जमिनीत दोन मातीकणांच्या मधल्या पोकळीत पाण्याचे अस्तित्व न राहता ५० टक्के वाफ आणि ५० टक्के हवा यांचे संमिश्रण असणे’, म्हणजे ‘वाफसा’ होय. झाडांची मुळे त्यांची पाण्याची आवश्यकता वाफेच्या रूपातील पाण्याचे कण घेऊन पूर्ण करतात. त्यामुळे झाडांना थेट पाण्याची नाही, तर वाफेची आवश्यकता असते. यासह झाडाच्या मुळांना आणि मातीतील विविध जिवाणूंना जगण्यासाठी हवेची आवश्यकता असते. त्यामुळे मातीत हवा खेळती रहाणेही आवश्यक असते. वाफसा स्थितीमध्ये या दोन्ही गोष्टींची पूर्तता होते. याला वाफसााअसे म्हणतात.
सोप्या शब्दांत सांगायचे म्हणजे ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’तंत्रात आपल्याला जमिनीत केवळ ओलावा टिकवून ठेवायचा असतो. अतिरिक्त पाण्याचा मारा करायचा नसतो.
२. वाफसा घेणारी मुळे कुठे असतात ?
कोणत्याही झाडाची दुपारी १२ वाजता जी सावली पडते; त्या सावलीच्या सीमेवर अन्नद्रव्ये आणि वाफसा घेणारी मुळे असतात. त्यामुळे झाडाच्या बुंध्याजवळ पाणी न देता ते सावलीच्या सीमेच्या ५ – ६ इंच बाहेर द्यावे. असे केल्याने मुळे त्यांना आवश्यक तेवढा वाफसा घेतात आणि अतिरिक्त ओलाव्याने मुळे कुजण्याची अथवा बुरशी लागण्याची शक्यता अल्प होते.
३. पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्याने उत्पन्नात वाढ कशी होते ?
झाडाच्या बुंध्यापासून ६ इंच दूर पाणी दिल्याने झाडाची मुळे वाफसाचा शोध घेण्यासाठी लांबपर्यंत वाढतात. मुळांची वाढ चांगली झाली की, त्याचा थेट परिणाम खोडावर होतो आणि खोडाचा घेर वाढतो. खोडाचा घेर जितका अधिक तेवढे पानांनी बनवलेले अन्न अधिकाधिक प्रमाणात खोडात साठवले जाते आणि त्यामुळे झाडाचा आकार, फाद्यांची संख्या यांत वाढ होते. या सर्वांचा परिणाम म्हणून झाडापासून मिळणारे उत्पन्न आपोआप वाढते.
४. झाडांना पाणी देण्याची आवश्यकता आहे, हे कसे ओळखावे ?
केवळ पाणी देण्याची वेळ झाली; म्हणून झाडांना प्रतिदिन पाणी घातले, असे न करता झाडांचे आणि मातीचे निरीक्षण करून वाफसा आहे का, याचा अंदाज घेऊन मगच पाणी द्यावे. हे ओळखण्यासाठी कुंडीतील थोडी माती घेऊन त्याचा लाडूसारखा गोळा बांधला जातो का ? ते पाहावे. जर गोळा झाला, तर ’पाण्याची आवश्यकता नाही. मातीत पुरेसा ओलावा आहे’, असे समजावे. (एकदा अनुमान आल्यावर नेहमी माती उकरून पहाण्याची आवश्यकता नसते.) तसेच काही वेळा पाणी देण्याची आवश्यकता असेल, तर रोपांचे शेंडे मलूल झालेले दिसतात. अशा वेळी पाणी द्यावे.
झाडांची पाण्याची आवश्यकता ऋतुमानानुसार पालटते. पावसाळ्याच्या ४ मासांत सतत ओलावा असतोच. त्यामुळे शक्यतो पाणी द्यावे लागत नाही. हिवाळ्यातही तापमान पुष्कळ अल्प असेल, तर १ – २ दिवसाआडही पाणी दिलेले चालते. उन्हाळ्यात मात्र नियमित पाणी द्यावे. हळूहळू सरावाने आणि निरीक्षणाने यातील बारकावे लक्षात येऊ लागतात.
५. पाणी व्यवस्थापनासाठी लक्षात घ्यावयाची इतर सूत्रे
अ. कुंडीतील अथवा वाफ्यातील माती भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणारी असावी. कुंडी भरतांना तळाला छिद्र आहे ना, हे पहावे आणि त्या छिद्रावर खापराचा तुकडा अथवा दगड ठेवावा. यामुळे छिद्रातून माती वाहून न जाता केवळ पाणी बाहेर जाण्यास साहाय्य होते. यानंतर नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा इत्यादी अधिक प्रमाणात घालून अल्प प्रमाणात माती घालावी आणि त्यात रोप लावावे. (रोपाच्या मुळांभोवती माती नसेल, तर रोप मातीतच लावावे; पालापाचोळ्यात लावू नये. मुळांभोवती मातीचा गड्डा असेल, तर त्याच्या भोवती पालापाचोळा पसरता येतो.) असे केल्याने पाण्याचा उत्तम निचरा होऊन अतिरिक्त ओलावा रहात नाही. माती खूपच चिकट असेल, तर त्यात काही प्रमाणात वाळूही मिसळता येते.
आ. पावसाळ्याच्या दिवसांत कुंड्यांमध्ये पाणी साचून रहात नाही ना ? याकडे नियमित लक्ष द्यावे. साठलेले पाणी कुंडी तिरकी करून लगेचच काढून टाकावे.
इ. पाणी थेट नळीने न देता शक्यतो झारीने घालावे अथवा नळीला शॉवर लावून घालावे. झारी घरच्या घरीही सोप्या पद्धतीने बनवता येते. तेलाचा ५ लिटर क्षमतेचा रिकामा प्लास्टिकचा कॅन घ्यावा. त्याच्या झाकणाला १० – १५ लहान छिद्रे करावीत. हा कॅन पाणी घालण्यासाठी झारीप्रमाणे वापरता येतो.
ई. वाफसाची स्थिती योग्य प्रकारे टिकून रहाण्यासाठी आच्छादन पुष्कळ साहाय्यक ठरते. त्यामुळे आच्छादन (भूमीच्या पृष्ठभागाला झाकणे) योग्य प्रकारे केले आहे ना ? याकडे लक्ष द्यावे.
६. पाण्याची बचत करणारे ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्र’ ही आपत्काळासाठीची ‘संजीवनी’ !
पाण्याची निर्मिती करणे आपल्याला शक्य नाही; परंतु उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे आपल्या हातात आहे. अशा प्रकारे पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास अल्प प्रमाणात पाण्याचा वापर करूनही उत्तम लागवड करता येते. ‘आच्छादन’ आणि त्यामुळे सिद्ध झालेले ‘ह्यूमस’ यांच्याद्वारे हवेतील आर्द्रता (बाष्प) खेचून ती मुळांना उपलब्ध होण्याची क्रिया सतत होत रहाते. त्यामुळे झाडाच्या एकूण पाण्याच्या आवश्यकतेतील केवळ १० टक्केच पाणी आपल्याला पुरवावे लागते आणि त्यामुळेच ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्रा’चा अवलंब करणे आपत्काळातही ‘संजीवनी’ असल्याचे सिद्ध होते !
( एकच ध्यास शेतकरी विकास)
(‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’तंत्रावर आधारित लेखांवरून संकलित लेख)
शेतकरी हितार्थ
विनोद धोंगडे नैनपुर
ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर
Share your comments