मर रोग किंवा रोप कोलमडणे (Damping off)
बुरशी : स्क्लेरोशियम रॉलफ्सी (Sclerotium rolfsii)
बी पेरल्यानंतर रोप उगवून येते रोप वाढत असतानाच या बुरशीचे दाणे रोपांच्या जमिनीलगतच्या भागातून शिरकाव करतात. या रोगामुळे रोपाचे १० ते ९०% पर्यंत नुकसान होते. लागवडीनंतर हा रोग कांद्याच्या शेतातदेखील मोठ्या प्रमाणात पसरतो.
लक्षणे
रोपे पिवळी पडतात.
जमिनीलगतच्या रोपांचा भाग मऊ पडतो आणि रोपे कोलमडतात व नंतर सुकतात.
कोलमडलेल्या रोपांच्या जमिनील तच्या भागांवर पांढरी बुरशी वाढते त्यावर बारीक पांढरे दाणे तयार होतात. थोड्याच दिवसांत हे मोहरीच्या दाण्याच्या आकाराचे बनतात.
हे दाणे जमिनीत सुप्तावस्थेत अनेक वर्षे राहतात. पुढच्यावर्षी कांद्याची रोपवाटिका त्याच भागात केली तर मर रोगाची आणखी जोरात प्रादुर्भाव होतो.
रोगास प्रतिकूल स्थिती/वातावरण
खरीप हंगामातील हवामान या रोगास अत्यंत उपयुक्त ठरते.
अधिक आद्रता व २४-३०० सें. तापमान या रोगाच्या बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरते.
रोपवाटिकेच्या वाफ्यातून पाण्याचा निचरा लवकर चांगल्या प्रमाणात झाला नाही तर रोगाची तीव्रता वाढते.
उपाय
पेरणीपूर्वी बियांना डायथायोकार्बामेट किवा कार्बोक्सीन हे औषध २-३ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात चोळावे.
रोपे नेहमी गादीवाफ्यावर तयार करावीत कारण गादीवाफ्यावर पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो.
रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी.
एवढे करून रोगाचा प्रादुर्भाव दिसलाच तर दोन रोपांच्या ओळीत कॅप्टन किवा कार्बोक्सीनचे द्रावण ओतावे. २० ग्रॅम औषध १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.
काळा करपा (-Nthracnose)
महाराष्ट्रात खरीप हंगामात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. बुरशी : कोलिटोट्रायकम ग्लेओस्पोराईडस (Colletotrichum Gloeosporoides)
लक्षणे - सुरुवातीला पानाच्या बाहेरील बाजूवर व बुडख्याजवळील भागावर राखाडी रंगाचे ठिपके दिसतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उबदार ठिपके वाढू लागतात.
ठिपक्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पाने वाळतात.
एकापाठोपाठ पाने वाळत गेल्यामुळे कांद्याची वाढ होत नाही.
पानावरील चट्टे जवळून बघितल्यास काळ्या ठिपक्याचा मधला भाग पांढर्या रंगाचा असून त्याभोवती गोलाकार काळे पट्टे असल्याचे दिसते.
हा रोग खरिपात रोपवाटिकेतील रोपावरदेखील येतो त्यामुळे रोपांची पाने काळी पडून वाळतात नंतर रोप मरतात.
रोगास प्रतिकूल स्थिती/वातावरण
खरिपातील दमट आणि उबदार हवामानात या रोगाच्या बुरशीची वाढ झपाट्याने होतेया रोगाची बुरशी पावसाच्या थेंबामार्फत एका झाडावरून दुसर्या झाडावर पसरते तसेच रोपवाटिकेमधून हा रोग मुख्य शेतात पसरतो.पाण्याचा निचरा न होणे, ढगाळ वातावरण, सतत झिमझिम पडणारा पाऊस यामुळे रोगाचे प्रमाण वाढते व माना लांब होतात, कांदा काही प्रमाणात तयार झाल्यानंतर रोगाचे प्रमाण वाढले तर पाने वाळतात कांदा पोसत नाही.
