हरभरा बिजोत्पादन तंत्रज्ञान

24 October 2018 07:33 AM


कडधान्य पिकांमध्ये हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पिक आहे. हरभरा पिकाची लागवड कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रात घेतली जाते. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रात हरभरा लागवडीला जास्त प्राधान्य देण्यात येते. महाराष्ट्र राज्यात 2013 ते 14 मध्ये हरभरा पिकाखालील क्षेत्र 18.20 लाख हेक्टर होते. त्यापासून 16.22 लाख टन उत्पादन व उत्पादकता 891 किलो/हेक्टर एवढी होती.

हरभऱ्याची प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविणेसाठी आपणास सुधारित जातीच्या बियाण्यांचा वापर, योग्य लागवड पद्धतीचा अवलंब करणेही काळाची गरज आहे. अलिकडच्या काळात हरभऱ्याचे विकास, विश्वास, फुले-जी 12, विजय, विशाल, विराट, विहार, कृपा, दिग्विजययासारखी भरपूर उत्पादन देणारे आणि रोगप्रतिकारक नवनवीन सुधारीत वाण प्रसारित झालेली आहेत. सुधारित वाणांचा प्रसार होवून सुद्धा शेतकरी आपल्याकडीलच बियाण्यांचा पेरणीसाठी उपयोग करतात. अशा बियाण्यांची उगवणशक्ती, भौतिक शुद्धता आणि जोम कमी असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. सुधारित वाणांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांना हरभऱ्याचे अधिक उत्पन्न मिळेल. सुधारित वाणांमध्ये सुद्धा शुद्ध व दर्जेदार बियाणे वापरणे गरजेचे असते. सुधारित वाणांचा मागणी अभावी तुटवडा निर्माण झाल्यास बाजारात अशुद्ध बियाण्यांचा पुरवठा होतो. त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होते. दुसर्‍यावर अवलंबून न राहता बिजोत्पादन कसे करावे यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.

जमीन व हवामान:

मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 5.5 ते 8.5 च्या दरम्यान असावा. हलकी अथवा भरड, चोपण, पाणथळ व क्षारयुक्त जमीन या पिकासाठी वापरु नये. स्वच्छ सुर्यप्रकाश, थंड व कोरडे हवामान या पिकासाठी चांगले मानवते. या पिकाच्या वाढीसाठी सर्वसाधारण 15 ते 25 अंश सेल्सिअस तापमान चांगले असते.

पूर्वमशागत:

खोल नांगरट कुळवाच्या दोन पाळ्या देवून जमीन भुसभुशीत करावी. खरीपात मूग व उडीदाचे पीक घेतले असल्यास काढणीनंतर वखराच्या दोन ते तीन पाळ्या देवून पेरणी करावी. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी प्रति हेक्टरी 10-15 टन चांगले कुजलेले शेण खत किंवा कंपोस्ट जमिनीत मिसळावे.

पेरणी:

कोरडवाहू क्षेत्रात हरभर्‍याची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात करावी. बागायती क्षेत्रासाठी पेरणी 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान करावी. कोरडवाहू क्षेत्रात बियाणे 5 से.मी. खोलीवर बी पेरावे. पेरणी टोकण पद्धतीने अथवा पाभरीने करावी. पेरणीसाठी दाण्याच्या आकारमाना नुसार हेक्टरी बियाणे वापरावे. उदा. लहान दाण्याच्या वाणा करीता हेक्टरी 60 ते 65 किलो बियाणे वापरावे, मध्यम आकाराच्या वाणाकरीता 70 किलो बियाणे वापरावे तर टपोऱ्या आकाराच्या वाणाकरीता 100 किलो बियाणे वापरावे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर 30 से.मी. ठेवावे तर दोन झाडांमधील अंतर 10 से.मी. ठेवावे.


