पीक उत्पादनात पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पिकाच्या वाढीवर व पर्यायाने उत्पादनावर गरजेपेक्षा की अथवा अधिक पाणी दिल्यास अनिष्ट परिणाम होतो. याकरिता पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे जरूरीचे आहे. पाण्याचे नियोजन हे प्रमुख्याने पीक प्रकार, जमिनीचा प्रकार, पिकाच्या वाढीच्या अवस्था हवामान व हंगाम या बाबींवर अवलंबून आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणे म्हणजे एखाद्या पिकास हंगामानुसार व त्याच्या गरजेनुसार किती पाणी द्यावे ? पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याच्या किती पाळ्या व प्रत्येक पाळीस किती पाणी द्यावे ? पाणी कसे द्यावे ? या सर्व गोष्टींचा समावेश होतो. उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी योग्य पद्धतीने वापर व्हावा यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती जसे कि ठिबक सिंचन , तुषार सिंचन यांचा प्राधान्याने वापर व्हावयास पाहिजे.
पाण्याचे नियोजन: –
पिकास पाणी देत असताना जमिनीचा विचार करणे आवशयक आहे. जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याचे प्रमाण, पाणी मुरण्याचा वेग, पाण्याचा निचरा हे जमिनीच्या प्रकारानुसार बदलत असते. भारी जमिनीमध्ये उपलब्ध पाणी धारणा शक्ती ही हलक्या जमिनीपेक्षा जास्त असते. या उलट जमिनीत पाणी मुरण्याचा वेग हा हलक्या जमिनीपेक्षा कमी असतो. तसेच भारी जमिनीची खोली ही हलक्या जमिनीपेक्षा तुलनेने जास्त असते त्यामळे पाणी साठवून ठेवण्याची क्षमतासुद्धा भारी जमिनीत जास्त असते. त्यामुळे भारी जमिनीत पाणी देण्याच्या दोन पाळ्यातील अंतर हलक्या जमिनीपेक्षा जास्त असते.
पिकाची पाण्याची गरज तेथील हवामानावर म्हणजे आर्द्रता, बाष्पीभवनाचा वेग, तापमान, पाऊस इत्यादी बाबींवर अवलंबून असते. बाष्पीभवन पात्रातून दररोज जेवढे पाणी बाष्पाच्या स्वरूपात उडून जाईल तेवढेच पाणी अथवा थोडे कमी पाणी पिकाच्या व जमिनीच्या माध्यमातून उडून जाते असे गृहित धरले जाते. तसेच जमिनीतील ओलाव्याच्या प्रमाणानुसार पाण्याची मात्रा ठरविली जाते. जमिनीतील उपलब्ध ओलाव्याच्या ५० टक्के पाणी उडून गेल्यावर पाणी दिले जाते. पावसाळ्यात १५ ते २० दिवसांनी, हिवाळ्यात ७ ते ८ दिवसांनी व उन्हाळ्यात ३ ते ४ दिवसांनी पाणी द्यावे.
पीक वाढीच्या अवस्था व पाण्याची गरज :
कुठल्याही पिकाची पाण्याची गरज त्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये एक सारखी नसते. धान्य पिकाच्या बाबतीत पिकाच्या सुरूवातीच्या काळात म्हणजेच उगवणीच्या वेळेस पाण्याची गरज कमी असते. पिकाच्या मुख्य वाढीच्या अवस्थेत पाण्याची गरज जास्तीत जास्त असते. तर पीक पक्व होण्याच्या पाण्याची गरज पुन्हा कमी होते. एकंदरीत पिकास त्याच्या वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे असते. उदा. गव्हामध्ये मुगुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे.
पाण्याचे व्यवस्थापन करीत असताना हंगामातील किती पाणी उपलब्ध होऊ शकते याचा अंदाज करूनच योग्य त्या पिक पद्धतीची निवड करावी. पावसाचे, कालव्याचे आणि विहिरीतील पाण्याचा एकमेकांना पूरक होऊल अशा तऱ्हेने वापर करावा. पाटातील पाणी उपलब्ध असल्यास पिकाच्या संवेदनशील अवस्थेतच पाणी द्यावे. तसेच पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक निवडून त्यामध्ये संवेदनशील अवस्थेत पाणी द्यावे. उपलब्ध पाण्याच्या जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने सिंचन पद्धत निवडणे फार महत्त्वाचे आहे. सिंचन पद्धत जर योग्य नसेल तर जास्त दिलेले पाणी पिकाच्या मुलाच्या खाली झिरपून वाय तर जातेच तसेच पिकाला दिलेली अन्नद्रव्ये, रासायनिक खतेसुद्धा पाण्याबरोबर झिरपून जमिनीमध्ये मुलाच्याखाली जातात आणि या अन्नद्रव्याचा पिकाच्या वाढीसाठी काहीच उपयोग होत नाही. उपलब्ध पाण्याच्या कार्यक्षमरित्या उपयोग होण्यासाठी शेतात येणाऱ्या प्रवाहाची योग्य अशी वितरण व जमिनीचे सपाटीकरण हे फार महत्त्वाचे आहे.
