शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करतांना योग्य ती काळजी घेवून अधिकृत कृषि केंद्र परवाना धारकांकडुनच खरेदी करावीत. कृषि सेवा केंद्र धारकाकडुन बॅगवर नमुद केलेल्या एमआरपी किंमतीपेक्षा ज्यादा दराने विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती किंवा जिल्हा तक्रार निवारण कक्ष संपर्क क्रमांक 9673033085, 8856957686, 02462-284252 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.
बाजारपेठेत डी.ए.पी खत मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेले आहे. सदयस्थितीत शेतकऱ्यांकडून एकाच कंपनीच्या किंवा ब्रँडच्या डी.ए.पी खताची मागणी वाढलेली आहे. परंतु बाजारात उपलब्ध होणाऱ्या सर्व कंपन्यांच्या डी.ए.पी खतामध्ये नत्र व स्फुरदचे प्रमाण सारख्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचा डी.ए.पी खताची खरेदी करावी. एकाच कंपनीच्या डी.ए.पी खताचा आग्रह धरु नये. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी करताना युरीया व सिंगल सुपर फॉस्पेट किंवा एनपीके 20:20:0:13 या खताचा
वापर करावा. या खतामधुन सोयाबीन पिकासाठी गंधक युक्त खते मिळतात जे की सोयाबीन पिकांसाठी आवश्यक आहेत. तसेच बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना अधिकृत कृषि केंद्र परवाना धारकांकडुनच खरेदी करावी. खरेदीचे पक्के बिल पावती घ्यावी. पावतीवर खरेदी केलेल्या निविष्ठांचा संपुर्ण तपशिल असल्याची खात्री करावी. अनुदानीत रासायनिक खताची खरेदी करताना विक्रेत्यांकडुन इ-पॉस मशीनवरील बिल घ्यावे. खरेदी केल्यानंतर बॅगवर नमुद असलेली किंमत व विक्रेत्याने दिलेले बिल तपासुन घ्यावे.
तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे टॅग वेस्टन, पिशवी व त्यातील थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करुन ठेवावे. बियाण्याची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी. शेतकऱ्यानी घरचे तसेच बाजारातील खरेदी केलेले बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी . पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करुनच बियाण्याची पेरणी करावी.सलग तीन दिवस 100 मि.मि. पाऊस पडल्यावर व जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा असल्यावरच सोयाबीन बियाण्याची पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे
Share your comments