शेतकऱ्यांना खतामध्ये असलेली भेसळ घरगुती साध्या उपायांनी ओळखता येणे गरजेचे असल्याने आज आपण या लेखातून भेसळ कशी ओळखावी याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.
युरिया :
१. एक ग्रॅम युरिया चमच्यात घेऊन गरम करावा. संपूर्ण युरियाचे दाणे विरघळल्यास तो शुद्ध युरिया असल्याचे समजावे. काही न विरघळलेला भाग मागे राहिला तर युरियात भेसळ आहे, असे समजावे.
२. हातावर पाणी घ्यावे. थोडा वेळ पाणी हातात धरून पाण्याचे तापमान आपल्या शरीराइतके झाल्यानंतर युरियाचे १०-१५ दाणे हातावर टाकायचे. शुद्ध युरिया असल्यास हाताला थंड लागतो. तो थंड लागत नसल्यास भेसळ असल्याचे समजावे.
३. एक ग्रॅम युरिया छोट्याशा पातेल्यात घेऊन त्यात पाच मिली शुद्ध पाणी मिसळावे. या द्रावणात पाच-सहा थेंब सिल्व्हर नायट्रेट मिसळावे. दह्यासारखे मिश्रण तयार झाल्यास त्यात भेसळ असल्याचे समजावे.
डी.ए.पी. (डायअमोनियम फॉस्फेट)
१. साधारणपणे शुद्ध डीएपी दाण्याचा आकार एकदम गोल गुळगुळीत नसतो. तो खडबडीत असतो.
२. डीएपीचे दाणे गरम केले असता फुलून दुप्पट आकाराचे होतात.
३. डीएपीचे दाणे फरशीवर रगडले तर सहज फुटत नाहीत.
४. डीएपी मध्ये चुना मिसळून रगडल्यास त्याचा अतिशय उग्र नाकात व डोळ्यात जळजळ होईल इतका उग्र वास (अमोनियासारखा) आल्यास त्यात नायट्रोजन असल्याचे समजावे. मात्र, असा कोणताही वास नसल्यास त्यात नायट्रोजन नाही, म्हणजेच खत भेसळयुक्त असल्याचे समजावे.
३. एक ग्रॅम डीएपी परीक्षा नळीत घेऊन त्यात १ मि.ली. सल्फरयुक्त अॅसिड अथवा हायड्रोक्लोरिक अॅसिड टाकून मिश्रण चांगल्या रीतीने हलवावे. त्यात शुद्ध डीएपी संपूर्णपणे विरघळते. अशा प्रकारे डिएपी विरघळल्यास भेसळ नसल्याचे समजावे.
एस.एस.पी. (सिंगल सुपर फॉस्फेट)
१. दाण्यासारखे, काळ्या किंवा भुऱ्या रंगाचे आणि दाणे हातावर घेऊन रगडावेत. ते लवकर तुटल्यास एसएसपी शुद्ध असल्याचे समजावे.
एम.ओ.पी. (म्युरेट ऑफ पोटॅश)
१. एक ग्रॅम एमओपी घेऊन त्यात ५ मिली शुद्ध पाणी मिसळावे. एमओपी शुद्ध असल्यास जास्तीत जास्त एमओपी विरघळते
आणि अविद्राव्य अंश तरंगतात.
२. हे खत जळणाऱ्या ज्योतीवर टाकल्यास, ज्योतीचा रंग पिवळा होतो.
३. युरिया प्रमाणेच याचाही हाताला गारवा जाणवतो.
कोणतेही खत, मग त्याचा रंग कोणताही असो. ते कधी आपल्या हाताला लागत नाही. जर हाताला लागले तर ते खत भेसळयुक्त आहे, असे समजावे.
खत भेसळयुक्त असल्याची शंका आल्यास हे करा
खताची पारख करून, खते खरेदी करताना खत भेसळयुक्त असल्याची शंका आल्यास
आपल्या विभागातील पंचायत समितीमधील कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी विकास अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयास कळवावे.
आपली तक्रार नोंदविताना विक्री केंद्राचे नाव, खताचे नाव, खताचा प्रकार, खताच्या गोणीवर छापलेले उत्पादकाचे नाव, पोत्यावरील बॅच नंबर व तपशील तसेच खत खरेदीचे पक्के बिल दिनांकासह असणे आवश्यक आहे.
Share your comments