1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांचे मित्र, पक्ष्यांचे जीवन व त्यांची उत्क्रांती

कोकीळेची कुहु कुहु कानावर पडले म्हणजे पहाट झाली, असे नक्की. मग कोंबड्याचे आरवणे हेही त्यात आलेच. हे नसेल तर ती पहाट कसली?

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतकऱ्यांचे मित्र, पक्ष्यांचे जीवन व त्यांची उत्क्रांती

शेतकऱ्यांचे मित्र, पक्ष्यांचे जीवन व त्यांची उत्क्रांती

कोकीळेची कुहु कुहु कानावर पडले म्हणजे पहाट झाली, असे नक्की. मग कोंबड्याचे आरवणे हेही त्यात आलेच. हे नसेल तर ती पहाट कसली?

दाणे टिपणाऱ्या राखडी चिमण्या, गाणे गाणारा बुलबुल, काळा कुट्ट कावळा, मोरपंखी मोर, लालसर तपकिरी भारद्वाज यांसारखी रंगांची रेलचेल फक्त पक्षीच दाखवतात. नुसते काकाकुवा व पोपट यांचे रंग बघत राहिले तरी डोळे दिपून जातात. असे रंग इतर प्राण्यात क्वचितच पाहायला मिळतात. सोप्या शब्दात उडणारे पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे पक्षी. मात्र उडणारे कीटक हे पक्षी नव्हेत. पक्ष्यांना पंख असतात. पक्षी अंडी घालतात. काही बोजड असल्याने फारसे उडू शकत नाहीत. काही प्रचंड वेगाने उडतात, खूप उंच जाऊ शकतात, कित्येक मैलांचा सलग टप्पा गाठतात, तर काही पाण्याखाली खूप खोल मुसंडी मारून पुन्हा सहज वर येतात. अल्बॅट्राॅसचे विशाल म्हणजे तेरा फुटी पंख, शहामृगांचे प्रचंड आकार व शंभर किलोच्या आसपासचे वजन, स्वान वा राजहंसांची सात आठ किलोमीटरची उंची गाठून उडण्याची क्षमता, तर 'पेंग्विन'ची पाण्याखाली सात आठशे फूट खोल मुसंडी मारण्याची क्षमता माणसाला अवाक् करून सोडते कबुतरांचा वापर तर संदेशवहनासाठी मानवाने कल्पकतेने करून घेतलाच आहे. कुठूनही सोडले, तरी कबुतर मूळ जागीच परतते, हा संदेशवहनातील गाभा आहे.

पक्षी काय खात नाहीत, असाच प्रश्न विचारावा लागेल. अभक्ष्य असे त्यांना काहीच नाही. मासे आवडीने खाल्ले जातात, त्यासाठी तासन् तास पाण्यात बकध्यान धरण्याची सोय उंच पाय देऊन निसर्गानेच केली आहे. गरुड व घारी पायात पाहिजे ते भक्ष्य अलगद उचलून घेतात व धारदार चोचीने त्याचा फडशा पाडतात. मग एखादा लहानसा प्राणीही त्यांना त्यासाठी चालतो गिधाडे मृत जनावरांवर ताव मारतात. अनेक पक्षी छोटे किडे, व पानांचे तुरे, फळे, पाने यांवर पोट भरतात. फक्त धान्य खाऊन राहणारे पक्षी जसे आहेत, तसे फक्त फळांच्या बिया फोडून त्यांतील घर खाणारे क्रॉसबीलसारखे पक्षीही आहेत. उडणारे भक्ष्य गट्टम करणारेही काही नेमबाज आहेत, तर आपल्या लांबचलांब चोचीने चिखल व माती उकरून भक्ष्य धुंडाळणारेही आहेत. प्रत्येक पक्ष्याची चोच ही त्याच्या खाण्याच्या सवयीप्रमाणे सोयीची बनली आहे. 

डोळ्यांची क्षमता व नजरेची फेक त्याच्या सवयीप्रमाणे वाढली आहे. घारीची वा गरुडाची नजर चक्क हजार मीटर उंचीवरून पुस्तकातील मजकूर वाचण्याएवढी तीक्ष्ण असू शकते. याचाच उपयोग त्यांना भक्ष्य शोधण्यासाठी होतो.

पक्ष्यांची शरीररचना उडण्याच्या दृष्टीनेच झालेली आहे. पुरातन काळातील सरपटणाऱ्या प्राण्यांपासून यांची उत्क्रांती होत गेली. मूळचे गरम रक्ताचे हे सजीव. पंखांची रचना, फुप्फुसांची ताकद व हवेच्या झोतावर अारूढ होण्याची उपजत युक्ती यांचा एकत्रित वापर पक्षीजमात करत असते स्थिर राहणे, घिरट्या घालणे, झपाट्याने पंखांची हालचाल करत वा अजिबात हालचाल न करता तरंगणे, अचानक उलटी सुरकांडी मारणे ही निरनिराळी वैशिष्टय़े विविध जाती दाखवतात. पक्ष्यांच्या पिसांना खूप ऊब असते. सर्व बर्फाळ प्रदेशांत वापरल्या जाणाऱ्या 'स्लिपिंग बॅग'मध्ये पक्षांची पिसेच भरली जातात. 

पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक रचना पंखांमध्ये असतेच. पक्ष्यांचे आयुष्य त्यांच्या आकारमानाप्रमाणे वाढत जाते, असे स्थूल विधान करता येईल.

अंटार्टिकावर फक्त पेंग्विन आढळतात; पण अन्यत्र मात्र सर्व पक्षी आहेतच, हवामानानुसार, भक्षाच्या व खाद्याच्या उपलब्धतेनुसार त्यांना भ्रमण करावेच लागते. या भ्रमणाची वा मायग्रेशनची अंतरे अनेकदा काही हजार किलोमीटरमध्ये भरतात. सैबेरियातील क्रौंच पंधरा हजार किलोमीटरवर भारतात येतात, तर समुद्रपक्षी पंचवीस हजार किलोमीटरपर्यंत भराऱ्या मारत पुन्हा मूळ जागी परततात. सुरुवातीला म्हटले होते, सोप्या शब्दात उडणारे पक्षी, पण वटवाघळे हे पक्षी नव्हेत, तसेच पक्षी असूनही किवी हा ऑस्ट्रेलियन पक्षी उडू शकत नाही. पक्ष्यासारखे उडण्याचे मानवाचे स्वप्न अजूनही स्वप्नच आहे.

 

प्रसारक : दिपक तरवड

 संकलक : प्रविण सरवदे, कराड

सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून

English Summary: Farmers friends birds life and there evolution Published on: 21 April 2022, 04:49 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters