाढतो व कंद घट्ट होतात.
लागवडीनंतर 75 ते 105 दिवसांनी
या कालावधीमध्ये 00:00:50 हे खत पाच ग्रॅम अधिक बोरॉन अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे. या फवारणी चा फायदा हा कांदा पक्व होण्यास मदत होते व बोरॉन मुळे कांद्याच्या पातीत असलेली शर्करा कंदात उतरते.
त्यामुळे कांद्याची गुणवत्ता सुधारते व साठवणूक काळात बऱ्याच कालावधीपर्यंत कांदा उत्तम दर्जाने टिकून राहतो.
Share your comments