उत्पादन खर्च जेवढे कमी होतील तेवढी आपली शेती आपल्याला परवडणार आहे आणि या कामात गांडूळ अनेक अर्थांनी उपयोगी पडत असते.
याचा विचार करून गांडूळाची मदत घेऊन शेती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.सेंद्रीय खतांचे फायदे पहात असताना आपण ज्या मातीत शेती करतो त्या मातीचे स्वरूप समजून घेतले पाहिजे. या काळ्या मातीला शेतकरी काळी आई म्हणतात. ती त्यांची श्रद्धा आहे. कारण ही काळी आईच त्यांचे भरण-पोषण करत असते.पोटाला धान्य देते. मात्र काळी आई या कल्पनेमागे शेतातली काळी माती ही एक सजीव वस्तू आहे अशी कल्पना आहे.दिसायला तर माती निर्जीव दिसते, मग ती सजीव कशी ? असा प्रश्न कोणाला पडेल. परंतु शेतातली माती हा एक सजीव घटकच आहे ही कल्पना आता आधुनिक वैज्ञानिक सुद्धा मानायला लागले आहेत.कारण या मातीमध्ये अनेक जीवाणू आणि विषाणू वास करत असतात.त्या सर्वांच्या हालचाली या मातीमध्येच होत असतात. त्यांचे जीवन चक्र या मातीमध्येच आणि मातीमध्ये उगवणार्या पिकांच्या बरोबरीने चालत असते आणि संपतेसुद्धा.मातीमध्ये चालणार्या या जीवनाच्या उलाढालीमुळेच माती हा सजीव घटक मानावा लागतो.
मातीला सजीवपणा देणार्या सार्या सजीवांमध्ये गांडूळ हा सर्वात प्रमुख प्राणी आहे.शेतातल्या मातीचा वरचा सुपीक थर हा उगाच तयार होत नाही.वर्षानुवर्षाचे निसर्गाचे अनेक प्रकारचे संस्कार होऊन ही माती शेती करण्यास योग्य अशी झालेली आहे.
तिची पाणी धारण करून ठेवण्याची किंवा ओल टिकवून ठेवण्याची क्षमता ही शेतीमध्ये सर्वाधिक महत्वाची आहे.शेतातल्या मातीमध्ये आपण जितके मातीचे कण अधिक मिसळू तितका मातीचा पोत वाढणार असतो आणि ती माती अधिक सुपीक होणार असते.आपल्या शेतातल्या मातीचा पोत दोन कारणांनी कमी होत असतो.पहिले कारण म्हणजे वरचा सुपीक थर जोरदार पावसामुळे आणि जमिनीची धूप झाल्यामुळे वाहून जातो आणि जमिनीचा पोत कमी होतो.जमिनीचा हा पोत तयार व्हायला शेकडो वर्षे लागतात.
पण शेकडो वर्षात तयार झालेला थर वाहून जायला एखादा जोरदार पाऊस पुरतो.निसर्गाची शंभर वर्षाची तपश्चर्या निष्काळजीपणा केल्यास काही मिनिटांमध्ये मातीच्या रूपाने वाहून जाऊ शकते.
त्यामुळे मातीची धूप होऊ नये याबाबत उपाय सुचवलेले असतात.शेतातल्या मातीचा सुपीक थराचा पोत कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे वरचेवर पिके घेणे.
आपण एखादे पीक घेतो तेव्हा मातीच्या थरातला कस ओढून घेत असतो.तो कस म्हणजेच पोषक द्रव्ये शोषून घेऊनच पीक तयार होत असते.आपण वरचेवर पिके घेतो परंतु त्या पिकांच्या रुपाने शोषून घेतलेल्या कसाची आणि पोषक द्रव्यांची भरपाई करत नाही.अशी भरपाई न करता वर्षानुवर्षे पिके घेतली की, जमिनीची ताकद कमी होते.
पिकाचा उतारा कमी यायला लागतो. मग तो वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा मारा केला जातो.रासायनिक खते विरघळतात आणि संपून जातात.
पीक येते, परंतु जमिनीच्या ताकदीला त्या खतांचा उपयोग होत नाही.उलट शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत अशी सेंद्रीय खते शेतात टाकली की,
पिकांना पोषक द्रव्येही मिळतात आणि जमिनीच्या पोतात भरती करणारे मातीचे कणसुद्धा मिळतात.
कारण ही सारी खते पोषक द्रव्ये संपली की, मातीचे रूप धारण करून मातीची घनता वाढवतात.
म्हणजे सेंद्रीय खतांनी जमिनीचा पोत सुद्धा वाढत असतो.
सेंद्रीय खतांचा हा वेगळा उपयोग आहे. जो रासायनिक खतांनी साध्य होत नाही. एखाद्या पैलवानाला कुस्तीसाठी तयार करायचे असते.
पण तो व्यायाम करत नसेल आणि मुळात आपले शरीर बळकट करत नसेल तर त्याला एखाद्या कुस्तीपुरते शक्तीचे इंजेक्शन दिले जाते किंवा आजच्या काळात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तेजक औषधे घेऊन तात्पुरती तयारी केली जाते.त्यामध्ये शरीराची तयारी काहीच होत नाही.
खेळाडू किंवा पैलवान याचे शरीर कायमचे दुर्बळ राहते.
ते इंजेक्शनापुरतेच तयार होते.
