कापसाला मिळणारा बाजारभाव हा सर्वस्वी कापसाच्या प्रतिवर अवलंबून असतो. कापसाची प्रत राखण्याकरिता वेचणी करतांना काळजी घेणे आवश्यक आहे. वेचणी सुरु झाल्यापासून साधारणतः ३ ते ४ वेचणीत बराचसा कापूस गोळा होतो. आपल्याकडे वेचणी करताना काळजी न घेतल्यामुळे ३० ते ३५ टक्के पालापाचोळा व इतर केरकचरा रुइमध्ये आढळतो. या बाबींचा धाग्याच्या गुणधर्मावर परिणाम तर होतोच त्याचबरोबर कापड गिरणीमध्ये प्रतवारी टिकवण्यास अडचण निर्माण होते.
कापसाची वेचणी करतांना घ्यावयाची काळजी :-
कापूस वेचणी ठराविक कालावधीत केल्यास चांगल्या प्रतीचा कापूस मिळतो. जास्त दिवस कापूस झाडावर राहिल्यास त्याला पालापाचोळा, हवेतील धुळीचे कण, बोंड जमिनीवर पडल्यास मातीचे कण चिकटतात व त्यामुळे कापसाची प्रत खराब होते.
वेचणी हि सकाळी किंवा दुपारी उशिराने करावी, जेणेकरून कापसाला पालापाचोळा चिकटून येणार नाही, बोंडे वेचतांना पालापाचोळा चिकटल्यास त्याचवेळी काढावे व स्वच्छ कापूस गोळा करावा.
अपरिपक्व व अर्धवट उमललेल्या बोंडातील कापसात पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशा बोन्डातील कापूस वेचून तसाच साठविल्यास रुईला पिवळसरपणा येतो व कापसाची प्रत खालावते. शिवाय अशा कापसाच्या सरकीचे आवरण टणक नसल्यामुळे गलाई करतांना सरकी फुटते व ती रुइमध्ये मिसळते व रुईची प्रत खराब होते.
परिपक्व व पूर्ण फुटलेल्या बोन्डातील कापसाची प्रत चांगली असते आणि या कापसापासून मिळणाऱ्या रुई आणि धाग्याची प्रत उच्च दर्जाची असते. म्हणूनच कापसाच्या तसेच रुईच्या दर्जेदार उत्पादनाकरीता वेचणी करतांना पूर्णतः परिपक्व आणि पूर्ण उमललेल्या बोन्डातील कापूस वेचणी करावी.
कपाशीची प्रतवारी :
कापसाला योग्य प्रकारे बाजारपेठ मिळवण्यासाठी व शेतकऱ्यास त्याने उत्पादित केलेल्या कापसाला योग्य तो मोबदला मिळण्यासाठी कापसाची प्रतवारी होणे अनिवार्य ठरते. प्रतवारी म्हणजे उत्पादित मालाचे ठरवून दिलेल्या गुण वैशिष्ठ्यांचे आधारावर त्याचे विभिन्न गट करणे होय.
कपाशीची प्रतवारी सादृश्य पद्धतीने केली जाते. सर्वसाधारणपणे कपाशीची वेचणी व विक्रीचा कालावधी जवळपास सारखाच असल्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कापसाची आवक असते. त्यामुळे संकलन केंद्रावर प्रतवारी, मोजमाप व प्रक्रिया करण्यास अडचणी निर्माण होत असतात, म्हणून सादृश्य पद्धतीनेच प्रतवारीचे काम मोठ्या प्रमाणावर करता येत होते पण आता नवीन तंत्रामुळे बऱ्याच संकलन केंद्रावर कापसाच्या गुणवैशिष्ठ्यानुसार कापसाचा भाव ठरविला जातो. त्यामुळे चांगली प्रतवार असलेल्या मालाला योग्य भाव मिळतो.
कापसाची प्रत ठरविणे :
कापूस वाण निश्चित केल्यानंतर त्याची प्रत ठरविणे आवश्यक आहे. प्रत ठरवितांना कापसाचा रंग, स्वच्छता, रुईचे प्रमाण, स्पर्श, धाग्याची ताकद, लांबी, कापसातील पत्ती, काडीकचरा, माती इत्यादीचे प्रमाण, कापसात असलेले अपरिपक्व व पिवळी टिक असलेल्या कापसाचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण विचारात घेतले जाते.
कापसाच्या बोंडाची पूर्णपणे पक्व झाल्यानंतर कापसाच्या वेचणीला सुरुवात करावी.
बोन्डातील कापूस दवाने किंवा पावसाने भिजलेला असल्यास वेचणी करू नये. खराब झालेला कापूस वेचून वेगळा ठेवावा किंवा त्याची वेगळी वेचणी करावी.
कापसाचा रंग :
प्रत्येक वाणाच्या कपाशीस विशिष्ठ प्रकारचा रंग असतो. उत्तम प्रतीच्या कपाशीस त्या वाणांचा मुळ रंग दिसून येतो. कापसाची प्रत हलकी असल्यास किंवा पावसाने कापूस भिजला गेल्यास त्याचा परिणाम कपाशीच्या रंगावर होतो, त्यामुळे रुइमधे लाल पिवळसर रंगाची रुई आढळल्यास अशा रुईला बाजारपेठेत कमी भाव मिळतो.
कापसाची स्वच्छता :
कपाशीची वेचणी करतांना झाडाची पत्ती, पालापाचोळा चिकटून येतो, काही वेळा नख्यासह कापसाचे बोंड वेचणी केले जाते. अशा प्रकारच्या विक्रीस आणलेल्या कपाशीमध्ये झाडाची पाने, पालापाचोळा, नख्या, माती इ. अनावश्यक बाबी असल्यास कपाशीच्या प्रतीवर परिणाम होतो.
तंतूची लांबी :
सर्वासाधारानपणे कापसाची गलाई झाल्यानंतर त्यापासून मिळालेल्या रुईतील थोडा भाग घेऊन हाताने त्यातील धागे ओढून किंवा प्रयोगशाळेत विशिष्ठ उपकरणांद्वारे धाग्याची लांबी ठरविण्यात येते. परंतु विक्रीस मोठ्या प्रमाणात असलेल्या कापसाच्या तंतूची लांबी काढण्यासाठी प्रत्येक गाडीतील कापूस गलाई करून त्याची लांबी काढणे शक्य होत नसते. म्हणून विक्रीस आणलेल्या कापसाची काही कापूस एका हातात घेऊन दुसऱ्या हाताने ओढून कापसातील रुई सरकीपासून वेगळी केली जाते. विशिष्ठ पातळीवर धाग्याची समानता आल्यानंतर धाग्याच्या लांबीचा अंदाज घेण्यात येत होता परंतु आता प्रयोगशाळेत नवीन आलेल्या उपकरणान्द्वारे धाग्याची लांबी ठरवून अधिक लांब धाग्याच्या कापसाला अधिक भाव मिळतो.
तंतूची ताकद :
विक्रीस आणलेल्या कापसापैकी काही कापूस हातात घेऊन दुसऱ्या हाताने त्यातील तंतू वेगळे करून व तंतुना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकद ठरविली जाते. चांगली, मध्यम व कमी अशा प्रकारे धाग्याच्या ताकदीचे प्रकार करून कापसातील परिपक्व ए अपरिपक्व कापसाचे प्रमाण ठरविण्यात येते. तंतुच्या लांबी प्रमाणे ताकदीवर भर देण्यात येतो.
कापसाच्या तंतूची परिपक्वता :
विक्रीस आणलेला कापूस पूर्णतः परिपक्व, अर्धपरीपक्व वा अपरिपक्व आहे हे तपासणे आवश्यक असते. परिपक्वतेवर कापसातील रुईचे प्रमाण अवलंबून असते व रुईच्या प्रमाणाचा अंदाज कापूस हातात घेतल्यानंतर करता येतो. परिपक्व कापसाचे बोंड फुललेले असते व रुईचे प्रमाण अधिक असते.
कापूस प्रतवारीचे फायदे :
कापसाच्या प्रतीनुसार कापसाला योग्य मोबदला मिळण्याची खात्री असते.
कापसाच्या गुणवैशिष्ठ्याची पारख करण्यास व त्याप्रमाणे किंमत ठरविण्यास मदत होते.
प्रतवारीमुळे कापसाचा प्रातिनिधिक नमुना पाहून संपूर्ण कापसाची प्रतवारी ठरविता येते.
शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचा कापूस उत्पादित करण्यास व गुणवत्तेनुसार विभागणी करण्याची सवय लागते.
वरीलप्रमाणे वेचणी, साठवण आणि प्रतवारी केल्यास कापसाला चांगला भाव मिळतो. अश्याप्रकारे कापसाच्या रुईला, धाग्याला व कापडाला परदेशात सुद्धा चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.
कापसाची योग्य प्रकारे साठवण कशी करावी :
प्रत्येक वेचणीनंतर कापूस सावलीत वाळवून नंतरच साठवावा.
कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा तसेच बागायती कपाशीच्या मधल्या चार वेचणींचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतोवर वेगळा साठवावा.
वेचणीच्या काळात पाउस पडल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावर सुकू द्यावा व पूर्ण वाळल्या नंतरच वेचणी करून वेगळा साठवावा.
शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. या कापसाला झोडा असे संबोधले जाते. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून असा कापूस वेगळा साठवावा.
कपाशीवर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास हा चिकट स्त्राव पानांवरून कापसावर पडतो व रुईची प्रत खालावते. परिणामतः बाजारभाव कमी मिळतो तसेच अशा प्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे या कापसाची सुद्धा साठवण वेगळी करावी.
पूर्णपणे कोरड्या कापसाची वेचणी करून तो कोरड्या खोलीत साठवून ठेवावा. उघड्या अंगणात साठविलेल्या असल्यास त्वरित झाकून ठेवावा.
डागाळलेला रंग बदललेल्या किडलेल्या (कावडी) कापूस वेगळा साठवावा. तो कापूस चांगल्या कापसात मिसळू नये कारण चांगल्या कापसाची किंमत कमी होते.
कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत याची काळजी घ्यावी.
कापूस मोकळी हवा असलेल्या पक्क्या गोदामात साठवावा. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसास पिवळसर पणा येतो त्यामुळे रुई आणि धाग्याची प्रत खालावते.
निरनिराळ्या कापूस वाणांची साठवण वेगवेगळ्या ठिकाणी करावी जेणेकरून त्याची मिसळ किंवा भेसळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
विक्री केंद्र किंवा कापूस संकलन केंद्रावर घ्यावयाची दक्षता :
कापूस संकलन केंद्राच्या आवारात पक्का प्लॅटफोर्म असला पाहिजे.
आवार प्रत्येकी तीन ते चार तासांनी साफ करीत राहिले पाहिजे..
दलालांना किंवा व्यापाऱ्यांना स्वच्छ कापसाचे महत्व समजावून सांगितले पाहिजे.
कापूस कधीही खुल्या जागेवर खाली करू नये / बंडी खाली करू नये.
वेगवेगळ्या जातीच्या कापसाला एकत्र करू नये.
कापसावर कोणत्याही व्यक्तीने बसू नये.
तंबाखू, गुटखा इत्यादीचे खाली असलेले पाऊच जमिनीवर फेकू नये.
Share your comments