1. कृषीपीडिया

टोमॅटोवर येणाऱ्या रोगांवरील नियंत्रण

सध्या राज्यामध्ये सातत्याने ढगाळ वातावरण, अधूनमधून येणारा पाऊस यामुळे टोमॅटो पिकामध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. होणाऱ्या रोगांवविषयी आपण या लेखात माहिती घेणार आहोत.

KJ Staff
KJ Staff


सध्या राज्यामध्ये सातत्याने ढगाळ वातावरण, अधूनमधून येणारा पाऊस यामुळे टोमॅटो पिकामध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. होणाऱ्या रोगांवविषयी आपण या लेखात माहिती घेणार आहोत.

      करपा -

  • लवकर येणारा करपा (अर्ली ब्लाइट) :-

रोगाची लक्षणे :-

  •    हा रोग अल्टरनेरीया सोलॅनी नावाच्या बुरशीमुळे होतो.
  • सुरुवातीला जमिनीलगतच्या पानांवर लहान गोलाकार ते आकारहीन, तपकिरी ते काळपट रंगाचे वलयांकित ठिपके झाडाच्या पानांवरती दिसतात.
  • प्रादुर्भाव वाढून ठिपके एकमेकात मिसळून मोठ्या आकाराचे तपकिरी चट्टे पानावर तयार होतात. यामुळे पाने करपून गळतात.
  • पानाप्रमाणे खोडावर गर्द तपकिरी वलयांकित डाग पडतात. त्यामुळे फांद्या कमकुवत होऊन मोडतात.
  • उशिरा येणारा करपा (लेट ब्लाइट) :-

रोगाची लक्षणे :-

  • हा रोग फायटोप्थोरा इन्फेस्टन्स नावाच्या बुरशीमुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव पाने, खोड, फांद्या आणि हिरव्या, लाल फळांवर आढळून येतो.
  • सुरुवातीला पानावर काळपट ते फिक्कट तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके दिसून येतात.
  • ढगाळ हवामानात रोगाचा प्रादुर्भाव वाढून खोड, पाने आणि फळांवर पसरून पाने करपून गळतात. दोन्ही करपा रोग बियाणे व जमिनीतील बुरशीमुळे होतात.
  • झाडाचे रोगग्रस्त अवशेष, हवा, पाणी व कीटकांमार्फत या रोगाचा प्रसार होतो.

करपा रोगाचे नियंत्रण :-

  • पिकाची फेरपालट करावी.
  • पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया - बाविस्टीन २.५ ग्रॅम किंवा बाविस्टीन १ ग्रॅम अधिक कॅप्टन २ ग्रॅम ही बुरशीनाशके प्रति किलो बियाणांस बीजप्रक्रिया करावी.
  • झाडावरील तसेच जमिनीवर पडलेले रोगग्रस्त फळे, पाने गोळा करून जमिनीत गाडावित अथवा जाळून नष्ट करावीत.
  • रोगाची लक्षणे दिसताच किंवा टेब्युकोनॅझोल ५ ते १० मि.ली. किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरजेनुसार पुढील फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.
  • उशिरा येणारा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात अथवा अझोक्सीस्ट्रोबीन २० मिली प्रती २० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

 


टोमॅटोवरील मर रोग-

  • रोगाची लक्षणे :-

  फ्युजरीयम मर- 

  • जमिनीतील फ्युजॅरीयम ऑक्झिस्पोरम लायकोपरसिकी बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळसर होऊन झाड मरते.
  • या रोगामुळे नवीन झाड अचानक कोलमडलेले दिसते. रोगामुळे मुळाच्या आणि खोडाच्या आतील पेशी कुजतात, झाडांची वाढ खुंटते व झाड मरते.
  • ढगाळ किंवा अधिक आर्द्रतापूर्व हवामानामध्ये मर रोगग्रस्त झाडांच्या खोडावर बुरशीचा गुलाबी थर दिसतो. अशा रोगग्रस्त झाडांचे खोड चाकूने उभे कापून निरीक्षण केल्यास आतील गाभा तपकिरी रंगाचा दिसतो.

लागवड पूर्व उपाययोजना :-

  1. जमीन मध्यम प्रतीची, उत्तम निचरा होणारी असावी.
  2. पिकाची फेरपालट करावी.
  3. रोपवाटिकेत बियाणे पेरण्यापूर्वी बीजप्रक्रिया करावी.
  4. लागवडीपूर्वी जमिनीत हेक्टरी पाच किलो ट्रायकोडर्मा पावडर शेणखतात मिसळून टाकावी.

सद्यस्थितीतील उपाययोजना :-

  1. अवकाळी पावसाचे अथवा सिंचनाच्या साठलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने चर काढून निचरा करावा.
  2. रोगाची लक्षणे दिसताच जमिनीत वाफसा आल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्रॅम किंवा कॅप्टन ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून प्रति झाड ५० ते १०० मिली द्रावण गोलाकार आळे करून बुंध्याशी ओतावे.

विषाणुजन्य (व्हायरस) रोग :-

टोमॅटो पिकात साधारणपणे १५- २० वेगवेगळे विषाणुजन्य रोग येतात.  परंतु महाराष्ट्रात प्रामुख्याने टोमॅटोवरील ग्राऊंडनट बड नेक्रॉसीस व्हायरस (जीबीएनव्ही) टॉस्पोव्हायरस), पर्णगुच्छ व मोबॅक हे प्रमुख विषाणूजन्य रोग मोठ्या प्रमाणात आढळतात.

 


स्पोव्हायरस

         रोगाची लक्षणे  :-

  • या रोगाची सुरवात प्रथम शेंड्याकडून होते.
  • शेंड्याकडील नवीन पानांवर प्रथम लहान, तांबूस- काळसर ठिपके/ चट्टे दिसतात.
  • रोगाचे प्रमाण वाढून तीन-चार दिवसांत कोवळी पाने करपून काळी पडतात. हा रोग पाने, देठ, कोवळ्या फांद्या आणि खोडापर्यंत पसरत जाऊन तांबूस- काळपट चट्टे पडतात. शेवटी झाड करपते व मरते.
  • या रोगाचा प्रादुर्भाव फळांवर पिवळसर लाल डाग तसेच गोलाकार एकात एक वलये दिसून येतात. तसेच रोगाचा प्रसार फुलकिडे (थ्रिप्स) या किडीमार्फत होतो.

          ब) पर्णगुच्छ :-

          रोगाची लक्षणे  :-

या विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव टोबॅको लीफकर्ल व्हायरसमुळे या व प्रसार पांढरी माशीमुळे होतो.

  • पाने बारीक, वाकडी-तिकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखी दिसतात. पानांचा रंग फिक्कट हिरवा-पिवळसर होतो. यामुळे झाडाची वाढ खुंटते.
  • आलेली फळे आकाराने लहान राहतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढीच्या सुरवातीला झाल्यास फलधारणा होत नाही.

टोमॅटोवरील मोझाक रोग  :-

  • रोगाची लक्षणे :-

  • टोबॅको मोझाक व्हायरस, कुकुंमबर मोझाक व्हायरस, पोटॅटो मोझाक व्हायरस या विषाणूमुळे टोमॅटोवर मोझाक रोग आढळून येतो.
  • या रोगामुळे पाने फिक्कट हिरवी होतात. ती बारीक राहून त्यामध्ये हिरवट पिवळसर डाग दिसतात. झाडाची वाढ खुंटते, फुले-फळे फार कमी प्रमाणात लागतात.
  • हा रोग संसर्गजन्य आहे. त्यामुळे टोमॅटोची लागवड करतांना तसेच आंतरमशागतीची कामे करतेवेळी, स्पर्शाने आणि मावा या किडी मार्फत रोगाचा प्रसार अतिशय वेगाने होतो.

रोग नियंत्रण :-

  1. रोगप्रतिकारक जातीची लागवड करावी.
  2. बियाण्याची पेरणी झाल्यानंतर ६०-१०० मेश नायलॉन नेट किंवा पांढरे पातळ मलमल कापड २ मीटर उंचीपर्यंत मच्छरदाणीसारखे गादीवाफ्यास लावावे. यामुळे रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींना रोखणे शक्य होईल.
  3. लागवडीपूर्वी २५-३० दिवस अगोदर टोमॅटो शेताभोवती सर्व बाजूने ५-६ ओळी मका पेरावा. पांढऱ्या माशीचे प्रमाण रोखण्यास मदत होते.
  4. रोपे लागवडीपूर्वी इमिडाक्लोप्रिड १० मिली किंवा कार्बोसल्फान २० मिली प्रति १०  लिटरपाण्यात मिसळून या द्रावणात रोपांची मुळे १०-१५ मिनिटे बुडवून लागवड करावी.
  5. लागवडीच्या वेळेस वाफ्यावर आच्छादनासाठी पांढरा, पिवळा, काळा किंवा निळ्या रंगाच्याप्लॅस्टिक पेपरचा वापर करावा. पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते.
  6. विषाणूजन्य रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. पीक तणविरहित स्वच्छ ठेवावे.

 


लेखक :-

प्रा. हरिष अ. फरकाडे

सहायक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र विभाग)

श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविध्यालय, अमरावती

मो. नं.- ८९२८३६३६३८ 

इ.मेल. ahriharish27@gmail.com

प्रा. राधिका ग. देशमुख

सहायक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र विभाग)

स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव जामोद.

इ. मेल. radhikadeshmukh1994@gmail.com

English Summary: Disease control of tomatoes, how to manage Published on: 26 September 2020, 03:58 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters