1. कृषीपीडिया

असा करा शेतीमधील पाणी वापर

पाणी वाचवण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याच्या प्रमाणावरून पिकांची निवड करणेही आवश्यक आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
असा करा शेतीमधील पाणी वापर

असा करा शेतीमधील पाणी वापर

१.जमिनीची मशागत

जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी असेल तर पाण्याच्या ताणामुळे त्या लवकर भेगाळतात. जमिनी भेगाळल्या की, त्यात खोलवर असलेले पाणीही वाफ होऊन उडून जाते आणि पिकांना दिलेले पाणी भेगांत शिरून खोलवर जाऊन बसते. असे पाणी पिकांच्या उपयोगी पडत नाही. भेगा पडलेल्या जमिनीवर कोळपणी, निंदणी करून मशागत केली आणि जमीन झाकण्यासाठी सेंद्रिय आच्छादनाचा वापर केला तर भेगा बुजल्या जाऊन सिंचनाची कार्यक्षमता वाढते आणि पाण्याची बचत होते. सेंद्रिय आच्छादनासाठी खुरपलेले गवत, तण, उसाचे पाचट, धान्य मळणी केल्यानंतर उरलेला भुसा, झाडांचा पालापाचोळा इत्यादी शेतकचर्‍याचा वापर करता येतो.

 

२.पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिके निवडा

पाणी वाचवण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याच्या प्रमाणावरून पिकांची निवड करणेही आवश्यक आहे. उदा. मक्याच्या पिकाला एकरी ५.५ लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते तर त्याच्या निम्म्या पाण्यात सूर्यफुलाचे पीक येऊ शकते. आपल्याकडे घेतली जाणारी ऊस, केळी अशांसारखी पिकेही प्रचंड प्रमाणात पाण्याची मागणी करतात. पाण्याची बचत करायची असेल तर अशा जास्त पाणी लागणार्‍या पिकांपेक्षा कमी पाणी लागणारी पिके लावणे आणि त्यांचीही दुष्काळी परिस्थितीत तग धरून ठेवणारी वाणे वापरणे हाच उपाय शिल्लक राहतो. अशा वाणांवर काम करण्यास अनेक बिजोत्पादन कंपन्यांनी सुरुवात केली आहे. 

३.मोकळे पाणी देण्याच्या पद्धतीत सुधारणा

बर्‍याच शेतकर्‍यांनी अजूनही सिंचनाच्या आधुनिक सुविधा स्वीकारल्या नसल्याने पिकांना मोकाट पाणी देण्याची पद्धत सर्रास अवलंबली जाते. जमीन हलकी असेल तर पिकांना सारख्या पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. अशा वेळेस मुख्य पाईपला एक बायपास काढून त्यात व्हॉल्वद्वारे थोड्या-थोड्या वेळाने पाणी सोडले की, मुख्य धारेत अडथळे येऊन पाणी मोठ्या पृष्ठभागावर एकसारखे लवकर पसरण्यास मदत होते. 

या पद्धतीने पाण्याने माती वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. तसेच जमिनीत कमी पाणी मुरून पाण्याची बचत होते. सध्या उभ्या गव्हाच्या आणि हरभर्‍याच्या पिकांना ही पद्धत अमलात आणता येईल. भाजीपाल्याच्या पिकांसाठी सरी-वरंबा पद्धत वापरली असेल तर सुरुवातीच्या एक-दोन पाण्यानंतर नंतरचे पाणी फक्त एक आड एक सरीत जरी सोडले तरी पुरेसे होते.

 

४.पाण्याचे बाष्पीभवन कमी करणे

शेततळ्यातील पाण्याची उष्णतेने वाफ होऊन पाणी कमी होते. पाण्याच्या पृष्ठभागावर पसरणारी काही रसायने बाजारात उपलब्ध आहेत. अशा रसायनांचा तवंग पाण्यावर साठलेला राहून पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यास मदत करतो. अशा प्रकारची साधने वापरताना पाण्याचा दर्जा खालावणार नाही आणि सिंचन प्रणालीत अडथळे येणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. शेततळ्यावर पन्नास टक्के ते नव्वद टक्के क्षमतेची शेडनेट एक ते दीड मीटर उंचीवर आच्छादूनही पाण्याचे बाष्पीभवन बर्‍याच प्रमाणात रोखता येते. अशा प्रकारे सावली केल्याने शेततळ्यात शेवाळ्याची वाढही होत नाही.

 

५.तुषार सिंचन पद्धतीचा वापर

तुषार सिंचनाचा संच उपलब्ध असल्यास हरभरा, गहू, कांदा, लसूण अशा पिकांसाठी त्याचा जरूर वापर करावा. यामुळे सिंचनाची कार्यक्षमता वाढून पाण्याची बचतही होते. फळझाडांसाठी छोटी स्प्रिंकलर्स वापरल्यास ठिबकपेक्षा जास्त जमीन भिजू शकते.

६.ठिबक सिंचनाचा वापर

पाण्याची बचत करणारी आणि सिंचनाची कार्यक्षमता वाढवणारी सर्वात चांगली सिंचनप्रणाली कोणती असे विचारले तर ठिबक सिंचन प्रणालीचाच उल्लेख करावा लागेल; पण पाईपलाईनमधील गळती, फिल्टरमध्ये अडकलेला कचरा, गरजेपेक्षा जास्त दाब आणि पाणी देण्याचे अनियंत्रित वेळापत्रक यांमुळे अशी चांगली प्रणाली उपलब्ध असूनही पाण्याची नासाडी होण्याची शक्यता असते. 

 

७.जमिनीवर आच्छादनाचा वापर

उपलब्ध पाण्याची बचत करण्यासाठी शेतजमिनीवर आच्छादनाचा वापर करणे हा एक सोपा उपाय आहे. उघड्या जमिनीवर पिकांना दिलेले पाणी काही प्रमाणात जमिनीत मुरते आणि काही प्रमाणात उष्णतेने वाफ होऊन वातावरणात उडून जाते. जमीन हलकी असेल तर या दोन्ही घटनांच्या शक्यता जास्त असतात. अशा परिस्थितीत पीक लवकर ताणावर येऊन उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. या गोष्टीवर मात करण्यासाठी पाण्याच्या पाळ्या वाढवाव्या लागतात आणि त्यासाठी जास्त पाण्याची गरज भासते. 

 

८.पाण्याचे पुनर्भरण

‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ अशासारख्या मोहिमा काही वर्षांपासून आपल्याकडे चालू झाल्याने भूजलाचे पुनर्भरण म्हणजे काय, याची थोडीफार कल्पना शेतकर्‍यांनाही आता येऊ लागली आहे. ज्या ठिकाणी नद्या, धरणे, तळी असे जलसाठे नाहीत अशा ठिकाणी विहिरीतून किंवा बोअरमधून मिळणार्‍या भूजलावरच पिकांचे सिंचन अवलंबून असते. 

अशा भूजल साठ्यांमधून सतत उपसा केला गेल्यास जमिनीतील पाण्याची पातळी खाली-खाली जाते आणि परिसरातील पाणथळ जागा किंवा नद्याही आटू लागतात. सद्यःस्थितीत सगळीकडे ही परिस्थिती आपण अनुभवतो आहोत.

 

९.पाण्याचा पुनर्वापर

शेतीसाठी किंवा इतर कामांसाठी वापरलेल्या पाण्याचा शेतीसाठीचा पुनर्वापर हा पाण्यासारख्या किमती आणि दुर्मिळ होत चाललेल्या संसाधनाच्या बचतीचा शाश्‍वत पर्याय आहे. वनशेती किंवा जैवइंधनाच्या पिकांची शेती यासाठी तर हा पर्यायच वापरला गेला पाहिजे, असा विचार आता पुढे येतो आहे, तर खाद्य पिकांच्या उपयोगासाठी, मानवी आरोग्याचा विचार करता हा पर्याय वापरावा की नाही, याबद्दल साशंकता आहे. डेन्मार्कच्या ‘ग्रून्डफॉस बायोबूस्टर’सारख्या कंपन्यांनी केलेल्या संशोधनांवरून आणि निर्माण केलेल्या साधनांवरून मानवी सांडपाणीही थोड्या प्रक्रिया करून भाजीपाल्यासारखी पिके घेण्याच्या योग्यतेचे करून दाखवले आहे. अशा प्रकारच्या शक्यतांवर जास्त संशोधन झाल्यास आपल्याकडील विशेषतः मोठ्या शहरांच्या आसपासच्या शेतकर्‍यांची पाणी समस्या कायमची मिटण्यास हातभारच लागेल. हरितगृहांतही ‘मातीशिवाय शेती’ची कल्पना अमलात आणल्यास वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर सहजतेने करता येतो आणि या प्रकारच्या प्रणाली बर्‍याच ठिकाणी सर्रास वापरल्या जातात. या पद्धतीत पाण्याची आणि खतांची बचत असा दुहेरी फायदा असतो.

English Summary: Do also farming water use Published on: 22 January 2022, 10:53 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters