जैविक इंधन निर्मिती काळाची गरज

Saturday, 16 June 2018 11:18 AM


जैविक इंधन म्हणजे वनस्पतीजन्य तेलापासून तयार केलेले इंधन, त्यासाठी खाद्य आणि अखाद्य तेलाच्या वनस्पतींचा वापर होऊ शकतो. भारतासारख्या विकसनशील देशात खाद्य तेलाची टंचाई असतांना त्याचा वापर आपण जैविक इंधन निर्मितीसाठी करू शकत नाही. यास्तव अखाद्य तेलबिया वृक्षांचा जैविक इंधन निर्मितीसाठी पर्याय आपणापुढे आहे. आपल्याकडील हवामानाचा विचार केला तर जट्रोफा (वनएरंड), करंज, कडुनिंब, सिमारुबा (लक्ष्मीतरु) आणि जोजोबा इ. वृक्षांची जैविक इंधन अर्थात बायोडिझेलसाठी लागवड योग्य ठरू शकते.

जैविक इंधनासाठी लागवड करता येणारे वृक्ष:

अ. नं

वृक्षाचे नाव

लागवडीचे अंतर (मी)

बियांतील तेलाचे प्रमाण %

बियाणे सुरु होण्याचा कालावधी (वर्ष)

वृक्षाचे आयुर्मान

करंज 

५x५ हलकी
६x६ भारी 

२७-३९%

५-७

९०-१००

जोजोबा

४x१
४x२

४५-५५%

५-६

१००

निम

५x५

२०%

१००

सिमारुबा

५x४

५५%

५-६

४०-५०

वनएरंड/जट्रोफा

२x२ हलकी
३x३ भारी

३१-३५%

३-४

४०-५०


शेतकरी स्वत: बायोडिझेलची निर्मिती करून साठा करून ठेऊ शकतो. घरगुती उत्पादीत बायोडिझेलचा उपयोग डिझेलवर चालणारे विद्युत निर्मिती यंत्र, सिंचनाकरता वापरण्यात येणारे डीझेल पंप तसेच शेतकऱ्याच्या शेतावर वापरण्यात येणारी यंत्रे जसे, थ्रेशर, ट्रक्टर, ट्रक इ. करिता करू शकतो. ऊर्जानिर्मितीत कोणावरही विसंबून न राहता स्वयंपूर्ण होणे शक्य आहे. आजपर्यंत झालेल्या प्रयोगांती असे सिद्द झाले आहे की, पाच ते दहा टक्के जैविक इंधन डीझेलमध्ये मिसळले तर ते पूर्णतः सुरक्षित आहे. जैविक इंधन आणि पेट्रोल डिझेलची तुलना केली तर जैविक इंधनामुळे होणारे वातावरणातील प्रदूषण अगदी नगण्य आहे. जैविक इंधनाची सध्याची गरज व होणारा पुरवठा यामध्ये  मोठ्या प्रमाणात तफावत आहे. त्यासाठी आपणास आयात करण्यावरच भर द्यावा लागतो.

आपण सर्वसाधारणपणे ७०% खनिज इंधन आयात करतो. त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे वनस्पतीजन्य जैविक इंधन निर्मिती करणे होय. जैविक इंधन आपण पुन्हा पुन्हा तयार करू शकतो. इंधनाच्या खर्चात काटकसर करू शकतो. व पडीक जमिनीवर तेलबिया वृक्षांची लागवड करून ग्रामीण भागातील जनतेस रोजगार निर्मिती व पर्यायाने कृषी अर्थव्यवस्था बळकट करू शकतो. ट्रान्सइस्टरिफिकेशन पद्धतीने कोणत्याही वनस्पतीजन्य तेलापासून बायोडिझेल तयार करता येते. आपल्या देशात खाद्य तेलाचा तुटवडा असल्यामुळे अखाद्य तेलबिया वृक्षाची पडीक जमिनीत लागवड करून त्यापासून मिळणाऱ्या तेलापासून बायोडिझेल उत्पादनास फार मोठा वाव आहे. तसेच अखाद्य तेलबिया, वनएरंड, करंज, निम, जोजोबा, सिमारुबा इ. यांसारख्या झाडांची आपल्या पडीक जमिनीवर लागवड करून शेतकरी त्यापासून स्वतः पुरते बायोडिझेल स्वतः करू शकतो. महाराष्ट्रासारख्या कोरडवाहू प्रदेशातील पडीक जमिनीवर जर वनएरंड व करंज यांसारख्या कमी पाण्यावर जगणाऱ्या झाडांची शास्त्रीय पद्धतीने लागवड केल्यास भविष्यात जैविक इंधन निर्मितीला चालना मिळू शकते आणि सध्याच्या इंधन टंचाईवर मात करता येऊ शकेल.

बायोडिझेल तयार करण्याची सर्वसाधारण पद्धत


बायोडिझेलचे फायदे:

 • शहरी तसेच ग्रामीण भागासाठी अपारंपरिक उर्जास्त्रोत.
 • कोणत्याही तेलापासून बनवता येते.
 • तयार करण्याची अत्यंत सरळ साधी सोपी कमी खर्चाची व घरगुती पद्धत.
 • बायोडीझेलमध्ये १० ते ११ टक्के प्राणवायू असतो. त्यामुळे ते १०० टक्के ज्वलनशील असते.
 • बायोडिझेलचा सीटेन नंबर ५१-६२ च्या वर असल्याने त्वरीत पेटते व जास्त दिवस साठून ठेवता येते.
 • बायोडिझेल दुर्गंध विरहीत असते.
 • बायोडिझेल जळाल्यानंतर अत्यंत कमी व पांढरा धुर निघतो. या धुरात कार्बन डायऑक्साइड व गंधकाचे प्रमाण नगण्य असते. पर्यायाने कमी प्रदूषण होते.
 • बायोडिझेल हाताळण्यास व वापरण्यास अत्यंत सोपे आहे.

सामाजिक फायदे:

 • ग्रामीण भागाचा विकास, ग्रामीण उद्योग व स्वयंरोजगारास संधी.
 • पडीक व कोरडवाहू जमिनीचा उत्पादनासाठी उपयोग.
 • डिझेलला पर्यायी उपाय.
 • पर्यावरणाच्या प्रदूषणास आळा बसतो.

लेखक:
प्रा. स्मिता सुभाष प्रचंड व प्रा. श्वेता बी. सातपुते
(म.वि.प्र. समाज कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक)

biodiesel करंज karanj Jatropha जट्रोफा एरंड कडुनिंब neem सिमारुबा Simaruba Oild seeds तेलबिया

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2019 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.