डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे यांना केंद्रीय मृदा क्षारता संशोधन संस्था, कर्नाल, हरियाणा द्वारा 'क्षारयुक्त जमीन संशोधनासाठी' नुकतेच "राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्टता पुरस्कार" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली, अंतर्गत केंद्रीय मृदा क्षारता संशोधन संस्था, कर्नालच्या 54 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधत संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमात चौधरी चरणसिंह हरियाणा कृषि विश्व् विद्यालय, हिस्सारचे कुलगुरु डॉ.बी आर कंबोज यांचे शुभहस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ.विलास खर्चे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला या दोन्ही विद्यापीठात क्षारयुक्त जमिनींच्या संशोधनासाठी संशोधकांची चमू तयार करून तसेच विविध प्रकल्पांतर्गत या समस्यायुक्त जमिनींच्या योग्य निदानासाठी आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी सातत्याने संशोधन कार्य करीत प्रभावी तंत्रज्ञान विकसित केले. महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक प्रकारची क्षारता, यांसह विदर्भातील पूर्णा खोऱ्यातील खारपान पट्ट्याच्या क्षेत्रातील क्षारता तर दुय्यम प्रकारची सिंचनामुळे निर्माण झालेली क्षारता आणि पश्चिम महाराष्ट्रातील मुळा आणि गोदावरी लाभक्षेत्र मध्ये
आढळणारी क्षारता मुख्यत: आढळून येते. या दोन्ही प्रकारच्या क्षारयुक्त जमिनींच्या सुधारणेसाठी अत्यंत सोपे, कमी खर्चाचे, शेतावरील संसाधनांचा वापर करून योग्य पीक पद्धतीचा अवलंब करीत संशोधित तंत्रज्ञान सदर समस्यायुक्त जमिनींच्या उत्पादकता वाढविण्यास मदतगार सिद्ध होत आहे. या जमिनी मधील कर्बाचे प्रमाण वाढून त्यांचे आरोग्य सुधारत असून सदर तंत्रज्ञानाविषयीच्या शिफारशी शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील क्षारयुक्त चोपण जमिनीत पीक उत्पादकता वाढीसाठी आणि जमीन तथा पाणी या विभागातील शेतीच्या शाश्वत्तेसाठी सदर तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे.
उपरोक्त संशोधनात्मक कार्य क्षारयुक्त जमिनींच्या संशोधनात महत्त्वाचे ठरणारे असून त्यांचे वर्गीकरणाविषयी सुधारणा प्रस्तावित केलेल्या आहेत. संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या या अतिशय महत्त्वाकांक्षी कामगिरी तथा पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे सह कृषी विद्यापीठातील सर्व संचालक शास्त्रज्ञ अधिकारी कर्मचारी विद्यार्थी वर्गांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तर सदर पुरस्काराचे श्रेय डॉ. विलास खर्चे यांनी दोन्ही कृषी विद्यापीठातील संशोधकांच्या चमूला दिले आहे विदर्भातील खारपाण पट्ट्यात या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार असून त्याद्वारे खऱ्या अर्थाने खारपाणपट्ट्यातील जमिनी सुजलाम-सुफलाम तर शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यात निश्चितच मदत मिळणार आहे.
Share your comments