रब्बी ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट येते. त्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन नियंत्रण पद्धतीचा वापर करून कीड आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. ज्वारी हे चारावर्गीय पीक असल्यामुळे जनावरांसाठी चारा म्हणून बऱ्याच ठिकाणी याची लागवड होते. रब्बी ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे, या किडीचे शास्त्रीय नाव स्पोडोप्टेरा फुगीपर्डा (Spodoptera frugiperda ) असे आहे. ही एक बहुभक्षी कीड असून, सुमारे ३५० पेक्षा जास्त पिकांवर तिचा जीवनक्रम पूर्ण करते.
या किडीच्या प्रामुख्याने अंडी, अळी, कोष, पतंग या चार अवस्था असतात. त्यातील अळी अवस्था ही खूप नुकसानकारक असते.
मादी पतंग साधारणपणे १०००-१५०० हिरवट पिवळसर रंगाची अंडी समूहाने पानावर, पोंग्यामध्ये घालते. त्यावर लोकरी केसाळ पुंजक्याचे आवरण घातले जाते, अंड्याचा रंग १२ तासानंतर गडद तपकिरी होतो.
अंड्यातून साधारण २-३ दिवसांत अळी बाहेर पडते अळीच्या सहा अवस्था असतात. अवस्थेनुसार अळीचा रंग बदलत जातो. लहान अळीचा हिरव्या रंगाची आणि डोके काळ्या रंगाचे असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये अळीचा रंग तपकिरी रंग होतो. तर शेवटच्या अवस्थेत अळीच्या शरिरावर गडद ठिपके दिसून येतात. तसेच डोळ्यावर इंग्रजी वाय (Y) आकार स्पष्ट दिसून येतो.
पिकाच्या जवळील जमिनीत अळीचा कोप अवस्थेचा काळ हा साधारण १ आठवडा ते १ महिन्यापर्यंत असू शकतो. अशाप्रकारे अळीच्या १०-१२ पिढ्या एका वर्षांत पूर्ण होतात.
नुकसानीचा प्रकार :
हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त, कमी सूर्यप्रकाश व हिवाळा या बाबी अळीच्या वाढीसाठी पोषक आहेत.
लहान अळ्या पानांचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात तर मोठी अळी ही पोंग्यामधील पाने खाते, पानांना छिद्र पाडते. अळीने पोंगा खाल्ल्याने पिकाची वाढ खुंटते. परिणामी, उत्पादन घट येते.
पोंग्यावर लाकडाच्या भुश्शासारखी अळीची विष्ठा हे प्रादुर्भावाचे ठळक वैशिष्ट्ये आहे.
एकात्मिक कीड व्यवस्थापन :
उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरणी करावी, त्यामुळे किडीच्या जमिनीतील अवस्था वर येऊन प्रखर सूर्यप्रकाशामुळे किंवा कीटकभक्षी पक्ष्यांमुळे नष्ट होतात.
आंतरपीक म्हणून ज्वारी + मूग +उडीद या पद्धतीचा वापर करावा.
सापळा पीक म्हणून ज्वारी पिकाच्या बाजूने मका पिकाची लागवड करावी.
पीक उगवणीनंतर १० दिवसांनी शेतामध्ये एकरी २० कामगंध सापळे लावावेत.
आंतरमशागत करून तणे काढून टाकावी.
किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच, पोंग्यामध्ये वाळूमिश्रित राख टाकावी. त्यामुळे प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होतो.
अळ्या वेचून नष्ट कराव्यात. शक्य असल्यास अंडीपुज गोळा करून नष्ट करावेत.
शेतात प्रकाश सापळे एकरी १ याप्रमाणे वापर करावा.
फवारणी : (प्रति १० लिटर पाण्यातून)
इमामेक्टीन बेन्झोएट (०.५ % एस.जी.) ४ ग्रॅम किंवा
स्पनोटोरम (११.७ % एस.सी.) ५.१२ मिलि किंवा
क्लोर ॲन्टानिलीप्रोल (१८.५ % एस.सी.) ४.३२ मिलि किंवा
क्लोर ॲन्ट्रानिलीप्रोल (९.३ %) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.६ % झेडसी (संयुक्त कीटकनाशक) ५.०२ मिलि
◆(आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.)
टीप : फवारणीच्या मात्रा हाय व्हॉल्यूम पंपासाठीच्या (उदा. नॅपसॅक पंप) आहेत.
डॉ.दयानंद मोरे,📞७५८८०८२१६५
(सहायक प्राध्यापक कृषी महाविद्यालय, लातूर)
महत्वाच्या बातम्या;
कांदा, केळी, पपई, भाजीपाला आणि वेलवर्गीय फळे लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी मोलाचा सल्ला
खत गोणीतून पिकास अन्नद्रव्य किती मिळतात? वाचा सविस्तर..
शेतकऱ्यांनो नैसर्गिक शेतीचे दहा सिद्धांत
Share your comments