1. कृषीपीडिया

अशी करा सुबाभूळ लागवड

सुबाभूळ हे विविधोपयोगी बहुवर्गीय द्विदल जातीचे झाड आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
अशी करा सुबाभूळ लागवड

अशी करा सुबाभूळ लागवड

सुबाभूळ हे विविधोपयोगी बहुवर्गीय द्विदल जातीचे झाड आहे. द्विदल चारा पिके हि प्रथिने व खनिज संपन्न असतात. पशुखाद्यात द्विदल पिकांच्या चाऱ्याचा समावेश केल्याने सकस खाद्य मिळते, तसेच खुराकाचे प्रमाणही कमी करता येते. त्यामुळे खुराकावरील खर्च कमी होतो. सुबाभुळच्या बियादेखील खुराक म्हणून वापरता येतात. सुबाभूळपासून चांगल्या प्रतीचे इमारतीचे व सरपणाचे लाकूड मिळू शकते. याशिवाय हे झाड वारा प्रतिबंधक व कुंपण म्हणून उपयुक्त आहे. त्याच्या लागवडीमुळे जमीन आच्छादली जाऊन धूप थांबते. या पिकामुळे जमिनीची सुपीकता टिकवता येते आणि जमिनीचा पोत ही सुधारतो.हवामान - सुबाभुळची लागवड विविध प्रकारच्या हवामानात करता येते. पावसाचे प्रमाण ७५-२०० सेंटीमीटर असणाऱ्या भागात वाढ चांगली होते. तथापि हे झाड अतिपावसाच्या भागातही चांगले वाढताना आढळते. अतिथंड हवामानात मात्र ह्याची वाढ खुंटण्याची शक्यता असते.जमीन - सुबाभुळची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीवर करता येते. हे झाड खारवट जमिनीवरसुद्धा लावता येते. आम्लयुक्त जमिनीवर लागवड करावयाची असल्यास बियाण्यावर चुन्याची प्रक्रिया करावी अथवा जमिनीत पुरेसा चुना मिसळावा. भरपूर उत्पादनासाठी चांगल्या निचऱ्याची, चुना व स्फुरद असणारी जमीन लागवडीसाठी योग्य असते. 

तथापि डोंगरमाथ्यावर, उताराच्या जमिनीवर,गवती रानात, पडीक जमिनीवर तसेच रस्त्याच्या कडेने देखील याची लागवड करता येते. भात लावलेल्या ठिकाणी बांधावर याची वाढ उत्तमरीत्या होते. सतत पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत मात्र हे तग धरू शकत नाही. साल्वाडोर प्रकारची सुबाभूळची झाडे हवाईन प्रकारापेक्षा दुप्पटीने पाने व पशुखाद्य देतात. त्याचप्रमाणे हि झाडे लाकूड,जळाऊ लाकूड व इतर उत्पन्नासाठीही फार मोठ्या प्रमाणावर लावण्यात येतात. या झाडांना हवाईन जायन्ट, के-६,के-२८,के-६७ नावानेही ओळखले जाते.पूर्वमशागत सुबाभुळाच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत आवश्यक नाही. अनावश्यक झाडे-झुडपे असल्यास ती मुळासकट काढून टाकावीत. माध्यम ते खोल असणाऱ्या जमिनीत एक खोल नांगरट करावी. उथळ जमिनीत लागवडीच्या जागेवर खड्डे घ्यावेत. खड्डे चांगली माती व शेणखत टाकून लागवडीसाठी तयार ठेवावेत.बियांवर प्रक्रिया करणे(बीजप्रक्रिया)सुबाभूळ बियाण्याचे कवच कठीण असते. उगवण लवकर होण्यासाठी खालील प्रक्रिया करावी.पाणी उकळावे व २-३ मिनिटे थंड झाल्यावर त्या गरम पाण्यात बिया पाच मिनिटे बुडवाव्यात. नंतर बिया पोत्यावर टाकून जास्तीचे पाणी काढून टाकावे व ८-१० तास वाळवाव्यात.

नंतर बियाणांवर रायझोबियम या जातीच्या जिवाणूसंवर्धकाची प्रक्रिया करावी. आम्लयुक्त जमिनीसाठी सी.बी. ८१ आणि आम्लविरहित जमिनीसाठी एन.जी.आर.-८ हि जिवाणू संवर्धके वापरावी. आमलयुक्त जमिनीत लागवड करावयाची असल्यास बियाण्यावर चुना व सुपर फॉस्फेट ( एक किलो बियाण्यांसाठी अर्धा किलो ) यांचे आवरण द्यावे.लागवडीची पद्धत सुबाभुळाच्या लागवडीच्या दोन पद्धती आहेत.अ) रोपापासून लागवड लागवडीसाठी प्रथम १५-२० सेंटीमीटर आकाराच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये दोन भाग चांगली माती, एक भाग शेणखत यांचे मिश्रण भरावे आणि प्रत्येक पिशवीत प्रक्रिया केलेल्या दोन बिया दीड ते दोन सेंटीमीटर खोल पेराव्यात. पिशव्या सावलीत ठेवाव्यात. बियांची उगवण होईपर्यंत पिशव्यांना झारीने रोज पाणी द्यावे आणि उगवण झाल्यानंतर पाणी दोन दिवसांनी द्यावे. दोन्ही रोपटी उगवल्यानंतर एक रोपटे हळुवारपणे काढून दुसऱ्या पिशवीत लावावे. साधारण पेरणीनंतर ५०-६० दिवसांनी रोपे लागवडीसाठी तयार होतात. रोपांची लागवड एक-दोन पाऊस पडल्यानंतर जमीन ओली असताना करावी.ब) टोकण पद्धतीने लागवड या पद्धतीनुसार ५ ५ ५ सेंटिमीटरचा खड्डा खुरपीने खणून प्रक्रिया केलेल्या तीन बिया दीड सेंटीमीटर खोलीवर पेरून वर माती घालून दाबावी. या पद्धतीने लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीस दोन चांगले पाऊस पडल्यानंतर करावी. लागवडीनंतर लगेच पाऊस न पडल्यास पाणी द्यावे. बियांची उगवण पेरणीनंतर साधारणतः ८-१० दिवसात होते. या पद्धतीशिवाय देशी नांगराने साऱ्या पडून त्यामध्ये हाताने बी पेरता येते.

झाडांमधील अंतर जमीन सकस असेल तर व पाणी पुरवठ्याची सोया चांगली असेल तर झाडांमधील अंतर खालीलप्रमाणे ठेवावे.अ) चाऱ्यासाठी : ओळीतील अंतर साधारण १ मिटर व दोन झाडांमधील अंतर २०-३० सेंटिमीटर बियाणे : हेक्टरी ५-८ किलोरोपे : हेक्टरी ३००००-४००००ब) सरपणासाठी : ओळीतील अंतर २ मिटर व झाडांमधील अंतर १ मिटर किंवा १ मिटर१ मीटर क) इमारती व फर्निचरच्या लाकडासाठी : ओळीतील अंतर ४-५ मित्र व दोन झाडांमधीलंतर दोन मीटर जमीन निकृष्ट प्रतीची असेल व पाणीपुरवठा कमी असेल तर हि अंतरे जास्त ठेवावीत. डोंगरावर व उतार असलेल्या उंच जागी झाडे चर खणून त्यात लावावीत. उतारावर ४०-५० सेंटीमीटर खोल चर खणून त्यात १ मीटर अंतरावर खड्डे खणून रोपे लावावीत. दोन चरांमधील अंतर साधारणतः ३-४ मीटर असावे. अशा पद्धतीमुळे पाणी पुरवठ्याची सोय चांगल्यारितीने होते. तसेच उंच ठिकाणावर झाडे लावायची असल्यास नत्र वापरावे. त्यामुळे वाढ चांगली होते.खतपुरवठा - नत्र व स्फुरद युक्त खतांचा सुबाभुळच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. लागवडीपूर्वी जमिनीला हेक्टरी ७.५-८ टन शेणखत अथवा कंपोस्ट द्यावे. लागवडीच्यावेळी १००-१५० किलो सुपर फॉस्फेट व २५ किलो युरिया द्यावे. खात पुरवठ्यामुळे मुळांची वाढ उत्तम होऊन उत्पादनात वाढ होते. नंतर ३-४ वर्षांनी पुन्हा १०० किलो सुपर फॉस्फेट द्यावे. पेरणीनंतर ३-४ वर्षे खात देण्याची गरज नसते.

