ठिबक सिंचन पद्धतीचा वापर आजच्या स्थितीत वाढताना दिसतोय. ठिबकद्वारे पिकांना गरजेप्रमाणे व योग्य वेळी पाहिजे तेवढेच पाणी दिले जाते. पिकांना पारंपरिक पद्धतीने पाणी देण्यापेक्षा ठिबकद्वारे ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते. दांडाने पाणी देण्याऐवजी ठिबक संचामुळे दुप्पट क्षेत्र पाण्याखाली आणता येते. विहिरीला मुबलक पाणी असले तरी विजेच्या लपंडावामुळे दिवसा सिंचन शक्य होत नाही. मात्र, ठिबक सिंचन पद्धतीमुळे शेतकरी रात्रीसुद्धा फक्त व्हॉल्व सुरू करून पिकांना ओलिताखाली आणू शकतो.
ठिबक सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनात सरासरी २० ते ३० टक्के वाढ होते. शिवाय वेळेवर व योग्य पाणी मिळाल्यामुळे पिकांचा दर्जा वाढतो. ठिबकमधून विद्राव्य खते पिकांना देता येतात. परिणामी, खतांची मुबलक मात्रा बसून पीक जोमदार येते. पिकांचा पक्व होण्याचा कालावधी कमी होऊन कमी कालावधीत पीक तयार होते व काढता येते. पारंपरिक पद्धतीने पाणी द्यायचे ठरल्यास जमिनीचे सपाटीकरण करावे लागते. कारण त्याशिवाय दांडातून पाणी पिकांपर्यंत पोचत नाही. मात्र, ठिबकमुळे जमीन सपाट करण्याची गरज पडत नाही. म्हणजे, हा खर्च वाचतो. चढउताराच्या जमिनीवर फळझाडे लावता येतात.
ठिबक संचामुळे खतांमध्ये ३५ टक्के बचत
ठिबक संचाद्वारे फक्त पिकांच्या मुळाशी पाणी पोचते. त्यामुळे गवताची उगवण कमी होते. गाजरगवत, काँग्रेस गवत वाढत नाही. खते देण्याचाही खर्च ठिबकमुळे वाचतो. पाण्यात विरघळू शकणारी खते ठिबक संचातून दिली जातात. परिणामी, खतांचा सुयोग्य वापर होतो. विशेष खते हाताने दिल्याच्या तुलनेत ठिबकद्वारे दिल्यास ३०-३५ टक्के बचत होते. ठिबकद्वारे पाणी फक्त झाडाच्या बुंध्यापर्यंत पोचते. जमीन पूर्ण ओली होत नाही. त्यामुळे जमिनीचे आरोग्य चांगले राहते. पिकांवरील रोगासह किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणावर होतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, मजुराच्या खर्चात मोठी बचत होते. आज शेतकरी बांधव मजूर नसल्याने त्रस्त आहेत. ठिबकद्वारे कितीही क्षेत्र पाण्याखाली भिजवता येते आणि एकटा शेतकरी हे करू शकतो. अर्थात, मजुरांचा खर्च वाचविता येतो.
हलक्या जमिनीतही ठिबक संच उपयुक्त
पिकांना भरमसाठ पाणी दिले तर जमीन खारवट व चोपण होण्याची शक्यता असते. ठिबकद्वारे पाणी दिल्यामुळे जमिनी खारवट किंवा चोपण होत नाहीत. ठिबक संचाद्वारे मनुष्यबळ, इंधन व वीज कार्यशक्तीच्या खर्चात मोठी बचत होते. शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. वादळवारा आला की शेतातील साहित्यावरही विपरीत परिणाम होतो. मात्र, वारा किंवा वादळाचा ठिबक संचावर काहीच परिणाम होत नाही. ठिबकच्या वापरामुळे पाणी वाया जात नाही. जमिनीची धूपही होत नाही. ठिबकद्वारे क्षारयुक्त पाणी पिकांना दिले गेले तरी जमिनीवर फारसा परिणाम जाणवत नाही. मर्यादित जमीन असेल तर ठिबकसारखी फायदेशीर पद्धत नाही. विशेषतः हरितगृहातील नाजूक पिके, फुलांसाठी ठिबक अतिशय फायदेशीर ठरतेय. निकृष्ट जमिनीतसुद्धा ठिबकद्वारे पीक घेणे शक्य होते.
ठिबक सिंचन पद्धतीसमोरील अडचणी
ठिबक सिंचन संच हा सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. कोरडवाहू, अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी प्रारंभीचा भांडवली खर्च उत्पन्नापेक्षा जास्त वाटतो. ठिबकमध्ये पाणी देण्याच्या इतर पद्धतीपेक्षा व्यवस्थापन कुशलता जास्त असायला हवी. म्हणून, तांत्रिक माहिती असलेल्या प्रशिक्षित व्यक्तीकडून संच चालविण्याची व निगा कशी राखावी, याची माहिती घ्यावी. ठिबक संचामधून पिकांना देण्यात येणारे पाणी हे स्वच्छ व काडी-कचरा नसलेले असावे लागते. सूर्यप्रकाशामुळे ठिबकच्या नळ्या लवचिक होऊन खराब होण्याची शक्यत असते. शेतात जनावरांचा वावर असल्यास ठिबकच्या नळ्यांना धोका पोचतो. वरील मुद्दे लक्षात घेऊन ठिबक संचाची काळजी घेतल्यास नुकसान होणार नाही आणि संच अनेक वर्षे सहज वापरणे शक्य होते.
Share your comments