पाणी व्यवस्थापन व सिंचन पद्धती:
पाणी देण्याच्या मोकाट पद्धतीमध्ये एकूण पाण्याच्या २० टक्के किंवा त्यापेक्षाही कमी उपयोग पिकास होतो. बाकीचे पाणी वाया जाते, झिरपते किंवा बाष्पीभवन होते. तसेच पाणी सर्वत्र सारखे मिळत नाही जमिनीला हलकासा उतार असल्यास उताराच्या बाजूने पेरणी झाल्यावर सारा यंत्राच्या सहाय्याने सारे तयार करावे. जमिनीच्या प्रकारानुसार साऱ्याची योग्य ती लांबी, रुंदी ठेवावी, गहू, ज्वारी, भुईमूग, चारापिके व कडधान्य पिकांना साऱ्याची पद्धत ही योग्य आहे. जमिनीला उंच सखलपणा असेल व उतार एकसारखा नसेल तर वाफे पद्धत वापरावी. वाफे साधारणत: १० मीटर बाय ४.५ मीटर आकाराचे असावेत. गाडी वाफे पद्धत ही रोपे तयार करण्यास उपयुक्त आहे. आले पद्धत ही फळझाडे, भोपळा, कारली, दोडका, काकडी यासारख्या वेलवर्गीय भाज्यांना उपयुक्त आहे. सारी वरंबा पद्धत ही ऊस कपाशी, कांदा, वांगी तसेच इतर नगदी पिकांसाठी वापरतात.
सध्या पावसाच प्रमाण हे अनियमित व अनिश्चित असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक आहे. प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये पाणी वाटपाची कार्यक्षमता कमी आहे व पाण्याचा अपव्यय सुद्धा जास्त होतो. त्यामुळे तुषार व ठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन पद्धती वापरणे गरजेचे आहे. तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास ३० ते ३५ टक्के पाण्याची बचत होऊन २० ते २५ टक्के उत्पादनात झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. तसेच रात्रीसुद्धा भिजवण करता येणे शक्य झाले आहे. या पद्धतीत पाट, बांध ह्यांची गरज नसल्याने जमीन वाया जात नाही, खते व किटकनाशके काही प्रमाणात फवारण्यांतून देता येतात. ही पद्धत भुईमूग, सोयाबीन सूर्यफूल, गहू, कापूस, मका इत्यादींसाठी उपयुक्त आहे.
ठिबक सिंचन पद्धतीमध्ये २५ ते ६० टक्के पाण्याची बचत होते व ३० टक्क्यापर्यंत उत्पादनात वाढ होते. जमीन, पाणी व हवा यांची उत्तम सांगड घातली गेल्याने उत्पादनाची परत सुद्धा सुधारते. तसेच कोणत्याही जमिनीवर त्याचा अवलंब करता येतो. यामधून खते देता येत असल्यामुळे खत वापर क्षमता जवळपास दुप्पटीने वाढते. यासर्व बाबतीत येणारा मजुरांवरील खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो.
ठिबक सिंचन म्हणजे काय ?
ठिबक सिंचन हि पिकांना पाणी देण्याची एक आधुनिक पद्धत आहे. या पद्धतीत जमीन, पाणी, हवामान व पिक इत्यदी बाबींचा विचार करून पिकास लागणारे पाणी बंद नळ्यांमार्फत ( लॅटरल्स ) तोट्याद्वारे ( ड्रिपर्स ) कमी दाबाने व नियमित दराने थेंब – थेंब स्वरुपात मुळांच्या कार्यक्षम कक्षेत समप्रमाणात देता येते. या पद्धतीत पाणी देण्याचा वेग हा जमिनीच्या पाणी मुरण्याच्या वेगापेक्षा कमी असल्याने मुळांच्या कार्यक्षेत्रात हवा व पाणी यांचे योग्य संतुलन राखले जावून पिकांची वाढ जोमदार होते. पिकास गरजेइतकेच पाणी दिले जात असल्याने पाण्याचा अपव्यय टळतो. खतांची कार्यक्षमता वाढते व जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची चांगली वाढ होऊन दिलेल्या पाण्याचा जमिनीवर अनिष्ट परिणाम न होता पिकाची उत्पादकता प्रचलित सिंचन पद्धतीपेक्षा अधिक प्रमाणात वाढते.
ठिंबक सिंचन पद्धतीचे फायदे
१) पाण्याची बचत व पाण्याचा कार्यक्षमरित्या वापर – ठिबक सिंचन पद्धतीत पिकाच्या मुळाना बंद नळ्यामार्फत ( लॅटरल्स ) पाणी दिले जाते. त्यामुळे पाणी वहन अपव्यय टळतो. पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी ठराविक मर्यादित क्षेत्रास पाणी दिले जाते. पाणी मुळांच्या कार्यक्षेत्रात दिल्याने पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. तसेच पाण्याचा कार्यक्षम मुळांच्या खाली जाऊन होणारा नाश टाळला जातो. इत्यादी कारणांमुळे पाण्याची ४० ते ६० टक्के बचत होऊन पाण्याचा कार्यक्षम वापर होतो.