बियाणे:

बिजोत्पादनासाठी योग्य त्या प्रकारचे बियाणे वापरावे. उदा. प्रमाणित बिजोत्पादनासाठी पायाभूत बियाणे वापरावे तर पायाभूत बिजोत्पादनासाठी मुलभूत बियाणे वापरावे. बियाणे नेहमी मान्यताप्राप्त दुकानदाराकडूनच खरेदी करावे. बियाण्याच्या पिशवीवरील खुणचिठ्ठी (टॅग) पाहून त्यावरील बियाणे परीक्षणाची तारीख तपासून घ्यावी. बियाणे खरेदीची पावती घ्यावी. त्यावर बियाण्याचा लॉट नंबर, पिकाची जात, खरेदीची तारीख इत्यादी, तपशीलवार माहिती तपासून घ्यावी. बियाण्याची पिशवी फोडताना त्यावरील खूणचिठ्ठी (टॅग) त्यावरच राहील याची काळजी घ्यावी. तसेच बियाण्याचा थोडा नमुना पिशवीत शिल्लक ठेवावा. बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे अधिकारी आल्यानंतर त्यांना टॅग दाखविणे जरुरीचे असते. तसेच बियाणे उगवणीसंबंधी काही तक्रार असल्यास शिल्लक बियाण्याचा नमुना असेल तर तक्रार करणे सोपे होते. बियाणे पेरणीनंतर 7 दिवसांच्या आत बीजोत्पादन क्षेत्राची जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे विहीत नमुन्यातील अर्ज करुनव शुल्क भरुन नोंदणी करणे आवश्यक आहे.

बीजप्रक्रिया:

बियाण्यांची उगवण चांगली होण्यासाठी व रोपावस्थेत उद्भवणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम + 2 ग्रॅम बाविस्टीन किंवा ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. तसेच हरभऱ्याच्या मुळावरील ग्रंथींचे प्रमाण वाढून हवेतील नत्र शोषण्याचे कार्य वाढविण्याच्या दृष्टीने 20-25 ग्रॅम प्रति किलो रायझोबियम जिवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करावी. जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया केल्यावर बियाणे सावलीत वाळवून लगेचच पेरणी करावी.

विलगीकरण अंतर:

हरभऱ्यामध्ये स्वपरागीभवन होते. त्यामुळे त्यास कमी विलगीकरण अंतर लागते. हरभऱ्याच्या इतर जातीपासून पायाभूत बिजोत्पादनासाठी 10 मी. तर प्रमाणित बिजोत्पादनासाठी 5 मी. विलगीकरण अंतर असावे. यामुळे बिजोत्पादनाची अनुवंशिक शुद्धता टिकवण्यास मदत होते.

भेसळ काढणे:

बिजोत्पादनाकरीता घेतलेल्या वाणाच्या गुणधर्माशी न जुळणारी झाडे, रोगग्रस्त झाडे पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी नष्ट करावीत. त्यामुळे बियाण्याची अनुवंशिक शुद्धता कायम राहते. मूळ झाडे व भेसळीची झाडे ओळखण्याकरीता बिजोत्पादनाकरीता घेतलेल्या वाणाच्या गुणधर्माची माहिती करुन घेणे गरजेचे असते. साधारणत: झाडाची उंची, पानाची लांबे, रुंदी, पानाचा रंग, वाढीचा प्रकार, फुलाचा रंग, घाट्याचा आकार इत्यादी बाबींवरुन गुणधर्माची पडताळणी करु शकतो. उदा. देशीवाण (विजय, फुले जी 12, विशाल) यांच्या फुलांचा रंग गुलाबी असतो तर काबुली वाण (विराट, विहार, काक-2) यांच्या फुलांचा रंग पांढरा असतो.

क्षेत्रीय तपासणी:

बीज प्रमाणिकरण यंत्रणेकडून हरभरा बिजोत्पादन क्षेत्राची दोन वेळेस क्षेत्रीय तपासणी केली जाते. पहिली तपासणी पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी केली जाते. दुसरी तपासणी पीक फुलोऱ्यात असताना केली जाते. क्षेत्रीय तपासणीच्या वेळेस उत्पादकास हजर राहणे बंधनकारक असते. तपासणीच्या वेळेस दिलेल्या सुचनेचे तंतोतंत पालन केल्यास बिजोत्पादन क्षेत्र पात्र ठरते.

रासायनिक खते:

हरभरा पिकामध्ये हवेतील नत्र शोषून घेण्याची क्षमता असल्याने यास नत्राची मात्रा कमी प्रमाणात लागते. या पिकास प्रति हेक्टरी 25 कि.ग्रॅ. नत्र व 50 कि.ग्रॅ. स्फुरद द्यावे. खताची मात्रा डायअमोनियम फॉस्फेट च्या माध्यमातून देऊ शकतो.

पाणी व्यवस्थापन:

पेरणीनंतर दोन महत्त्वाच्या अवस्थेत पाणी दिल्यास फायदेशीर ठरते. पहिली पाण्याची पाळी पीक फुलोऱ्यात असताना द्यावी तर दुसरी पाण्याची पाळी घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावी. पाण्याची उपलब्धता असल्यास दोन ऐवजी तीन पाणी आवश्यकातेनुसार द्यावे. हरभरा पिकास सर्वसाधारण पणे 25 सेमी. पाणाी लागते. हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धताीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते.

आंतरमशागत:

पिकाच्या जोमदार वाढीसाठी व शुद्ध बियाण्याचे उत्पादनासाठी पीक पेरणीपासून 60 दिवस तण विरहीत ठेवणे आवश्यक आहे. या पिकास पहिली कोळपणी व खुरपणी पेरणीनंतर 20-25 दिवसांनी करावी. दुसरी कोळपणी व खुरपणी पोरणीनंतर 40-45 दिवसांनी करावी. कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होते, बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहतो. तसेच रोपांना मातीची भरही लागते. मजुरा अभावी खुरपणी करणे शक्य नसल्यास तणनाशकाचा वापर करावा. फ्ल्युक्लोरॅलिन अथवा पेंडीमिथिलिन प्रति हेक्टरी 25 मि.ली.10 लिटर पाण्यात मिसळून उगवणीपूर्वी फवारावे. 


पीक संरक्षण:

हरभरा पिकाचे प्रामुख्याने घाटे अळीमुळे सर्वात जास्त नुकसान होते. या किडींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. त्यासाठी दर 20 मिटर अंतरावर उभ्या काठीला आडवी काठी बांधून शेतात उभ्या कराव्यात. त्यावर बगळे, चिमण्या, साळुंकी पक्षी बसतात. हे पक्षी पिकावरील अळ्या पकडून खातात. कामगंध सापळ्याांचा वापर करावा. 5 कामगंध सापळे प्रति हेक्टरी प्रमाणे लावावेत. पीक तीन आठवड्याचे झाले असता शेंडे खाल्लेले व पानावर पांढरे डाग दिसल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. नंतर 10 ते 12 दिवसांनी हेलिओकिल या विषाणूजन्य किटकनाशकाची 500 मि. ली. पाण्यातून प्रति हेक्टरी फवारणी करावी. नुकसानीची पातळी 5 टक्के पेक्षा जास्त  दिसल्यास 20 टक्के प्रवाही रेनॉक्झीपीर (कोराजन) 90 मिली अथवा 48 टक्के प्रवाही फ्ल्युबेंडामाईड (फेम) 125 मिली अथवा दाणेदार 5 टक्के ईमामेक्टीन बेंझोएट (प्रोक्लेम) 200 ग्रॅम प्रति हेक्टर करीता 500 लिटर पाण्यातून फवारावे.

संबंधित लेख वाचण्यासाठी: हरभरा पिक व्यवस्थापन

हरभरा पिकावर प्रामुख्याने मर रोग, मुळकुजव्या आणि मानकुजव्या इत्यादी रोग आढळून येतात. त्यांच्या नियंत्रणासाठी मररोग प्रतिकारक्षम जातीचाा वापर करावा. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम थाायरम + 2 ग्रॅम बाविस्टीन किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बीजप्रक्रिया करावी. यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम प्रति 10  किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे.

काढणी मळणी व साठवणूक:

हरभरा पिकात पक्वतेनंतर काढणीस उशीर झाल्यास घाटे गळण्यााचे प्रमाण वाढते. त्यामुळे पीक पक्व झाल्यानंतर म्हणजे पाने व घाटे वाळल्यानंतर या पिकाची काढणी प्रमाणीकरण अधिकार्‍यांच्या परवानगीने करावी. काढणीनंतर पीक खळ्यावर चांगले वाळवू द्यावे. नंतरच मळणी यंत्राद्वारे अथवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने मळणी करावी. मळणी करताना इतर बियाण्याची भेसळ होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याकरीता  मळणीची जागा, मळणी यंत्र वइतर साहित्य स्वच्छ करुन घ्यावे. मळणीनंतर बियाणे चांगले वाळवावे. साठवणूकीसाठी हरभरा बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण जास्तीत जास्त 9 टक्क्यांपर्यंत असावे. अशाप्रकारे तयार झालेले बियाणे स्वच्छ पाोत्यात भरुन बीज प्रमाणिकरण यंत्रणेच्या सुचनेनुसार नजीकच्या बीज प्रक्रिया केंद्रावर बियाण्याच्या पुढील प्रक्रियेसाठी जमा करावे. तयार केलेले बियाणे स्वत:साठी ठेवायचे असल्यास बियाण्यास थायरम या बुरशीनाशकाची 2.5 ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करुनच साठवावे.
वरील तंत्रज्ञानाप्रमाणे बिजोत्पादनाचा कार्यक्रम राबविला तर शुद्ध व दर्जेदार बियाणांबरोबर आर्थिक फायदाही मिळेल.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या हरभरा पिकाच्या सुधारित वाणांची माहिती:

