खरीप हंगामासाठी आपत्कालीन पीक व्यवस्थापन

13 July 2018 11:24 AM


यावर्षी खरीप हंगाम २०१८ मध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सुरूवातीला काही भागामध्ये चांगला पाऊस झाला परंतु काही भागामध्ये अजिबात पाऊस झालेला नाही. दिनांक ६ जुलैपर्यंत वाळवा, शिराळा, तासगाव पूर्व भाग आणि मिरज तालुक्यामध्ये चांगला पाऊस झाला असून ८० ते ९० टक्के पेरण्या झाल्या आहेत. इतर तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्के पाऊस कमी आहे. आटपाडी, खानापूर, जत आणि तासगाव (पश्चिम भाग) तालुक्यामध्ये सरासरीच्या फक्त २५ टक्के पाऊस झाला आहे. सद्यस्थितीत शेतकरी बंधूनी अद्याप पेरणी न झालेल्या क्षेत्रामध्ये किंवा दुबार पेरणी करावयाची असल्यास पुढीलप्रमाणे पीक पेरणीचे व्यवस्थापन करावे.

पीक

सुधारीत/संकरीत वाण

बियाणे
(किलो/हे.)

पेरणी अंतर
(सेमी)

रोपांची संख्या 
हेक्टरी (लाखात)

बाजरी

श्रद्धा, सबुरी, शांती, आयसीटीपी-८२०३, धनशक्ती, आदिशक्ती

४५

१.५

सुर्यफूल

मॉर्डन, एसएस-५६, भानु, इतर संकरीत वाण

८ ते १०

४५

०.७४

तूर

बीएसएमआर-७३६, बीडीएन-१, माउली,नं. १४८, विपुला, राजश्री

१२

४५ ते ६०

०.७५

हुलगा

सीना, माण

१०

३०

३.३३

एरंडी

डीसीएच-३२, व्हीआय-९, अरूणा, गिरीजा

१२ ते १५

६०x४५

०.३७

चवळी

फुले पंढरी, फुले विठाई

१०

४५

३.३३


सोयाबीन, भुईमूग ही पिके १५ जुलैनंतर शक्यतो पेरू नयेत. पेरणी करावयाची असेल तर लवकर पक्व होणारे भुईमूग (फुले प्रगती, जेएल २८६), सोयाबीन (जेएस ९३०५, जेएस ९५६०) यासारखी वाण पेरणीसाठी वापरावेत. उशीरा पेरणीसाठी जास्तीत जास्त प्रमाणावर आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. खरीप हंगामामध्ये २५ ते ४५ सेमी खोलीच्या जमिनीवर आंतरपिके घेण्याची शिफारस केलेली आहे. बाजरी आणि तूर (२:१) आंतरपीक घेतल्यास सलग पिकापेक्षा निश्चितच जास्त फायदा मिळतो. बाजरी आणि सुर्यफूल ही पिके ९० ते १०० दिवसात तयार होतात तर तूर पि:काचा पक्वता कालावधी १४५ ते १५० दिवसांचा असल्यामुळे पिकांच्या योग्य वाढीस जमिनीतील उपलब्ध ओलाव्याची गरज वेगवेगळ्या वेळी भागविली जाते व पावसामध्ये खंड पडल्यास कमीत कमी एक पीक तरी निश्चित पदरात पडते व अवर्षण परिस्थितीवर मात करण्यास मदत होते. याशिवाय तूर व गवार (१:२), एरंडी व गवार (भाजीसाठी) (१:२) आणि एरंडी व दोडका (मिश्र पीक) घेतल्यास सलग पिकापेक्षा निश्चितच अधिक आर्थिक फायदा मिळतो.

आंतरमशागत महत्त्वाची

जमिनीतून बाष्पीभवन होऊन पाणी हवेत उडून जात असते त्यामुळे जमिनीतील ओल कमी होते. कोळपणी केल्यामुळे जमिनीच्या वरच्या थरातून होणारे बाष्पीभवन कमी होते आणि ओलावा टिकून ठेवण्यास मदत होते. तणांचे प्रमाण जास्त असल्यास तण सुद्धा पिकांच्या बरोबरीने पाणी शोषण करतात म्हणून तण नियंत्रण केल्यामुळे ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

दोन टक्के युरिया फवारणी करावी

पावसात खंड पडल्यावर पिकांची वाढ थांबते, पिकांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते, मुळाद्वारे पाणी, अन्नद्रव्य शोषण्याची क्रिया मंदावते. अशा परिस्थितीत नंतर पाऊस झाल्यावर पुन्हा ही क्रिया त्वरीत पूर्ववत सुरू होण्यासाठी पिकावर २ टक्के युरियाची फवारणी करावी. यामुळे मुळांची कार्यक्षमता वाढते आणि मूळ जमिनीतून अन्नद्रव्य, पाणी शोषून घेण्यास योग्य होतात.

आच्छादनाचा वापर

जमिनीच्या पृष्ठभागावर पिकांच्या ओळीमध्ये काडी-कचरा, पीक अवशेष, पाला पाचोळा, ऊसाचे पाचट इत्यादी सेंद्रीय पदार्थाचे प्रति हेक्टरी ५ टन याप्रमाणे आच्छादन करावे. भाजीपाला, फळपिके यासारख्या नगदी पिकांमध्ये सेंद्रीय पदार्थाऐवजी प्लास्टीक फिल्मचे आच्छादन केलेले अधिक फायदेशीर होऊ शकते. आच्छादनामुळे २५ ते ३० टक्के उत्पादनामध्ये वाढ होते असे आढळून आले आहे.

परावर्तकांचा वापर

पानांद्वारे होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी केओलीन ऍ़ट्राझीन किंवा फिनाईल मरक्युरीक ऍ़सिटेट यापैकी एका परावर्तकाची फवारणी करावी यामुळे सुर्यप्रकाश पानांवरून परावर्तीत होतो. त्यामुळे बाष्पोत्सर्जन कमी होऊन अवर्षणाचा ताण सहन करण्यास मदत होते.

संरक्षित पाणी

सध्या उभ्या असलेल्या पिकांच्या महत्त्वाचा पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थेनुसार पिकास एक किंवा दोन वेळा पाणी द्यावे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पीक वाचवण्यासाठी संरक्षित पाणी देणे यामध्ये दोन गोष्टी अधोरेखित होतात. प्रथम म्हणजे पिकांच्या कार्यसाधक मुळांच्या कक्षेमधील ओलावा पूर्णपणे संपलेला असतो व पीक सुकण्यास सुरूवात झालेली असते, तसेच मातीतला ओलावा कमी झाल्यामुळे जमिनीस भेगा पडण्यास सुरूवात झालेली असते. दुसरे म्हणजे उपलब्ध पाण्याच्या साठ्यात अत्यल्प पाणी असते. अशा परिस्थितीत हलके पाणी देण्याचा प्रयत्न केला तरी १० सेमी पेक्षा कमी पाणी बसूच शकत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा पीक सुकण्यास सुरूवात झालेली असते, जमिनीला भेगा पडलेल्या असतात व पाणी साठ्यात थोडेच पाणी उपलब्ध असते तेव्हा हलके पाणी सर्व शेतात समप्रमाणात देऊन पीक वाचविण्यासाठी तुषार सिंचन हे एक हुकमी अस्त्र आहे.

डॉ. दिलीप कठमाळे
(कृषिविद्यावेत्ता व प्रभारी अधिकारी, कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज)

kharif खरीप आच्छादन mulching urea युरिया Antitranspirants Kaolin केओलीन परावर्तक mixed cropping मिश्र पिक
English Summary: Crop Management for Kharif Season

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.