कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी नैसर्गिक परागीभवन करणाऱ्या सजीवांचे संरक्षण, मधमाश्यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही गोष्टींचे काटेकोर व्यवस्थापन करणेही गरजेचे राहील.
डॉ. मिलिंद जोशी
मधमाश्यांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळेच आज आपण पृथ्वीतलावरील विविध वनस्पतींच्या जैविक विविधतेचे हिरवेपण अनुभवू शकतो. एकूण पिकांपैकी पाच टक्के पिकांमध्ये स्वपरागीभवन घडून येते. तर 85 टक्के पिकांत परपरागीभवन दिसून येते.
मेक ग्रेगोर नामक प्रसिद्ध परागीभवनतज्ज्ञाच्या मते मनुष्याच्या आहारातील एक-तृतीयांश भाग सरळ किंवा अनपेक्षितपणे मधमाशी व अन्य कीटकांद्वारे परागीभवन झालेल्या पिकांद्वारे मिळतो. जगात मधमाशी व अन्य कीटकांद्वारे होणाऱ्या परागीभवनाचे आर्थिक मूल्य वार्षिक 60 ते 70 अब्ज अमेरिकी डॉलर आहे. आपल्या देशातही सुमारे सात टक्के पिकांमध्ये कीटकांद्वारे परागीभवन होते. आपला कृषी विकासदर वाढविणे गरजेचे असल्याने परागीभवन करणाऱ्या सजीवांचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही.
मधमाश्यांच्या संख्येत होतेय घट
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतात कमी होत चाललेल्या परागीभवन करणाऱ्या सजीवांच्या वस्तीमुळे विविध पिकांमध्ये 0.5 ते 80 टक्के (एकूण सरासरी 26 टक्के) एवढी उत्पादनात घट दिसून आली आहे. रसायनांचा अनियंत्रित वापर, अनेक वर्षे एकाच भागात एकच पीक घेणे, जंगलांचे घटते प्रमाण अशा विविध कारणांमुळे नैसर्गिक अन्न व निवास यांचा नाश झाल्याने मधमाश्यांची संख्या कमी होत आहे. मध गोळा करण्यासाठी काही व्यक्तींकडून अयोग्यरीत्या धूर करण्याच्या पद्धतीमुळेही त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे.
भारतात मधमाश्यांच्या आढळणाऱ्या प्रमुख प्रजाती-
1) रॉक बी (Apis Dorsata) - आग्या
2) लहान मधमाशी (Apis Florea) - फुलोरी
3) भारतीय मधमाशी (Apis Cerana Indica) - सातेरी
4) युरोपियन/इटालियन बी (Apis Mellifera) - मेलीफेरा
5) ट्रायगुना (Apis Triguna) - पोळ्याचा मोहोळ
पहिल्या दोन प्रजाती आपण मधपेटीत वाढवू शकत नाही. परंतु सातेरी व मेलीफेरा प्रजाती हव्या तेथे, हव्या त्या प्रमाणात व कोणत्याही ऋतूमध्ये वाढवू शकतो. याचे कारण म्हणजे...
- मधमाशीद्वारे परागीभवन होणारी पिके
1) फळझाडे व भाजीपाला - लिंबू, संत्रा, मोसंबी, बदाम, सफरचंद, चेरी, अक्रोड, द्राक्ष, आंबा, डाळिंब, नारळ, आवळा, पपई, स्ट्रॉबेरी, टरबूज, भेंडी, वांगी, टोमॅटो, कारली, पडवळ, भोपळा, काकडी आदी.
2) कडधान्ये व तेलवर्गीय पिके - कापूस, राई, सूर्यफूल, चवळी, मटकी, उडीद, तूर, मूग, वाल, घेवडा आदी.
3) बीजोत्पादनासाठी - कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर, मुळा, कांदा, मेथी, गाजर, लवंग आदी.
4) तृणधान्य पिके - ज्वारी, बाजरी व मका.
मधमाशीद्वारे होणारे परागीभवन टिकविण्यासाठी काळजी -
-प्रति हेक्टर विस्तारात मधपेट्यांची किती संख्या असावी हे त्या पेटीतील मधमाश्यांची संख्या, अन्य परागीभवन करणाऱ्या कीटकांची संख्या, पिकाचे क्षेत्र, शेजारील शेतातील पीक आदी घटकांवर अवलंबून असते.
- मधपेट्या पिकाच्या 20 टक्के फुलावस्थेत शेतात ठेवाव्यात.
- मधमाश्या सुमारे 11.3 कि.मी.पर्यंत दूर जाऊ शकतात; परंतु परागीभवनासाठी अर्धा कि.मी. अंतर असावे.
- पेटी सायंकाळच्या वेळी शेतात ठेवावी. पेट्या जवळ जवळ न ठेवता विरुद्ध दिशेला ठेवाव्यात. पेटीच्या वर विविध रंगीत फलक (बोर्ड) लावावेत. जेणेकरून मधमाशी पेटी ओळखू शकेल.
- शेतात फूल येण्यापूर्वी कीड-रोगनियंत्रण करूनच पेट्या ठेवाव्यात.
विषबाधा कमी करण्याचे उपाय -
1) बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात कीटकनाशकांचा वापर टाळता येतो. 2) एकात्मिक रोग-कीडनियंत्रण पद्धतींचा अवलंब करावा. जैविक नियंत्रणाला अधिक महत्त्व द्यावे.
3) मधमाश्यांना घातक रासायनिक कीडनाशके फवारण्यापूर्वी संबंधित मधमाशीपालक किंवा शेतकऱ्याला कळवावे. जेणेकरून ते मधपेटी दुसरीकडे हलवू शकतील किंवा योग्य काळजी घेतील.
4) फुलोरा अवस्थेतील पिकांवर मधमाशीला घातक कीडनाशकांची फवारणी शक्यतो टाळावी.
5) फवारणीवेळी रसायन जमीन, गवत किंवा जवळच्या शेतातील पिकांवर उडून जाणार नाही याची काळजी घ्यावी.
6) भुकटी रूप कीडनाशके फवारणीच्या कीडनाशकांपेक्षा जास्त नुकसानकारक असतात. दाणेदार कीडनाशके मधमाशीला कमी नुकसान करतात.
7) कीडनाशकांची फवारणी शक्यतो मधमाशीच्या भ्रमणकाळाव्यतिरिक्त म्हणजे सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी.
8) फवारणीनंतर तापमान कमी राहण्याची शक्यता असल्यास अशा वेळी कीटकनाशकांची फवारणी टाळावी. अशा वेळी कीटकनाशकांचे अवशेष जास्त काळ टिकून राहतात व मधमाशीची क्रिया मंदावते.
Share your comments