विशेषता विदर्भात सोयाबीन वरील खोडमाशी ही एक महत्त्वाची नुकसान करणारी कीड म्हणून समोर येत आहे. तेव्हा या या किडी बद्दल व या किडीच्या व्यवस्थापनाबद्दल काही बाबी जाणून घेऊ.(A) सोयाबीन वरील खोडमाशीची ओळख व नुकसानीचा प्रकार : सोयाबीन मधील खोडमाशीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकाचे रोप अवस्थेपासून म्हणजे साधारणतः सोयाबीनचे रोप दहा ते पंधरा दिवसाचे झाल्यावर आढळून येऊ शकतो. सोयाबीन पिकावरील खोड माशीची प्रौढावस्था म्हणजेच माशी अवस्था चमकदार काळ्या रंगाची व आकाराने लहान म्हणजे 2 मी. मी असते. या किडीची अंड्यातून निघालेली बिन पायाची अळी फिकट पिवळसर रंगाची असून ही अंड्यातून बाहेर पडलेली अळी प्रथम सोयाबीनची पाने पोखरते आणि पानाच्या देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून या फांदीचा किंवा खोडाचा आतील भाग पोखरून खाते. अशा प्रकारचे प्रादुर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास आतमध्ये पांढुरक्या रंगाची अळी किंवा कोष आढळतो, या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या रोपावस्थेत झाल्यास म्हणजेच सोयाबीन पेरणीनंतर १० ते १५ दिवसाचे पीक असताना झाल्यास अशा
प्रकारचे खोडमाशीने प्रादुर्भावग्रस्त असलेले झाड वाळते व झाडाच्या ताटाच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊन कधी कधी तीव्र प्रादुर्भाव झाल्यास दुबार पेरणी करण्याचे सुद्धा काम पडू शकते व अशा प्रकारे रोप अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सोयाबीनचे पीक मोठे झाल्यावर या किडीच्या प्रादुर्भावामुळे असा परिणाम दिसत नाही परंतु अशा झाडावर खोड माशीच्या अळीने प्रौढ माशीला बाहेर पडण्यासाठी केलेले सिद्र आढळते. खोडमाशीची अळी किंवा कोश फांद्यात किंवा खोडात आढळतो. अशा खोडमाशीने कीडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वजनात सुद्धा घट घेऊन या किडीच्या तीव्र पादुर्भावत सोयाबिनच्या उत्पादनात 16 ते 30 टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते.(B) सोयाबीन पिकावरील खोडमाशी करिता व्यवस्थापन योजना :(१) शेतकरी बंधूंनो सोयाबीन पिकावरील खोड माशीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनाचा भाग म्हणून पेरणीपूर्वी Thiamethoxam 30 % F.S. या कीटकनाशकाची 10 मिली प्रति किलो सोयाबीन बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करून घ्या. या बीजप्रक्रियेमुळे सुरुवातीचे २५ ते ३० दिवस सोयाबीन पिकावरील खोड माशीचा प्रतिबंध मिळण्यास मदत होते.
सोयाबीन पिकात बीज प्रक्रिया करताना प्रथम रासायनिक बुरशीनाशक, नंतर रासायनिक कीटकनाशक, नंतर जैविक बुरशीनाशक व नंतर जिवाणूसंवर्धन या क्रमाने शिफारशीप्रमाणे योग्य पद्धत अंगीकार करून बीजप्रक्रिया करावी.(२) सोयाबीन पिकात खोडमाशीच्या प्रादुर्भावर लक्ष ठेवण्यासाठी सोयाबीन पिकात उगवणीनंतर ८ ते १० दिवसांनी प्रति हेक्टर 25 पिवळे चिकट सापळे सोयाबीन पिकात लावावे.(३) शेतकरी बंधूंनो सोयाबीन वरील खोडमाशीसाठी उष्ण तापमान,जास्त आद्रता, भरपूर पाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण अशा बाबी वाढीसाठी पोषक ठरतात म्हणून अशा वातावरणात पेरणीनंतर वेळोवेळी या किडी संदर्भात शेतकर्यांनी जागरूक राहून वेळोवेळी निरीक्षण घ्यावी व योग्य निदान करून विशेषतः पेरणीपूर्वी सोयाबीन पिकात काही कारणास्तव Thiamethoxam 30 % FS या वर निर्देशित कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केली नसल्यास प्रादुर्भाव लक्षात घेऊन खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची निर्देशीत प्रमाणात घेऊन फवारणी करावी. Ethion 50 % EC 30 मिली अधिक दहा लिटर पाणी. किंवा Chlorantraniliprole 18.5 SC 3 मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवाbIndoxicarb 15.8 SC 6.6 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार फवारणी करावी.टीप : (१)वर निर्देशित संदेश सन्माननीय विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे वरील संदर्भीय ऍडव्हायझरीचा संदर्भ घेऊन शेतकरी हीतात कृषी विस्तारासाठी संकलित करून प्रसारीत करण्यात आला असून याकरिता संदेश संकलक या नात्याने सन्माननीय विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या मूळ ऍडव्हायझरी व कार्याबद्दल शतशः आभारी आहे आहे व ऋणी आहे व त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.(२) रासायनिक कीडनाशके वापरण्यापूर्वी अद्यावत लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे सुरक्षित कीडनाशक तंत्राचा अंगीकार करून प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार करावा.अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी.
संदेश संकलन - राजेश डवरे : तांत्रिक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड करडा तथा कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.
Share your comments