रासायनिक खताची मात्रा ही अशी असते.
पिकापुरती उपयोगी पडते परंतु सेंद्रीय खते मात्र जमिनीची ताकद वाढवतात. जमिनीची ताकद सातत्याने पिके घेतल्याने कमी होते.
त्या ताकदीची भरपाई दोन प्रकारांनी केली जाते.
एकतर भरपूर पोषण द्रव्ये असणारे सेंद्रीय खत वापरल्याने
आणि दुसरे म्हणजे पिकांचा योग्य फेरपालट करण्याने.
सेंद्रीय खतांचा परिणाम पिकावर रासायनिक खतापेक्षा थोडा उशिराच होतो. कधी कधी तर शेणखतावर घेतलेल्या पहिल्या पिकाला तो खत लागूही होत नाही पण त्याची ताकद एवढी असते की नंतरच्या तीन पिकांना तो खत उपयोगी पडतो. तशी स्थिती रासायनिक खताची नसते. एकदा वापरला की संपला.काही काही वेळा पाऊस हुलकावणी देतो. आधी चांगला पडतो म्हणून शेतकरी पेरणी करतात पण नंतरची नक्षत्रे दगा देतात. पिके वाळून जातात.नंतर पुन्हा पाऊस पडतो. फेरपेरणी करावी लागते.अशी फेरपेरणी करणारा शेतकरी रासायिनक खते वापरणारा असेल तर त्याला त्या फेरपेरणीबरोबर पुन्हा नव्याने रासायनिक खत आणावा लागतो. त्यावर खर्च होतो. पण, शेतकरी सेंद्रीय खते वापरणारा असेल तर त्याला फेरपेरणी करताना फक्त बियाणांची गरज असते. त्याला दुसर्या पेरणी सोबत सेंद्रीय खत नव्याने वापरावे लागत नाही.शेतात वर्षानुवर्षे सद्रीय खते टाकलेली असतील तर जमिनीचा पोत सुधारतो आणि अशा जमिनीची ओल टिकवून ठेवण्याची शक्तीही वाढलेली असते. ज्या जमिनीत सातत्याने रासायनिक खते वापरलेली असतात त्या जमिनीतली माती निर्जिव आणि वाळूसारखी रेताड झालेली असते.वाटल्यास कोणीही ही गोष्ट पडताळून पाहू शकतात. ज्या जमिनीत सातत्याने उसाचे पीक घेतलेले असते आणि सतत रासायनिक खताचा मारा केलेला असतो त्या जमिनीचा पोत खराब झालेला असतो.
आपल्या भागात पाऊस लहरी झाला आहे.
कधी तरी मधूनच हुलकावणी देतो आणि दोन दोन नक्षत्रे गायब होतो.पोत चांगला असलेल्या जमिनीत अशाही अवस्थेत ओल कायम टिकून असते. तिथली पिके लगेच वाळायला लागत नाहीत पण, रेताड झालेल्या जमिनीत मात्र आठ दहा दिवस जरी पावसाने हुलकावणी दिली तरी लगेच पिके माना टाकायला लागतात. कारण त्या जमिनीत दुष्काळाचा मुकाबला करण्याची ताकद राहिलेली नसते. आजकाल पावसाचे टाईम टेबल बिघडायला लागले आहे. आणि वारंवार दुष्काळाची हाकाटी व्हायला लागली आहे या मागे हे कारण आहे. ही हाकाटी कमी करायची असेल तर आपल्या जमिनीचा मगदूर किंवा पोत सुधारला पाहिजे आणि त्यासाठी मातीत भर टाकणारी खते वापरली पाहिजेत.
बरे या खतासाठी लागणारी सामुग्री आणायला कोठे दूर जावे लागत नाही. शेतच आपल्याला ती सामग्री देत असते. त्याकडे आपले दुर्लक्ष असते. ही सामग्री नीट वापरली तर उत्तम गांडूळ खत किंवा कंपोष्ट खत तयार होतो. त्यामुळे जमिनीची मूळ ताकद वाढते.
आपण वापरत असलेला तिचा कस यातूनच तिला परत देत असतो. जमिनीचा वापरलेला पोत परत फेडण्याचा आणखी एक नैसर्गिक उपाय म्हणजे पिकांचा फेरपालट.
एकदल धान्य आणि द्विदल धान्य यांचा पालट करणे.
एकदल धान्ये ही कस आणि विशेषत: नत्र ओढून घेत असतात तर द्विदल धान्ये त्या नत्राची भरपाई करीत असतात.तेव्हा ज्वारी या एकदल पिकांनंतर द्विदल पिके घेणे जमिनीचा कस टिकवण्यासाठी उपयुक्त ठरते.
सेंद्रीय खताप्रमाणेच हा सुद्धा बिनखर्ची उपाय असतो.
आपण नत्र साठी यूरिया खत विकत आणतो पण नत्र हवेतही असतो.आणि तो द्विदल धान्ये जमिनीत ओढून घेत असतात. अशा नैसर्गिक गोष्टी सोडून आपण नको त्या खर्चिक पद्धतींच्या मागे लागलो आहोत.
त्या पद्धतीत होणार्या तात्पुरत्या फायद्याच्या विचारात वाहवत जाऊन आपण दीर्घकालीन नुकसानीकडे दुर्लक्ष करायला लागलो आहोत.
Share your comments