1. कृषीपीडिया

वांग्याचे खोडवा व्यवस्थापन मिळवून देईल भरघोस उत्पन्न; अशी करा तयारी

KJ Staff
KJ Staff


अलिकडे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विविध भाजीपाला पिकांकडे वळले आहेत. काही भाजीपाला पिकांना सर्वच हंगामात मार्केटमध्ये मागणी असते. त्यात शेतकरी वांगी लागवडीला प्राधान्य देतात. खरीप, रब्बी अथवा उन्हाळ्याच्या कालावधीतही वांग्याची लागवड केली जाते. दैनंदिन आहारात वांग्याचा उपयोग भाजी, वांग्याचे भरीत यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. वांग्यामध्ये अनेक प्रकारचे आरोग्यदायी गुण आहेत जसे की यामध्ये खनिजे, जीवनसत्व अ, ब आणि क हे जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतात.

मात्र, वांगी लागवड करून पहिले पीक हाती आल्यानंतर शेतकऱ्यांचा कल त्याचा खोडवा घेण्याकडे आढळून येत नाही. अनेक शेतकरी पहिले पीक घेतल्यावर इतर पिकांकडे वळतात अथवा पीक तसेच ठेवले तर त्यातून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी पुरेशी तयारी करत नाहीत. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी वांग्याचा खोडवा पीक घेणे फायदेशीर ठरते. आणि मार्केटमध्ये या काळात कमी माल असल्याने दरही चांगला मिळतो. कमी खर्चात वांग्याचा खोडवा कसा घ्यावा याबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

वांग्याच्या खोडवा पिकाचा कालावधी...

वांग्याची लागवड साधारणतः खरीप हंगामात जून महिन्याच्या पंधरवड्यात अथवा जुलै महिन्यात केली जाते. रब्बी हंगामात हा कालावधी ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा ते नोव्हेंबरपर्यंत पुढे सरकतो. तर ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्थित सोय आहे, तेथे उन्हाळी हंगामात जानेवारीच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात लागवड केली जाते. यापैकी पहिले पीक घेतल्यानंतरच्या कालावधीत खोडवा व्यवस्थापनावर अधिक लक्ष दिले तर त्याला चांगले यश मिळते. वांगी पिकाला खरीपाचा थोडा अपवाद वगळता दर नेहमी चांगला मिळत असल्याने वर्षातील कोणत्याही कालावधीत खोडवा यशस्वीरीत्या घेता येतो. मात्र त्यासाठी योग्य नियोजन केले पाहिजे.

 

 


नियोजन हवे

बऱ्याच वेळेस वातावरणाचा विपरीत परिणाम होऊन पिकाच्या उत्पन्नात कमालीची घट येते. त्याचबरोबर खरीप हंगामात विविध प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्यांची आवक मार्केटमध्ये होत असल्याने वांग्याचे भाव कमालीचे घसरतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. याऐवजी शेतकऱ्यांनी खचून न जाता पुढील कालावधीचे योग्य नियोजन करून खोडवा घेतल्यास अल्प कालावधीमध्ये चांगले उत्पन्न मिळू शकते. हे उत्पन्न जरी पूर्वीपेक्षा थोड्या कमी प्रमाणात मिळत असले तरी पहिला बहर ओसरल्याच्या काळात मार्केटमध्ये आवक कमी झालेली असते. परिणामी दर चांगला मिळू शकतो आणि भरपूर उत्पन्न मिळते.

खोडवा घेताना घ्यावयाची काळजी 

वांगी पिकाचा पहिला बहर ओसरत आला की पिकाची पाहणी करावी. प्लॉटमधील झाड एखाद्या रोगाने ग्रासले असेल अथवा फळांची संख्या कमी होऊन त्याची वाढ खुंटलेली असल्यास अशा सर्व रोगट फांद्या, शेंडे व पाने छाटून टाकाव्यात. जिथपर्यंत झाड निरोगी दिसते, फांदीचा खोड हिरवागार, तजेलदार, टवटवीत दिसतो त्या फांदीच्या किंवा खोडाच्या बेचक्यातील डोळ्याच्या वर एक सूत भाग सोडून ब्लेडच्या पातीच्या सहाय्याने आडवा छेद द्यावा. छाटलेला सर्व भाग दूर नेऊन पाला, पाचोळ्याबरोबर जाळून टाकावा व नंतर जमिनीतील वाफसा पाहून कुदळीने खोदून खोडास मातीची भर द्यावी.

 


योग्य औषध फवारणी महत्त्वाची

पहिले पीक संपल्यानंतर लगेच वांग्यांच्या झाडांच्या गरजेनुसार, जर्मिनेटर, थ्रीवर, क्रॉप शायनर, प्रोटेक्टंट, प्रिझम व हार्मोनी आदी औषधांची योग्य प्रमाणात फवारणी करावी. झाडांना चौथ्या दिवसापासून नवीन फूट येते व पंधरा ते वीस दिवसांत नवीन फूले चमकू लातात. या फवारणीमुळे झाडावर असणाऱ्या खराब, किडग्रस्त फळांचे प्रमाण कमी होते. लहान फळे झपाट्याने पक्व होऊन तजेलदार होतात. दोन ते तीन तोडणीनंतर नवीन लागलेल्या फुलांना फलधारणा होऊन ही फळे चांगली आकार घेऊ लागतात. जास्तीत जास्त दोन महिन्यांपर्यंत चांगल्या प्रकारे ही फळे मिळतात. बऱ्याचदा या कालावधीत मार्केटला माल कमी असतो व त्यामुळे चांगल्या मालाला चांगला दर मिळून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters