शेती व्यवसायात बीजोत्पादन हा चांगला पर्याय ठरू शकतो.
श्री. संजय बापूराव ताटे, मु. पो. पोखरभोसी, ता. लोहा, जिल्हा नांदेड (मोबाईल 9763639321) येथील शेतकरी स्वतःच्या एकत्र कुटुंबासह २२ एकर जमीन कसतात. कापूस, सोयाबीन, ज्वारी, हळद, हरभरा, मका यासह ४ एकर क्षेत्रावर भाजीपाला बीजोत्पादन घेतात. भाजीपाला बीजोत्पादन हा त्यांच्या परिवाराचा प्रमुख व्यवसाय आहे. यामध्ये मिरची, टोमॅटो, कारले, भेंडी, दुधीभोपळा, दोडका व वांगी या भाजीपाला पिकाच्या बीजोत्पादनात त्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे.
बीजोत्पादन कसे सुरु झाले?
२००७ साली शेतीला वैतागून देऊळगाव राजा इथे घर सोडून निघून गेले होते. त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून भाजीपाला बीजोत्पादनाची माहिती मिळाली. त्यानंतर १५ दिवसांचे भाजीपाला बीजोत्पादन प्रशिक्षण घेतले.
खाजगी बीजोत्पादन कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून २००९ साली पहिला मिरची बीजोत्पादन प्लॉट घेतला. आज त्यांच्यासोबत शेडनेट असलेले १०० पेक्षा अधिक शेतकरी जोडले गेले आहेत. तसेच ओपन प्लॉटमध्ये उत्पादन करणारे एक हजारपेक्षा जास्त शेतकरी आहेत. १० गुंठे क्षेत्रफळाचे ४ शेडनेट त्यांनी टप्याटप्याने उभारले आहेत. काकडी, टोमॅटो व मिरची पिकाचे उत्पादन शेडनेट मध्येच घेतात. इतर पिकांचे बीजोत्पादन ओपन प्लॉटमध्ये घेतले जाते.
बीजोत्पादनाच का?
बीजोत्पादनातून हमी पैसे मिळतात. पारंपारिक पिकात मशागत व मजुरी खर्च वाढला आहे. त्यामुळे नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे.
बीजोत्पादनातून किती पैसा मिळतो?
मे महिन्याच्या शेवटी मिरची लागवड करतात. त्याची जुलै-ऑगस्टमध्ये परागीभवनाचे (क्रॉस-पॉलिनेशन) काम चालते. मिरची व टोमॅटो पिकाच्या परागीभवनासाठी हंगामात ३० ते ४० मजुरांची दररोज गरज असते. मिरची बीजोत्पादनासाठी १० गुंठे क्षेत्रात ६० हजार ते एक लाखाचा खर्च येतो तर १ क्विंटल मिरची बियाणे तयार होते. ३००० रुपये किलो प्रमाणे बियाण्याची विक्री कंपनीला केली जाते. भेंडी बीजोत्पादनात १० गुंठे क्षेत्रातून २ क्विंटल पर्यंत बियाणे तयार होते. ४० हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बियाण्यांची विक्री केली जाते. भेंडी पिकात बियाणे उत्पादनासाठी उत्पन्नाच्या २० टक्के खर्च येतो.
बीजोत्पादनाचा खर्च कमी कसा केला?
शेणखताच्या वापरामुळे उत्पादन खर्च कमी होत असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. जमिनीला सेंद्रिय खताचा पुरवठा व्हावा यासाठी पशुपालन केले आहे. एक बैलजोडी, गाई-म्हशी यांचे पालन करतात. यांत्रिकीकरण केल्यामुळे उत्पादन खर्चात बचत झाली आहे. बीजोत्पादन करण्यासाठी आवश्यक सर्व मशिनरी व यंत्रे गरजेनुसार विकत घेतले आहेत. बिया वेगळे करणारे यंत्र, ड्रायर, बियाणे धुण्यासाठी एसटीपी मोटर त्यांनी टप्प्याटप्प्याने विकत घेतले आहे. नवनवीन तंत्रांचा वापर करून बीज उत्पादनाचा खर्च कमी केला आहे. पूर्वी बाभळीच्या काट्यांचा वापर कळी फोडण्यासाठी केला जात होता. आता सुधारित चिमटे परून क्रॉसिंग केली जाते. त्यातून मजुरांची बचत झाली आहे. बीजोत्पादनासाठी मल्चिंग तंत्राचा वापर केला आहे, त्यामुळे आंतरमशागत, सिंचन यांचा खर्च कमी झाला आहे. तसेच कीड व्यवस्थापनासाठी कडूनिंबाच्या पानाचा अर्क वापरला जातो. तसेच इतर वनस्पतीजन्य अर्काची फवारणी होते. संपूर्ण बीजोत्पादन पिकाला ठिबक सिंचन केले आहे.
बीजोत्पादनासाठी पीकनिहाय आवश्यक यंत्रांचा संच यांनी तयार केला आहे. बियाणे तयार करण्यासाठी आवश्यक यंत्रांची उपलब्धता इतर शेतकऱ्यांना करून देतात. त्याबदल्यात कंपनी त्यांना सेवाशुल्क देते. त्यांनी उत्पादित केलेल्या टोमॅटो, मिरची व झुकिनी पिकाचे बियाणे कंपनीच्या माध्यमातून इतर देशात निर्यात होते.
खाजगी कंपनीच्या वतीने बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी श्री. संजय ताटे संभाळतात. बीजोत्पादक शेतकऱ्यांची नोंद घेऊन त्यांच्या बियाणे उत्पादनानुसार बँक खात्यात कंपनीकडून पैसे जमा होतात.
खर्च नोंदी कशासाठी व निव्वळ उत्पन्न किती?
बीजोत्पादनासाठी झालेल्या खर्चाच्या नोंदी नियमित ठेवल्या जातात. शेतीचा खर्च लिहिल्यामुळे संपूर्ण कामाची जाणीव होऊन कामाचे नियोजन करण्यासाठी फायदा होतो. वर्षाकाठी १० ते १२ लाखाचे एकूण उत्पन्न मिळते. त्यापैकी ५ ते ६ लाखाचा खर्च होतो. पारंपरिक पीक पद्धतीपेक्षा बीजोत्पादनातून चांगली आर्थिक प्राप्ती होत असल्याचे संजय ताटे सांगतात.
तुम्हाला ही टॅलेंटेड फार्मरची यशोगाथा कशी वाटली? तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे इतर कुणी अशी आदर्शवत शेती करतात का? आम्हाला नक्की कळवा.
Share your comments