पांढरीसड (White Rot)
या रोगामुळे कांद्याचे 50 ते 60 टक्के नुकसान होते.
बुरशी : स्केलेरोशियम रॉल्फसी (Sclerotium rolfsii)
लक्षणे
ही बुरशी पुनर्लागण केलेल्या रोपाच्या मुळावर वाढते._रोपाची किवा झाडाची पाने जमिनीलगत सडतात पानांचा वरचा भाग पिवळा पडतो.जुनी पाने रोगास प्रथम बळी पडतात.रोगाच्या तीव्रतेमुळे पाने जमिनीवर कोलमडतात.मुळे सडल्यामुळे कांद्याचे झाड सहज उपटुन येते.वाढणार्या कांद्याला मुळे राहत नाहीत.कांद्यावर कापसासारखी पांढरी बुरशी वाढते त्यावर पांढरे दाणे तयार होतात व कांदा सडतो.पांढर्या सडीचा प्रादुर्भाव पुनर्लागवडीनंतर लगेच झाला तर कांदा पोसत नाही.कांद्याच्या वाढीनंतर रोगाचा प्रादुर्भाव झाला तर काढणीनंतर कांदा साठवणीत हळूहळू सडतो.
रोगास प्रतिकूल स्थिती/वातावरण
खरीप तसेच रब्बी हंगामातही या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.पाण्याचा निचरा चांगल्या न होणार्या शेतात या रोगाची तीव्रता अधिक असते.या रोगाची बुरशी जमिनीत बरीच वर्ष राहू शकते.
उपाय
मर रोग होऊ नये म्हणून जे उपाय केले जातात त्यामुळे हा रोग टाळता येतो.एकाच शेतात वर्षानुवर्षे कांद्याची लागवड करू नये.कांद्याची तृणधान्यासोबत फेरपालट करावी.खरिपातील लागवड नेहमी पाण्याचा चांगला निचरा होणार्या जमिनीत करावी.उन्हाळ्यात खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी.
रोपाची मुळे लागवडीपूर्वी कार्बेन्डाझीम द्रावणात १ ते २ मिनिटे बुडवून घ्यावीत. त्यासाठी २० ग्रॅम कार्बेन्डाझीम १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.
मुळकुज (Fusarium basal rot)
बुरशी : फ्युजॅरियम ऑक्सीस्पोरम (Fusarium oxysporum f.sp. cepae)
लक्षणे
या रोगामुळे कांद्याची पाने पिवळी पडतात पिवळेपणा बुडख्याकडे वाढत जातो नंतर पाने सुकून कुजतात_
लागण झालेल्या झाडाची मुळे कुजतात व रोगाटलेले झाड सहज उपटून येते.
मुळे काळसर तपकिरी रंगाची होतात व झडून बारीक होतात.
रोगाच्या सुरुवातीच्या काळात रोगाची लागण झालेला कांदा आणि चांगला कांदा यात विशेष फरक जाणवत नाही.
पाने पिवळी झालेल्या झाडाचा कांदा उभा कापला तर आतील भाग तपकिरी झालेला दिसतो. मुळाजवळ भाग कुजतो.
रोगाची लागण झालेले कांदे साठवणीत बुडख्याकडून सडतात.
रोगास अनुकूल स्थिती/वातावरण
अधिक तापमान, अधिक आर्द्रता, पाण्याचा निचरा न होणे इत्यादी कारणांमुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
महाराष्ट्रात खरीप हंगामात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात या रोगाची तीव्रता सर्वाधिक असते.
उपाय
या रोगाची बुरशी जमिनीत राहते. त्यामुळे पिकाची फेरपालट करणे महत्त्वाचे ठरते.
जमिनीची खोल नांगरट करुन उन्हाळ्यात तापू द्यावी.
थायरम हे बुरशीनाशक चोळून बी पेरणे (१ किलो बियांसाठी २ ग्रॅम थायरम हे प्रमाण वापरावे)
जांभळा करपा (Purple blotch)
जगातील सर्व देशांत जेथे कांदा होतो तेथे या रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते हा रोग पिकांच्या कोणत्याही अवस्थेत येतो. या रोगामुळे पिकाचे ५० ते ७० टक्के नुकसान होते.
बुरशी :अल्टरनेरिया पोराय (-lternaria porri)
लक्षणे
पानावर सुरुवातीस खोलगट लांबट पांढुरके चट्टे पडतात._
चट्टयाचा मधला भाग सुरुवातीस जांभळट नंतर काळपट होतो असे अनेक चट्टे पाने किंवा फुलांच्या दांड्यावर पडतात.
अनेक चट्टे एकमेकात मिसळून पाने करपतात व नंतर वाळतात.
झाडाच्या माना मऊ पडतात (फुलांचे दांडे मऊ पडल्याने वाकतात किंवा मोडून पडतात)
रोगास प्रतिकूल स्थिती/वातावरण
जांभळ्या करप्याचे प्रमाण खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात असते रोपवाटिका तसेच पुनर्लागण झालेल्या पिकावर आणि बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांदा पिकावरदेखील प्रादुर्भाव होतो.
१८ ते २०० सें. तापमान व ८० टक्के आर्द्रता या रोगाच्या बुरशीवाढीस पोषक असते.
रब्बी हंगामात जाने-फेब्रुवारी महिन्यात पाऊस झाला किंवा ढगाळ वातावरण असेल तर या रोगाची तीव्रता अधिक होते
रांगड्या हंगामातील कांद्यावरदेखील या रोगाचा बराच प्रादुर्भाव होतो.
उपाय
मॅन्कोझेब (0.3%) ३० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम (0.2%) २० ग्रॅम औषध १० लिटर पाण्यात मिसळून दर १२ ते १५ दिवसांच्या अंतराने फवारावे.
थायरमसोबत बीजप्रक्रिया करावी.
फवारणीसोबत चिकट द्रवाचा वापर करावा.
नत्रयुक्त खताचा जास्त आणि उशिरा वापर करू नये.
पिकांची फेरपालट करावी.
करपा (Stem phylium blight)
बुरशी : स्टेम्फीलीयम व्हॅसिकॅरियम (Stemphyliumvesicarium)
लक्षणे
या रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावर तसेच बियाण्यांच्या पिकावर मोठ्या प्रमाणात होतो.
पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पानाच्या बाहेरील भागावर दिसू लागतात. चट्ट्याचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात.
फुलांच्या दांड्यावर हा रोग असल्यास फुलांचे दांडे मऊ होतात व त्याजागी वाकून मोडतात.
रोगास प्रतिकूल स्थिती/वातावरण
या रोगाचा प्रसार प्रामुख्याने रब्बी हंगामात होतो.
१५ ते २०० सें. तापमान व ८० ते ९० टक्के आर्द्रता यामुळे बुरशीची वाढ झपाट्याने होते.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात पाऊस झाला किंवा ढगाळ वातावरण राहिले तर रोगाचा प्रसार जोरात होतो.
कांद्यावरील तपकिरी करपा (Stemphylium blight)
उपाय
वातावरण उपयुक्त ठरत असल्यामुळे बुरशीनाशके प्रभावीपणे काम करु शकत नाहीत. तरीही पिकाची फेरपालट, बीजप्रक्रिया, रोपे लावताना कार्बेन्डाझीमच्या द्रावणाचा वापर इ. बाबींमुळे रोगाची तीव्रता कमी करता येते.
दर १२ ते १५ दिवसांच्या अंतराने 0.2% कार्बेन्डाझीमची फवारणी करावी फवारणीमध्ये चिकट द्रवाचा वापर अवश्य करावा. तसेच एका शिवारात सर्व शेतकर्यांनी फवारणी एका ठराविक काळात केली तर रोगाचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते.
लेखक- प्रवीण सरवदे, कराड
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments