बदलत्या काळानुसार शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल बघायला मिळत आहे, दिवसेंदिवस शेतकरी बांधव नवनवीन पिकांची यशस्वी लागवड करत आहेत. पीक पद्धतीप्रमाणेच आधुनिकतेची कास धरून शेती करण्याची पद्धत देखील काळाच्या ओघात मोठ्या प्रमाणात बदलताना बघायला मिळत आहे. शेती क्षेत्रात नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत शिवाय आधुनिक उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. देशांतर्गत नवनवीन उपक्रमांद्वारे पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने शासन दरबारी अनेक उपाय योजना विचाराधीन देखील आहेत. पारंपरिक शेतीत शेतकरी बांधव पाटाद्वारे अर्थात फ्लड पद्धतीने पिकांना पाणी देत असत, मात्र आता गेल्या अनेक वर्षांपासून पिकांना पाणी देण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर केला जात आहे.
शेतकरी बांधव आता स्प्रिंकलर द्वारे तसेच ठिबक सिंचन प्रणालीचा उपयोग करून पिकासाठी पाण्याचे व्यवस्थापन करत आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रभावी वापर केला जात असून पाणी बचत करण्यासाठी याचा मोठा फायदा होत आहे. ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून फक्त पाणीच वाचते असे नाही तर यामुळे प्रभावी पद्धतीने खत व्यवस्थापन देखील केले जात असल्याने शेतकरी बांधवांचा दुहेरी फायदा यामुळे होताना नजरेस पडत आहे. ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून पिकांना योग्य व्यवस्थापन करून घनरूप तसेच द्रवरूप खते दिली जात आहेत यामुळे खतांवर होणारा अवाजवी खर्च वजा होत आहे तसेच खतांचा प्रभावी वापर होत असल्याने कमी खर्चात अधिक उत्पादन प्राप्त होत आहे. पिकांना घनरूप तसेच द्रवरूप खते ठिबक सिंचन प्रणाली द्वारे देता येतात या क्रियेस फर्टिगेशन असे म्हणून संबोधले जाते. पिकांना खते देण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करण्यास शेतकरी राजाला जरी उशीर झाला असला तरी आता झपाट्याने ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून पाणी व्यवस्थापन व खत व्यवस्थापन केले जात आहे. त्यामुळे शेतकरी राजाचे श्रम बचत होते, वेळ वाचतो, खर्च वाचतो शिवाय यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होते.
ठिबक सिंचन प्रणालीचा हाच फायदा हेरून आता अनेक प्रगत शेतकरी ठिबक प्रणालीचा यशस्वी वापर करत आहेत, शिवाय यासाठी शासन दरबारी प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. राज्य सरकार द्वारेठिबक सिंचन प्रणालीचा वापर वाढावा या अनुषंगाने पोखरा योजनेअंतर्गत अनुदान देण्याचे कार्य देखील जोमात सुरू आहे. सध्या राज्यात पोखरा योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सुमारे 80 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे.
ठिबक सिंचन प्रणालीद्वारे खत व्यवस्थापन केल्यास होणारे फायदे
»ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पिकांसाठी खत व्यवस्थापन केल्यास खतांच्या कार्यक्षमतेत वाढ होते शिवाय यामुळे खतांचा अनिर्बंध वापर कमी करता येतो आणि त्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात कपात घडून येते.
»पिकांना वेळेत खतांची मात्रा दिली जाते, यासाठी कमी श्रमाची आवश्यकता असल्याने, श्रम बचत आणि वेळेची बचत होते. तसेच गरजेनुसार पिकाला खत मिळत असल्याने उत्पादनात भरघोस वाढ होते.
»ठिबक सिंचन प्रणालीचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे याद्वारे सर्व पिकांना समप्रमाणात खते दिली जातात त्यामुळे सर्व पिकांची वाढ ही जोमात होते आणि त्याचा उत्पादनावर सरळ परिणाम पडतो.
»पारंपारिक पद्धतीने खते दिल्यास अधिकची मजुरी द्यावी लागते. मात्र ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केल्यास मजुरांची गरज भासत नाही केवळ ठिबक चालू करून ज्या पद्धतीने पाणी दिले जाते अगदी त्याच पद्धतीने खतांची योग्य मात्रा पिकापर्यंत पोहचते.
»पारंपारिक पद्धतीने खते दिल्यास खतांचा अवाजवी वापर वाढतो, पारंपारिक पद्धतीने खते दिली असता खते वाहून जातात किंवा अनेकदा निचऱ्याद्वारे खतांचा अपव्यय वाढतो. म्हणून जर ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून खते दिली इतर खतांची बचत होते.
Share your comments