शेणखताचे ढीग वर्षभर ऊन-पावसात राहतात, त्यामुळे त्यातील अन्नघटक पाण्यासोबत वाहून जातात किंवा कडक उन्हात नष्ट होतात, त्यामुळे फायदेशीर असणारे सर्व जीवाणू नष्ट होतात म्हणूनच शेतात मिसळलेल्या शेणखतातून अर्धा टक्क्यापेक्षा कमी अन्नघटक मिळतात. शेणखताच्या ढिगावर अन चे बीसुद्धा ढिगावर पडून शेतात जाते. शेणखताचा खड्डा तीन फुटांपेक्षा जास्त खोल असेल, तर तेथे शेणखत कुजण्याची प्रक्रिया होत नाही. अशा शेणखतास दुर्गंधी येते. तेथे पिकास अपायकारक बुरशींची वाढ होऊन ते पिकास हानिकारक असते.
बायोडायनॅमिक कंपोस्टनिर्मिती ः
बायोडायनॅमिक कंपोस्ट पद्धतीमध्ये शेणखत पूर्णपणे कुजवणे ३० ते ४० दिवसांत शक्य आहे. शेणखताच्या ढिगास १५ फूट लांब, ५ फूट रुंद आणि ४ फूट उंचीपर्यंत आकारून घ्यावे. शेणखतातील सुकलेल्या शेण गोवऱ्या आणि कुटार ४ ते ५ दिवस हलके ओले करून घ्यावे. ढीग शक्यतो पूर्व-पश्चिम दिशेने आकारावा.
शेणखताच्या ढिगासाठी एक किलो बायोडायनॅमिक एस-९ कल्चर पुरेसे असते. मोठ्या बादलीमध्ये १३ लिटर पाणी घेऊन त्यात एक किलो बायोडायनॅमिक एस-९ कल्चर मिसळून एक तासापर्यंत घड्याळाच्या काट्याप्रमाणे काठीने फिरवून पाण्यात भोवरा तयार करावा. पाणी ढवळताना काठी बादलीच्या बाहेरील भागामधून मध्यभागी फिरवत गती दिल्यास भोवरा चांगला तयार होतो. नंतर उलट दिशेने फिरवून भोवरा तयार करावा, त्यामुळे बायोडायनॅमिक एस-९ कल्चरमध्ये सुप्तावस्थेत असलेल्या जिवाणूंना गती व प्राणवायू मिळून ते सक्रिय होतात.
असे तयार झालेले द्रावण, ढिगावर दर एक फूट अंतराने एक फूट खोल छिद्र करून त्यामध्ये अर्धा लिटर या प्रमाणात ओतावे. छिद्र शेणखताने लगेच बंद करून घ्यावे.
कल्चर शेणखताच्या ढिगात सोडल्यानंतर संपूर्ण ढीग सर्व बाजूंनी जमिनीपर्यंत शेणमाती मिश्रितकाल्याने लिंपून घ्यावा. लिंपताना शेणकाल्यात माती किंवा गव्हांडा मिसळल्यास ढिगास तडे पडत नाहीत. या ढिगात शेणाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ३० ते ४० दिवसांत या ढिगातील शेणखताचे कंपोस्ट शेतात वापरण्यास तयार होते.
काळजी ः शेणखताचा ढीग चांगला ओला करून नंतर कल्चर द्रावण सोडावे. ढीग तयार करताना तसेच लिंपल्यानंतर कधीही ढिगावर चढू नये. त्यामुळे ढीग दबून आतील प्राणवायू कमी होऊन कुजण्याची प्रक्रिया योग्य होत नाही.
ढीग लिंपल्यानंतर त्यावर नवीन शेणखत टाकू नये. ढिगास भेगा पडल्यास किंवा फुटल्यास तेवढा भाग पुन्हा शेणकाल्याने लिंपून घ्यावा.
ढीग ओला करताना पाणी ढिगाबाहेर वाहून जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तयार झालेले बायोडायनॅमिक कंपोस्ट लगेच पिकास वापरावे किंवा सावलीत साठवून ओलावा टिकवून ठेवावा.
फायदे
एक ते दीड महिन्यात बायोडायनॅमिक कंपोस्ट तयार होते. वर्षभर थांबण्याची गरज नाही.प्रत्येक हंगामातील पिकासाठी खत उपलब्ध होते. बायोडायनॅमिक कंपोस्टमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बचे प्रमाण वाढवण्यास मदत होते.
कच्च्या शेणखतात असलेले अर्धा टक्क्यापर्यंतचे अन्नघटकांचे प्रमाण दुप्पट-तिप्पटीने वाढते.अत्यंत कमी खर्च, कमी वेळ व सहज पद्धतीने कोणीही कंपोस्ट तयार करू शकतो.
शेणखताचा ढीग लावल्यानंतर दररोज पाणी शिंपडणे, सावली करणे अशा विशेष देखभालीची गरज नाही.गावातील शेणखत ढिगांचे या पद्धतीने बायोडायनॅमिक कंपोस्ट केल्यास गावात आपोआप स्वच्छता होते, त्यामुळे दुर्गंधी, रोगराईस आळा बसतो. परिसर स्वच्छ दिसतो.
वरील आकाराच्या ढिगामधून एक टन खत मिळते. यामधून १० ते १५ किलो नत्र, स्फुरद आणि १० किलो पालाश मिळते. एकरी दोन पोते रासायनिक खत वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक ढीग बायोडायनॅमिक कंपोस्ट पुरेसे होते.नत्र, स्फुरद आणि पालाशच्या उपलब्धतेसाठी रासायनिक खते देताना एकरी १० ते १५ बैलगाड्या शेणखत देण्याची शिफारस केलेली असते; परंतु शेणखतापासून बायोडायनॅमिक कंपोस्ट तयार केल्यास त्यामधून नत्र, स्फुरद आणि पालाश सोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि उपयुक्त जीवाणू शेतात मिसळले जातात. त्याचा पीकवाढीस फायदा होतो.
Share your comments