२) पिकाची उत्पादकता व गुणवत्तेत वाढ – पिकास वारंवार गरजेनुसार पाणी दिल्याने मुळांच्या कार्यक्षेत्रात नेहमी ओलावा राहत असल्याने पिकास पाण्याचा ताण सोसावा लागत नाही. यामुळे पिकाची जलद व जोमाने वाढ होते, पर्यायाने उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. तसेच पिकाच्या उत्पादनाची परत सुधारते. त्यामुळे बाजारभाव चांगला मिळून आर्थिक फायदा होतो.
३) खतांचा कार्यक्षमरित्या वापर – ठिबक सिंचनाद्वारे पिकांना योग्य पाण्याची मात्रा व त्यातून योग्य खतांचा पुरवठामुळांच्या कार्यक्षेत्रातच केला जात असल्याने निचऱ्याद्वारे होणारा खतांचा अपव्यय टाळला जातो. पिकांना समप्रमाणात खते देता येतात. त्यामुळे खतांचा वापर कार्यक्षमरित्या व परिणामकारक होतो. पर्यायाने खताच्या मात्रेत २५ ते ५० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते.
४) आंतरमशागतीवरील खर्च कमी – एकूण क्षेत्रापैकी ठराविक क्षेत्र ओळीत केल्याने व इतर भाग कोरडा राहत असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव अतिशय कमी आढळतो. परिणामी आंतरमशागतीवरील खर्चात ३० ते ४० टक्के बचत होऊ शकते.
५) क्षारयुक्त पाण्याचा वापर – पिकाच्या मुळाभोवती सातत्याने योग्य प्रमाणात ओलावा रहात असल्याने मचूळ पाण्याचा वापर ठिबक सिंचनाद्वारे केला असता त्याचा विपरीत परिणाम पिकांवर न होता जमिनीतील असलेले क्षार हे कार्यक्षम मुळांच्या क्षेत्रापासून दूर लोटले जातात आणि त्यामुळे पिकांवर अनिष्ट परिणाम होत नाही.
६) पिक पक्वतेच्या कालावधीत घट – ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे आणि खताचे पिकास योग्य नियोजन केल्यास पिके लवकर फुलावर येतात आणि लवकर काढणीस तयार होतात. त्यामुळे पिक पक्वतेचा कालावधी कमी होतो. विशेषतः केळीसारखे पिक पारंपारिक पद्धतीपेक्षा ३० ते ६० दिवस आणि ऊसासारखे पिक ३० ते ४० दिवसांनी लवकर तयार होते.
याव्यतिरिक्त विजेची बचत, जमिनीची कमी धूप, पिकांवरील रोग व किडींचा कमी प्रादुर्भाव, मजूर खर्चात बचत इत्यादी फायदे मिळू शकतात.
ठिंबक सिंचन पद्धतीच्या मर्यादा
१) संचावरील मुलभूत खर्च अधिक – ठिबक संचात विविध घटकांचा उदा : इलेक्ट्रिक मोटार, नियंत्रण यंत्रणा, पाणी वाहून नेणारे पी.व्ही.सी. पाईप्सचे जाळे, उपनळ्या, तोट्या, खत संयंत्र इत्यादी. चा समावेश होतो. त्यामुळे प्रति हेक्टरी एकूण भांडवली खर्च प्रारंभी अधिक असतो.
२) संचाची निगा – अनेकवेळा मुख्य व उपवाहिनी तसेच उपनळ्या ज्या ठिकाणी जोडल्या जातात तेथे पाण्याच्या जास्त दाबामुळे गळती होते. त्याचप्रमाणे गाळण यंत्रणा सक्षम नसेल तर वारंवार तोट्या बंद पडतात. पाणी क्षारयुक्त असेल, तर उपनळ्या व तोट्या कार्यक्षमतेने कार्य करीत नाहीत. यासाठी संचाची वारंवार निगा ठेवणे आवश्यक असते.
३) उंदीर / खारींचा उपद्रव – काही भागात उंदरांमुळे अथवा खारींमुळे उपनळ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.
४) आधुनिक यंत्राच्या माहितीचा अभाव – ठिबक सिंचन संच बसविल्यानंतर पिकास तोट्या किती बसवाव्यात, पाण्याची एकूण मात्र किती द्यावी, संच किती वेळ चालवावा, खते कशी द्यावीत, संचाची निगा कशी राखावी याबाबतीत बर्याच वेळा माहिती उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी येतात.
“ एकंदरीतच “ More Crop Per Drop ” हि संकल्पना ठिबक सिंचन पद्धतीला साजेशी आहे. म्हणूनच सिंचनाच्या सर्व प्रकारात सूक्ष्म सिंचनातील “ ठिबक सिंचन ” हि पद्धत पिकांना तसेच शेतकऱ्यांना थेंबा – थेंबातून समृद्धीकडे घेऊन जाण्यास खऱ्या अर्थाने सक्षम आहे. ”
Share your comments