आकार, रंग आणि कांदा तयार होण्याचा काळ यात एकसारखे पणा राहत नाही. परिणामी जोड कांदे व डेंगळे यांचे प्रमाण वाढते. उत्कृष्ट दर्जाचे कांदा बियाणे तयार करण्या विषयी शास्त्रीय माहिती घेऊ.
बीजोत्पादनाच्या दोन पद्धती :
रोपे लावून कांदे न काढता तसेच शेतात ठेऊन त्यांना फुले येऊ दिली जातात. या पद्धतीमध्ये खर्च कमी होतो, परंतु उत्पादनही कमी येते. कांदा जमिनीतून काढला जात नाही, त्यामुळे त्याची निवड करता येत नाही. दुर्गुण असलेले कांदे व त्याची प्रजा वाढत जाते. रोगाचे व तणांचे प्रमाण वाढते. तसेच या पद्धतीमध्ये केवळ खरीप जातीचेच बी तयार करता येऊ शकते. अनेक अडचणी व त्रुटीमुळे ही पद्धत फारशी वापरली जात नाही.
या पद्धतीत एका हंगामात कांदा काढून तो साठवून, निवड करून दुसऱ्या हंगामात लावून बीजोत्पादन केले जाते. या पद्धतीमध्ये बियांचे उत्पादन जास्त येते, कांद्याची निवड करता येते.
निवड केलेले कांदे लावल्यामुळे दरवर्षी नवीन पिढी सुधारत जाते. रब्बी हंगामाचे कांदे साठवून ठेवावे लागतात, त्यामुळे साठवण खर्च वाढतो. मात्र अन्य फायदे लक्षात घेता हा खर्च अपरिहार्य परंतु नगण्य वाटतो.
हंगामानुसार लागणाऱ्या जातींचे बीजोत्पादन
अ) खरिपातील जातींचे बीजोत्पादन
खरिपातील जातींचे कंद ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात तयार होतात. या कांद्याने महिनाभर विश्रांती देऊन डिसेंबर महिन्यात कांदे बीजोत्पादनासाठी लावले जातात. त्यापासून एप्रिल-मे महिन्यात बी तयार होते. खरीप कांद्याचे कंद उत्पादन व बीजोत्पादन एकाच वर्षात पूर्ण करावे लागते. लागवडीचे वेळापत्रक योग्य प्रकारे पाळले तरच खरीप कांद्याचे बीजोत्पादन चांगले आणि वेळेवर करता येते. खरीप कांद्याचे बी मे महिन्यात तयार होऊन पॅकिंग करून त्याच महिन्यात विकले जाणे आवश्यक असते.
अन्यथा बी पुढच्या खरीप हंगामात विकावे लागते. साठवणीत बियांची उगवण क्षमता कमी होते. शिवाय वर्षभर भांडवल देखील गुंतून राहते, हे लक्षात ठेवावे._
ब) रब्बी हंगामातील जातींचे बीजोत्पादन
रब्बी हंगामातील जातींची रोपे नोव्हेंबर -डिसेंबर महिन्यात लावली जातात. एप्रिल - मे महिन्यात कांदे काढून वाळवून ते चाळीत साठवले जातात. ऑक्टोबर महिन्यात चाळीतील कांदे निवडून बीजोत्पादनासाठी वापरले जातात. या प्रक्रियेत कांद्याची साठवण हा गुणधर्म आपोआप प्रत्येक पिढीत जोपासला जातो.
कांदे रंगाने व आकारानुसार निवडले जात असल्याने पुढील पिढी अधिक चांगली निवडली जाते. कांद्यांना जवळ जवळ ५ ते ६ महिने विश्रांती मिळत असल्यामुळे फुलांचे दांडे मोठ्या प्रमाणात निघतात.
Share your comments