1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांनो युरियाच्या वापराने पीक जोमाने वाढते; पण.....

शेतीच्या उत्पन्नासाठी पिकांची देखभाल आणि योग्यवेळी खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते. मात्र सध्या शेतकऱयाच्या ऐन गरजेच्या वेळी युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचबरोबर युरिया खताचा वापर पिकासाठी योग्य की घातक हाही प्रश्न समोर आला आहे. युरिया खताच्या वापराबाबत योग्य प्रकाश टाकणारा हा लेख.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
युरियाचा  अधिक वापर घातक

युरियाचा अधिक वापर घातक

शेतीच्या उत्पन्नासाठी पिकांची देखभाल आणि योग्यवेळी खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते. मात्र सध्या शेतकऱयाच्या ऐन गरजेच्या वेळी युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचबरोबर युरिया खताचा वापर पिकासाठी योग्य की घातक हाही प्रश्न समोर आला आहे. युरिया खताच्या वापराबाबत योग्य प्रकाश टाकणारा हा लेख.

यंदाच्या वर्षी वरुणराजाने सुरुवातीपासूनच बळीराजाला दिलासा देण्याच्या दृष्टीने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे या वर्षी खरिपाची पिके मोठय़ा जोमात असून अधूनमधून पडणाऱया पावसाच्या सरींना युरियाची साथ देण्यासाठी शेतकऱयांनी कृषी केंद्रासमोर युरिया खत खरेदीसाठी मोठय़ा रांगा लावल्या आहेत. या वर्षी पाऊस लवकर बरसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरादेखील लवकर झाला. त्यामुळे खतांची मागणी वाढली. राज्यात गेल्या खरिपात जूनच्या पहिल्या आठवडय़ात फक्त साडेसात लाख हेक्टर पेरा झाला होता. यंदा याच कालावधीत पेरा एक कोटी साडेसात लाख हेक्टर इतका झाला. त्यामुळे खत मागणी वाढली. खरिपातील सर्वच पिकात टॉप ड्रेसिंगकरिता युरियाचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याने युरियाची मागणी वाढली आहे.

आपल्या देशात एकूण रासायनिक खतांच्या वापरात एकटय़ा युरियाचा वापर 59 टक्के आहे. हे खत इतर खतांच्या तुलनेत स्वस्त असल्याने तसेच त्याच्या वापराचे परिणाम पिकांवर लवकर दिसत असल्याने शेतकऱयांची पसंती युरियाला असते. देशामध्ये हरितक्रांतीच्या सुरुवातीला शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी रासायनिक खतांचा वापर करण्यात आला होता. पण हळूहळू शेतकरी त्याच्या वापराच्या अधीनच झाले. चीनसारख्या देशाने अशा खतांच्या वापरानंतर अत्याधिक उत्पादन आल्यानंतर शेतकऱयांना जैविक खतांचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यात यश मिळवले; पण हिंदुस्थानात मात्र ते अजून तरी शक्य झालेले नाही. देशामध्ये हरितक्रांती झाल्यानंतर युरियाच्या मागणीत वाढ झाली.

युरिया या नत्रखतांचे नाव माहीत नाही असा शेतकरी शोधून सापडणार नाही. या खताचा वापर सर्वत्र प्रचलित असून लोकप्रिय झाला आहे. अल्पावधीमध्येच पिकांची होणारी जोमदार वाढ, हिरवागार तजेलदारपणा आणि उत्पादनात होणारी भरघोस वाढ शेतकरी दृष्टीआड करू शकत नाही. म्हणूनच आपल्या देशात वेगवेगळय़ा रासायनिक खतांपैकी सर्वात जास्त उत्पादन आणि वापर हा नत्रयुक्त रासायनिक खतांचाच आहे.नत्रयुक्त रासायनिक खतांमध्ये युरियाचा वापर सर्वाधिक जास्त 59 टक्केपर्यंत असून अमोनियम व कॅल्शियम नायट्रेट(कॅन)चा वापर फक्त 2 टक्केच शेतकरी करतात. युरिया खत वापराविषयी शेतकऱयांची पसंती का? याचे उत्तर अनेक गोष्टींत दडले आहे. पिकांना नत्राची मात्रा तत्काळ लागू पडते. पिकाची वाढ जोमाने होते. पिकांमध्ये हिरवा गडद रंग निर्माण होतो. इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत कमी असते. बाजारात युरिया सहजपणे उपलब्ध असतो. ड्रीपच्या माध्यमातून देता येते. काही प्रमाणात फवारणीद्वारे देता  येतात. पिकांना विभागून देण्यास योग्य असल्यामुळे शेतकरी युरिया खत वापरास अधिक पसंती देतात.

 

केवळ नत्रयुक्त खतांचा वापर केला तर पिकांची फक्त शाकीय वाढ होते. रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उत्पादनात घट येते. पिकांमध्ये लुसलुशीतपणा राहून खोड नाजूक राहते आणि पीक लोळते. पिकांचा कालावधी वाढतो. मात्र युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. जमिनीतील कर्बःनत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जीवाणूंची संख्या कमी होते. पालाश, कॅल्शियम, बोरॉन आणि तांबे या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. जमिनीमध्ये अमोनिया वायू जास्त प्रमाणात तयार होऊन नायट्रोबॅक्टरसारख्या जीवाणूच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. गांडुळाच्या संख्येवर परिणाम होतो.  जमिनीच्या जडणघडणीवर परिणाम होतो.

युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे भूगर्भातील पाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढते (10 पीपीएम), जलचर प्राण्यांची हानी होते. पाण्यातील शेवाळ व पानवनस्पतींची वाढ होते. युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे हवेचे प्रदूषण होते. युरियातील अमाइड नत्राचे रूपांतर अमोनिया आणि नायट्रेटमध्ये होते. नायट्रस ऑक्साइड, नायट्रिक ऑक्साइड यासारखे नत्राचे वायू हवेचे प्रदूषण वाढवतात. हे वायू 300 पटीने कार्बन डायऑक्साइडपेक्षा घातक आहेत. पृथ्वीभोवती असणाऱया ओझोन वायूच्या स्तरास छिद्रे पडून, सूर्यापासून उत्पन्न झालेले अतिनील किरणे जमिनीच्या पृष्ठभागावर पोहोचतात. त्यामुळे वातावरणातील तापमान वाढण्यास मदत होते.

 

युरियाचा अवाजवी वापर टाळण्यासाठी सरकारने 2018-19 पासून युरियाची गोणी ही 45 किलोची केली आहे. कमी प्रमाणात युरियाचा वापर व्हावा हा त्यामागे उद्देश आहे. शेतकरी गोणीच्या हिशेबाने खते देतात. केंद्र शासनाने मे 2015 पासून देशात उत्पादित होणारा युरिया डिसेंबर 2015 पासून आयातीत युरिया सर्व उत्पादक व पुरवठादार यांना निम कोटिंग करूनच पुरवठा व विक्री करणे बंधनकारक केले आहे.

शेतकऱयांनी केवळ उत्पादनाकडे लक्ष न देता मातीचा कस पाहणेही योग्या ठरते. खते देण्यापूर्वी माती परीक्षण करावे. माती परीक्षण अहवालानुसार खते द्यावीत. नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर वापर करावा. हिरवळीच्या खतांचा वापर करावा. नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळी फेकून न देता, त्याचा वापर करत युरियाचा वापर कमी करावा. जैविक खतांच्या वापरामुळे तृणधान्य, द्विदल पिके व भाजीपाला पिकांमध्ये 15-20 टक्के नत्राची बचत होते व उसामध्ये 50 टक्केपर्यंत बचत होते. भातासारख्या पिकास युरिया ग्रँनुल्सचा वापर करावा. पाणथळ जमिनीत प्रामुख्याने अमोनियाधारक नत्रयुक्त खतांचा वापर करावा. कोरडवाहू शेती मध्ये नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळेस पेरून द्यावीत. क्षारयुक्त व चोपणयुक्त जमिनीत युरिया खते हे शेणखत, कंपोस्टखत अथवा गांडूळ खताबरोबरच द्यावे.

विना निमकोटेड युरिया वापरल्याने :-

युरिया जमिनीत मिसळल्याने त्याचा पाण्याबरोबर संपर्क होताच तो लगेच विरघळतो.त्यातील नत्र पिकांना उपलब्ध होण्याची क्रिया तत्काळ सुरू होऊन काही प्रमाणात पाण्याबरोबर जमिनीत वाहून जातो. त्यामुळे जमिनीतील पाणी दूषित होते.या संपूर्ण प्रक्रियाद्वारा नायट्रस ऑक्साइड नावाचा ग्रीन हाउस वायू तयार होतो. त्यामुळे वातावरणातील हवा दूषित होते.

 

युरिया खताचे गुणधर्म :-

  1. युरिया हे कृत्रिम सेंद्रिय नत्रयुक्त खत आहे.
  2. युरियामध्ये 46 टक्के अमाइड नत्र असते.
  3. खत पांढरेशुभ्र दाणेदार आणि पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असते.
  4. युरियामध्ये 20.6 टक्के ऑक्सिजन,20 टक्के कार्बन, 7 टक्के हायड्रोजन आणि 1 ते 1.5 टक्के बाययुरेट हे उपघटक असतात.
  5. युरिया खत आम्लधर्मीय आहे.
  6. पावसाळी तसेच दमट हवामानात आर्द्रऩ&ता शोषून घेतल्यामुळे या खताचे खडे तयार होतात. तसेच अन्य खतांत मिसळताना पाणी सुटणार नाही याची खात्री करावी.
  7. नत्राचे अमाइड रूपांतर युरीयेज विकारामुळे अमोनियात होऊन ते नायट्रेट स्वरूपात होते.

 

 

लेखक :-

प्रा. सावन गो. राठी

सहायक प्राध्यापक (मृदा कृषिरासायन शास्त्र विभाग)

श्री. संत शंकर महाराज कृषि महाविद्यालय, पिंपळखुटा,

ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती

इ.मेल. :- sawanrathi499@gmail.com

 

 

English Summary: Farmers use urea to increase the crop but ..... Published on: 21 March 2021, 05:22 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters