काकडी पिकावरील केवडा रोगाची लक्षणे : शेतकरी बंधूंनो काकडी पिकावरील केवडा (Downy mildew) हा बुरशीजन्य रोग असून काकडी व्यतिरिक्त हा रोग कलिंगड, खरबूज, कारली, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, दोडका,घोसाळी, पडवळ यासारख्या वेलवर्गीय पिकावर सुद्धा येतो. या रोगात सुरुवातीला पानाच्या वरच्या बाजूला फिकट हिरवे पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात. ढगाळ हवामानात या ठिपक्याच्या खालच्या बाजूला जांभळट रंगाची बुरशीची वाढ झालेली दिसते. नंतर हेच जांभळट डाग पांढरे काळे किंवा राखाडी झालेले दिसतात. या रोगाचा प्रादुर्भाव पूर्ण वाढ झालेल्या पानावर जास्त आढळून येतो. या रोगाचा तीव्र प्रादुर्भाव झाल्यास पानाचे देठ, कळ्या व झाडाच्या फांद्या सुद्धा रोगग्रस्त होतात. प्रादुर्भाव झालेली पाने करपतात व गळून पडतात. अशा रोगग्रस्त वेलींना फुले फळे कमी प्रमाणात लागतात. आलेली फळे लहान आकाराची कमी दर्जाची आणि बेचव असतात. रोगग्रस्त काकडीच्या वेली लवकर सुकतात एकंदर या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात लक्षणीय घट येते.
काकडी पिकावरील केवडा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन : शेतकरी बंधूंनो काकडी पिकावरील केवडा रोगाच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी योग्य निदान करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरजेनुसार खालील उपाय योजनेचा अंगीकार करावा
(१) काकडी पिकाची लागवड करताना योग्य उत्तम निचरा होणारी जमीन निवडून शिफारशीत अंतरावर काकडी पिकाची लागवड करावी.
(२) संबंधित कृषी विद्यापीठाच्या तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य रोगप्रतिकारक जातीची लागवड करावी
(३) काकडी पिकाची लागवड ताटी किंवा मंडप पद्धतीने केल्यास खेळती हवा व भरपूर सूर्यप्रकाश यामुळे या रोगाचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते.
(४) या रोगाची लक्षणे दिसू लागताच प्रथम एकटी दुकटी दिसणारी रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावी.
(५) काकडी पिकात या रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागताच योग्य निदान करून प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार खालील पैकी कोणत्या एका बुरशीनाशकाची निर्देशीत प्रमाणात फवारणी करावी.
Azoxystrobin 23% SC 10 मिली अधिक दहा लिटर पाणी.
किंवा
Metiram 55% + Pyraclostrobin 5% WG या संयुक्त बुरशीनाशकाची 30 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी
किंवा
Ametoctradin 27 % + Diemethomorph 20.27 % w/w SC या संयुक्त बुरशीनाशकाची 20 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका बुरशीनाशकाची गरजेनुसार फवारणी करावी.
टीप : (१) वर निर्देशित उपायोजना अंगीकार करण्यापूर्वी योग्य निदान करून प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊनच गरजेनुसार वापर करावा
(२) बुरशीनाशके फवारणीपूर्वी लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करून बुरशीनाशकाची फवारणी लेबल क्लेम शिफारशी प्रमाणेच करावी.
(३) बुरशीनाशके फवारताना किंवा कीडनाशक के फवारताना सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा अंगीकार करावा तसेच कीडनाशक फवारल्यानंतर त्यांचे अवशेष पिकावर राहू नये याकरिता बुरशीनाशके फवारल्यानंतर पीक काढणीचा प्रतीक्षा कालावधी लक्षात घेऊन कीडनाशकांचे अंश पिकावर राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.
Share your comments