राज्यातील केळी लागवड क्षेत्रामध्ये तापमान कमी होऊन थंडीमध्ये वाढ झाली आहे. सध्या मृग बाग लागवड केळफूल पडण्याच्या अवस्थेत, तर कांदेबाग मुख्य वाढीच्या अवस्थेत आहे. केळी पिकाच्या उत्तम वाढ व उत्पादनासाठी १६ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. तापमान १२ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास त्याचा केळी पिकावर अनिष्ट परिणाम होतो.
थंडीचा होणारा परिणाम
लागवडीवर होणारा परिणाम
ऊतीसंवर्धीत रोपे सेट होण्यासाठी तापमान १६ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान असणे आवश्यक असते.
कांदे बाग लागवडीस उशीर होईल तसा थंडी वाढल्याने रोपांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
मुळावर होणारा परिणाम
उतिसंवर्धित रोपांच्या कांदेबाग लागवडीमध्ये कमी तापमानामुळे मुळांची संख्या व लांबी कमी होते. तसेच मुळांच्या अन्न व पाणी शोषणाची कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
पानांच्या वाढीवर होणारा परिणाम
केळीला सरासरी ३ ते ४ पाने प्रति महिना येतात. थंडीच्या दिवसांत पाने येण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे प्रति महिना २ ते ३ पाने येतात. कमी तापमानामुळे पाने कमी अंतरावर येतात. त्यामुळे पानांचा गुच्छ तयार होतो. अशा परिस्थितीत पानांचा फारच कमी भाग सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो. परिणामी, अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा येऊन झाडाची वाढ खुंटते. त्याचा उत्पादनावर परिणाम होतो.
लहान रोपांच्या कोवळ्या पानांच्या कडा करपतात. केळीचा पोंगा पिवळा होऊन करपतो. मोठ्या रोपांच्या पानावर पिवळसर लांबट चट्टे पडतात. कालांतराने ते काळपट तपकिरी रंगाचे होऊन पान वाळते. मोठ्या रोपांच्या पानांच्या कडा करपतात. सूर्यप्रकाश पडणाऱ्या बाजूने पानांचा रंग पिवळा पडतो आणि विरुद्ध बाजूच्या पानांचा रंग हिरवा राहतो.
Share your comments