देशभरातील प्रतिष्ठेची पत्रकारितेची संस्था मानल्या जाणाऱ्या ‘मुंबई प्रेस क्लबचा’ यंदाचा ‘रेड इंक’ हा पुरस्कार बुलढाण्याचे सुपुत्र आणि बीबीसी मराठीचे पत्रकार श्रीकांत फकीरबा बंगाळे यांना जाहीर झाला. सामान्य शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भागातील प्रश्न हिरीरीने मांडणाऱ्या पत्रकाराला हा पुरस्कार मिळाला असल्याचा प्रतिक्रिया सोशल मीडियात दिसत होत्या.
बुलडाणा जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून असून देखील आपल्या संवाद कौशल्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर आज आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ‘बीबीसी’सारख्या मोठ्या चैनलवर आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर आपली वेगळी छाप ते प्रभावीपणे पाडत आहेत. पुरस्कार हे एक निमित्त आहे पण इतर वेळीही त्यांच्या कामाचे कौतुक संपूर्ण राज्यभर होत असते.
बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील ‘सिनगाव जहांगीर’ या गावामधील शेतकरी कुटुंबातील त्यांचा जन्म. प्राथमिक शिक्षण हे गावातच पूर्ण झाले. माध्यमिक शिक्षण देऊळगावराजा येथे कस्तुरबा शाळेत झालं.पुढे लातूरला बारावी पूर्ण केल्यानंतर पुण्यातील मॉडर्न इंजिनियरिंग कॉलेजला इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विषयात इंजिनियरिंग केली. इंजिनिअरींग होऊन देखील पुढे प्रवेश घेतला तो पत्रकारितेसाठी. पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. नोकरीच्या पहिल्याच प्रयत्नात ‘बीबीसी मराठी’ मध्ये संधी मिळाली. मिळालेल्या संधीचे सोने होणार हे मात्र निश्चित होतं.
पत्रकारितेतील प्रवास हा अगदी रोचक आहे. सुरवातीच्या काळामध्ये ‘बीबीसी मराठी’मध्ये त्यांनी जे उपक्रमशील काम केले त्या माध्यमातून त्यांना बीबीसीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा देखील एक पुरस्कार पहिल्या सहा महिन्यात मिळाला होता. गावाकडील आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आपण नव्याने मांडले पाहिजेत त्यातून अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत या अनुषंगाने मराठीमधील ‘गावाकडच्या गोष्टी’ नावाचा कार्यक्रम सुरू केला.
कृषि क्षेत्रातील जेष्ठ पत्रकार दीपक चव्हाण यांच्या मते, गावाकडच्या गोष्टी हा शेतकरी वर्गातील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम आहे. यातून शेतकरी वर्गाचे अनेक प्रश्न सुटतात.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कोणता प्रश्न ब्रेकिंग न्यूजला आजपर्यंत कधी महाराष्ट्रातीलच मुख्य प्रवाहातील मीडियामध्ये दिसत नाही, अशा तक्रारी कायम शेतकरी करत असतात. मुख्य प्रवाहातील मीडियाकडून शेतकरी खूप अपेक्षा करत असतात, पण सकाळी शेतकरी उठण्याच्या आणि कामाच्या वेळेसच शेतकऱ्यांचे स्टोरीज ह्या दाखवल्या जातात. पण त्या कधीही दिवसभरात ज्यावेळी शेतकरी पाहू शकतात त्यावेळी दाखवल्या जात नाही.
आपला देश कृषीप्रधान आहे पण शेतकऱ्यांचे प्रश्न कधी कुणी प्रभावीपणे मांडण्याचा पत्रकार जास्त प्रमाणात प्रयत्न करत नाही. पण श्रीकांत बंगाळे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. बिबट्या प्रवण क्षेत्रात शेतकरी वर्गाची होणारी परिस्थिती असेल किंवा अवकाळीमुळे शेतकरी वर्गाचं होणारे नुकसान असेल, याचे ग्राउंड रिपोर्ट करताना रात्रीचा अंधार असो वा पाण्याचा शेतातला खच जीवाची पर्वा न करता ग्राउंड रिपोर्ट त्यांनी केले आहेत.
अगदी विधवा महिला शेतकरी ज्योती देशमुख यांच्यापासून ते असंख्य महिलांना मार्ग देणाऱ्या कमल परदेशी यांच्यापर्यत अगदी तळागाळातील स्टोरीजमुळे कधीही मुख्य प्रवाहात नसलेल्या ग्राउंड स्टोरीज पुढे आणल्या आहेत.
ग्रामीण भागात अनेक होतकरू तरुण कृषी आणि संलग्न उद्योगातून आपली वेगळी प्रतिमा बनवत आहेत, अशा मनोज हाडवळे, सचिन घाडगे, समीर डोंबे तसंच वयाच्या २१ व्या वर्षी गावाला कोरोनामुक्त करणाऱ्या ऋतुराज देशमुख अशा अनेक धडपडणाऱ्या युवकांच्या यशोगाथा पुढे आल्या त्या फक्त श्रीकांत यांच्यामुळे.
पत्रकारितेत प्रश्न हाताळणी हा महत्वाचा मुद्दा आहे. कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणं हे पत्रकारीतेचं तत्व आहे. बरेचशे पत्रकार पूर्वग्रहित विचाराने किंवा विशेष विचार घेऊन पत्रकारिता करतात. समोरचा विषय समजून न घेता श्रेय घेण्याच्या शर्यतीत पुढे असतात. पण सामान्य लोकांची मग ती कोणतीही बाजू असो ते मांडण्यात श्रीकांत हे त्यांच्यापेक्षा नेहमी उजवे आहेत. अनेक गंभीर आणि संवेदनशील विषय त्यांनी सचोटीने हाताळले आहेत. विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात पण तो पूर्णत्वाला नेण्याचं धाडस पण त्यांच्यात आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी आणि युवकांना वेळ देणारा पत्रकार अशी त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
आज ते गावाकडच्या गोष्टी, पॉडकास्ट, ग्राउंड रिपोर्ट यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. एकदा श्रीकांत हे बातमीसाठी आले असता शेताच्या बांधावर आम्ही उभे होतो.
तेव्हा तिथं शेजारच्या शेतात काम करणारा एक शेतकरी आमच्याकडे आला आणि त्या शेतकऱ्यानं श्रीकांत यांना विचारलं, “तुम्ही सातबारा आणि पी-एम किसानची माहिती सांगणारे पत्रकार का?” हे श्रीकांत यांच्या पत्रकारितेचं यश.
प्रसिद्धीच्या उंबरठ्यावर असणारी काही मंडळी आपल्या लोकांना विसरून जात नाहीत. त्यांचे पाय जमिनीवर असतात. त्यातली मैत्री जपणारे आणि सामान्य लोकांबद्दल आत्मीयता सोबत जिव्हाळा असणारे श्रीकांत बंगाळे हे पत्रकार आहेत.
Share your comments