अ.क्र

वाणाचे नाव

पक्वतेचा कालावधी
(दिवस)       

उत्पन्न (क्वि./हे.)

वैशिष्ट्ये

1

विश्वास (पी जी-5)

115-120

जि. 10-11
बा. 25-30

पाने रुंद, घाटेलांबट मोठ्या आकाराचे, दाणे टपोरे, फुटाण्याकरिता चांगला वाण

2

फुले  (जी-12) 

105-110

जि. 12-13

बा. 28-30

राष्ट्रीय वाण म्हणून प्रसारित, दाण्याचा रंग पिवळा 

3

विजय   

जिरायत 85-90
बागायत 105-110

जि. 14-15
बा. 35-40

सर्वाधिक उत्पादन क्षमता, मर रोग प्रतिकारक्षम, अवर्षण प्रतिकारक्षम, कमी कालावधीत तयार होणार

4

दिग्विजय

जिरायत 90-95
बागायत 105-110

जि. 14-15
बा. 35-40

पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक, जिरायत बागायत तसेच उशिरा पेरणीत योग्य, महाराष्ट्र राज्याकरीता प्रसारित

5

विशाल           

110-115

जि. 14-15
बा. 30-35

पिवळे टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक्षम, अधिक बाजारभाव मिळतो, मध्यम उंचीचा

6

विराट

110-115

जि. 10-12
बा. 30-32

काबुलीवाण, टपोरे दाणे, अधिक बाजारभाव, मर रोग प्रतिकारक्षम

7

विहार

110-115

जि. 28-30

मररोग प्रतिकारक्षम, टपोरे पांढरे दाणे, काबुलीवाण

8

कृपा

105-110

बा. 16-18

काबुली वाण, टपोरे दाणे, सफेद पांढऱ्या रंगाचे, अधिक बाजारभाव, (100 दाण्याचे वजन 59.4 ग्रॅम) 

बिजोत्पादाासाठी उपलब्ध इतरवाण:

9

आय.सी.सी.व्ही.2 (श्वेता)   

85-90

जि. 8-10
बा. 20-22

मररोग प्रतिकारक्षम, काबुलीवाण, टपोरे दाणे

10

काक-2               

110-115

26-28   

मररोग प्रतिकारक्षम, काबुलीवाण, टपोरे दाणे

11

बी. डी. एन. 9-3          

110-115

जि. 10-12
बा. 18-20

मराठवाडा विभागासाठी शिफारस, दाणे मध्यम पिवळसर

12

पीकेव्ही-2            

100-105

12-15

सरासरी उत्पादन अधिक टपोरे दाणे, अधिक बाजारभाव, मररोग प्रतिकारक्षम

13

पीकेव्ही-4            

100-110

12-15   

सरासरी उत्पादन टपोरे दाणे, अधिक बाजारभाव, मररोग प्रतिकारक्षम

14

बीडीएनजी-797

105-100

15-16   

सरासरी उत्पादन मध्यम टपोरे दाणे, अवर्षण प्रतिकारक्षम, मररोग प्रतिकारक्षम

 

डॉ. एम. बी. धोंडे, डॉ. आर. पी. आंधळे, श्री. ए. बी. ढगे, श्री. बी. जी. राठोड, श्री. ए. डी. तांबे व डॉ. एस. आर. पाटील
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

हरभरा gram chick pea कडधान्य बिजोत्पादन seed production महात्मा फुले कृषी विद्यापीठ Mahatma Phule Krishi Vidyapeeth
English Summary: chick pea seed production technique

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.