पाणीपुरवठा - निव्वळ पावसावर सुबाभूळची लागवड करता येते. पावसाळ्यानंतर पाण्याच्या पाळ्या हिवाळ्यात २० दिवसांच्या अंतराने व उन्हाळ्यात १०-१५ दिवसांच्या अंतराने पुरेशा आहेत.आंतरमशागत - सुरुवातीच्या काळात रोपाची वाढ जोमाने होण्यासाठी पीक ताणरहित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी लागवडीपासून पहिल्या महिन्यानंतर व दुसऱ्या महिन्यानंतर तण काढून टाकावे.कापणी - अ) चाऱ्यासाठी पहिली कापणी ५-६ महिन्यांनी मिळते. सर्वसाधारण पीक दीड ते दोन मीटर वाढले असता पहिली कापणी जमिनीपासून ६० सेंटीमीटर उंचीवर करावी. दुसरी व तिसरी कापणी १० सेंटीमीटर उंचीवर ४०-५० दिवसांनी करावी. यंत्राच्या कापण्या पिकाची ९० सेंटीमीटर उंची कायम ठेऊन ३५-४० दिवसांच्या अंतराने कराव्यात.ब) सरपणासाठी आणि इमारती लाकडासाठी : पहिली कापणी अडीच ते तीन वर्षांनी करता येते. जमिनीपासून १५-२० सेंटीमीटर उंचीवरून सर्व झाड कापता येते. एक ते दीड महिन्यांनी पुन्हा त्याची वाढ सुरु होते. अशावेळी फक्त २-३ चांगल्या वाढणाऱ्या फांद्या ठेवाव्यात व बाकीच्या कापून टाकाव्यात. दोन ते अडीच वर्षांनी वरच्या भागाला झाडे अतिशय दाटीवाटीने वाढतात. 

त्यासाठी सलग तीन रांगेतील मधली रंग कापावी. असे केल्याने झाडांची योग्य वाढ होण्यास वाव मिळेल. तसेच झाडांना सूर्यप्रकाश व हवा चांगल्या रीतीने मिळू शकेल.उत्पन्नअ) हिरवा चारा : योग्य मशागत व देखरेखीखालील पूर्ण वाढ झालेल्या चांगल्या पिकापासून हेक्टरी ५०-६० टन वैरणीचे उत्पन्न वर्षाला मिळते.ब) सरपण व इमारतीच्या लाकडाचे उत्पन्न : चांगल्या प्रकारे वाढ झालेल्या झाडापासून हेक्टरी ४५-५० टन लाकडाचे उत्पन्न वर्षाला मिळते.सुबाभूळ चारा म्हणून वापरताना घ्यावयाची काळजी.१.सुबाभूळची फक्त पाने न तोडता ती फांदीसह तोडावीत व त्यांचे तुकडे करून जनावरांस खावयास द्यावेत.२.सुबाभुळची पाने,भाताचा पेंढा,नागली काड,कडबी यांसारख्या वाळलेल्या वैरणीसोबत मिसळून द्यावीत.३. सुबाभुळच्या चाऱ्याची सर्व मात्र एकाच वेळी न देता दिवसातून २-३ वेळा विभागून द्यावी.४.सर्व काळजी घेतली असता पूर्ण वाढ झालेल्या गाईला दिवसाला १० किलोपर्यंत सुबाभूळचा चारा देण्यास हरकत नाही.

English Summary: Do this subabhul lagvada Published on: 13 June 2022, 12:01 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters