सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक आहेत जिवाणू खते; , जाणून घ्या त्याचे प्रकार अन् वापरण्याची पद्धत

23 June 2020 06:15 PM


गेल्या काही दिवसांपासून ग्राहक अन्नपदार्थांविषयी जागृक झाले आहेत. ग्राहक आता रासायनिक औषधे आणि रासायनिक खते वापरु न पिकवलेला भाजीपाला  घेत नाहीत. ग्राहकांमध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यात आलेला भाजीपाला, फळे हवे आहेत. सध्याच्या दिवसात तर प्रत्येकांचा ओढा हा जैविक शेतीकडे आहे.  परंतु ही शेती कशी करावी?  या शेतीसाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याची माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना नाही. याचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.  सेंद्रिय शेतीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शेतीत वापरले जाणारी खते. 

' जैविक खत ' म्हणजे उपयुक्त अशा जिवंत किंवा सुप्त अवस्थेमधील जिवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये केलेलं मिश्रण होय. जिवाणू खतामुळे नत्र स्थिरीकरण, स्फुरद विघटन, वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचा भरपूर पुरवठा होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

जिवाणू खतांचे प्रकार-

* नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू-

) रायझोबियम जिवाणू-  या जिवाणूंचे कार्य सहजीवी पद्ध्तीने होते. हे जिवाणू हवेतील नत्र द्विदल पिकाच्या मुळाच्या गाठीमध्ये स्थिर करतात, पिकाला नत्राची तर जीवाणुला अन्नाची गरज असून ती एकमेकांच्या देवाणघेवानीने होत असल्याकारणाने या जीवाणुला सहजीवी जिवाणू असे म्हणतात.  हे जिवाणू पिकांच्या मुळांवर गाठी तयार करून हवेतील नत्र शोषून घेतात व तो अमोनियाच्या स्वरूपात पिकांना पुरवतात.

रायझोबियम जिवाणू कार्यक्षमतेच्या दृष्टीने वेगवेगळे सात गटांत विभाजन केले आहे.

 

गट

जिवाणू

पिके

१) चवळी गट

रायझोबियम सायसरी

चवळी, भुईमूग, तूर, मटकी, उडीद, मूग, गावर, ताग, धैंचा इ.

२) सोयाबीन गट

रायझोबियम/ब्रॅडीरायझोबियम जपोनिकम

सोयाबीन

३) हरभरा गट

रायझोबियम सायसरी

हरभरा

४) वाटाणा गट

रायझोबियम लेगुमिनोसेरम

वाटाणा

५) घेवडा गट

रायझोबियम फॅसीओली

सर्व प्रकारचा घेवडा

६) अल्फा-अल्फा गट

रायझोबियम मेलिलोटी

ल्युसर्ण, मेथी

७) बरसीम गट

रायझोबियम ट्रायफोली

बरसीम

 

वरील दर्शविलेल्या विभाजनाप्रमाणे जिवाणू पिकांना वापरणे व यांची खात्री करून घेणे हे उपयुक्ततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.

प्रमाण-  बीज प्रक्रियेसाठी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे

शेणखताद्वारे- ४ किलो प्रति एकर.

 

) ॅझोटोबॅक्टर-   हे जिवाणू पिकांच्या मुळावर गाठी न बनवता मुळाभोवती राहून असहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करतात.  तसेच हे जिवाणू बीजांकुरण व पीक वाढीसाठी उपयुक्त अशा काही रसायनांचा स्त्राव तयार करून प्रति हेक्टरी १५ ते २० किलो नत्र पुरवितात. त्यामुळे उत्पादनात १० ते २५ टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. या जिवाणूंचा उपयोग एकदल व तृणधान्य पिके उदा. ज्वारी, मका, भात, गहू, ऊस, कपाशी, भाजीपाला, फळझाडे , फुलझाडे, हळद ,आले इत्यादीं साठी केला जातो.

प्रमाण-  बीजप्रक्रियासाठी- २५ ग्रॅम प्रति १० किलो बियाणे

शेणखताद्वारे- ४ किलो प्रति एकर.

) ॅझोस्पिरिलम-  हे जिवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जिवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल,  अशा स्वरूपात स्थिर करतात. या जिवाणूची शिफारस एकदल तृणधान्य जसे की, गहू, मका, बाजरी, ज्वारी या पिकांसाठी केली जाते. सर्वसाधारणपणे ही जिवाणू प्रति हेक्टरी २०ते ४० किलो नत्र स्थिर करतात व उत्पादनात १५ ते २० टक्क्यांनी वाढ घडवून आणतात.

प्रमाण-   बीजप्रक्रिया- २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे

शेणखताद्वारे- ४ किलो प्रति एकर

) ॅसेटोबॅक्टर -  हे जिवाणू आंतरप्रवाही असल्याने स्थिर केलेल्या नत्राचा पिक वाढीमध्ये सर्वाधिक वापर होतो.  अ‍ॅसेटोबॅक्टर जिवाणू शर्करायुक्त पिके जसे, ऊस, रताळी, बटाटा इत्यादींच्या मुळांमध्ये प्रवेश करून नत्राचे स्थिरीकरण करतात.  ऊस पिकास ४०-५० टक्के नत्राचा पुरवठा होऊन १० ते २० टक्के उत्पादनात वाढ होते.

प्रमाण-  बेणे प्रक्रिया- २ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात बेणे १०-१५ मिनिटे बुडवून ठेवावे व त्यांनतर लागवड करून पाणी द्यावे.

) मायकोरायझा-  ही एक उपयुक्त बुरशी आहे. ही बुरशी पिकांच्या मुळावर व मुळांमध्ये वाढते. ही बुरशी झाडाच्या विस्तारित वाढणाऱ्या मुळांसारखे काम करते, त्यामुळे पिकाला अधिक क्षेत्रातुन पाणी व अन्नद्रव्ये उपलबद्ध होतात.  ते मातीतील रोगाकरकांना आणि काही सुत्रकृमींना झाडाच्या मुळामध्ये प्रवेश करू देत नाही. मायकोरायझा प्रामुख्याने स्फुरद तर  इतर पालाश, नत्र, कॅल्शिअम,सोडियम, जस्त आणि तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास पिकांना मदत करतात. मायकोरायझा जैविक खताच्या वापराने उत्पादनात २२-२५ टक्के वाढ आढळून येतो व ही बुरशी फळझाडे व भाजीपाला सारख्या पिकांना उपयुक्त आहे.

प्रमाण- वाफ्यावरील सरीमध्ये व्ही.ए. मायकोरायझा जिवाणू खत एकरी २-३ किलो या प्रमाणात टाकावे, त्यानंतर बीज पेरून लगेच पाणी द्यावे.

) स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी) -  काही जिवाणू मातीतील घट्ट स्वरूपातील स्फुरद विघटन करून त्याचे पाण्यात विद्राव्य स्वरूपात रूपांतर करतात.   हा जमिनीमध्ये बंद  झालेला स्फुरद पिकांना उपलब्ध करून देतात.  परिणामी स्फुरदयुक्त रासायनिक खतांची बचत होऊन उत्पादनात १५-२० टक्क्यांनी वाढ होते.  स्फुरदमुळे जमिनीमध्ये कर्बयुक्त तयार करण्याची प्रक्रिया घडून येते , त्यामुळे पिकाच्या मुळांची जोमदार वाढ होते.  पिक फॉस्फरिक अ‍ॅसिडच्या स्वरूपात स्फुरद घेतात.  काही जिवाणू सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, फ्युमरिक आम्ल यांचे फॉस्फेटच्या द्रवात रूपांतर करून पिकास स्फुरद उपलब्ध करून देतात.

उदा. बॅसिलस, सुडोमोनास इ.हे जिवाणू सोयाबीन, भुईमूग , हरभरा व बटाटा या पिकांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ घडवून आणतात.

प्रमाण- बीजप्रक्रिया- २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे

शेणखताद्वारे- ४ किलो प्रति एकर

) पालाश उपलब्ध करणारी जैविक खते- पालाश हे पिकासाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्य आहे. वनस्पतीच्या पानांची जाडी तसेच खोड आणि  फांद्यांची वाढ तसेच पिकांना बळकट करून त्यांची रोगप्रतिकार शक्ति वाढविण्यास मदत करतो.  महाराष्ट्रातील जमिनिमध्ये पालाश या अन्नद्रव्याची मुबलकता असूनही ते स्थिर स्वरूपात असल्याने पिकांना उपलब्ध होत नाही, तसेच या मूलद्रव्याचे वनस्पतींमध्ये वहन सुद्धा होत नाही.   हे जिवाणू स्थिर स्वरूपातील पालाश पिकाला उपलब्ध करून त्याची वहन क्रियाही सक्रिय करतात.  यामुळे उत्पादनात १०-२५ टक्केपर्यंत वाढ दिसून येते.

उदा. बॅसिलस म्युसिलाजिनस, अॅसिडो थायोबॅसिलस फेरोऑक्सिडंस

प्रमाण-  बीजप्रक्रिया- २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे

शेणखताद्वारे- ४ किलो प्रति एकर

 


जिवाणू
संवर्धने वापरण्याची पद्धत-

१)  सुरुवातीला ५०० मी.ली. गरम पाणी घेऊन त्यात १२५ ग्रॅम गूळ घालून द्रावण तयार करावे.

२)  द्रावण थंड झालं की त्यात १० किलो बियाण्याकरिता २५० ग्रॅम जिवाणू संवर्धन या प्रमाणात घेऊन मिश्रण करावे.

३)  बियाणे स्वच्छ फरशीवर , प्लास्टिक बॅग किंवा ताडपत्रिवर पसरवून त्यावर तयार केलेले संवर्धनाचा मिश्रण शिंपडून बियाण्यास हलक्या हाताने चोळावे

४)  बियाणांस बुरशीनाशकाची प्रक्रियेनंतर नत्र उपलब्ध करून देणारे (अ‍ॅझोटोबॅक्टर किंवा रायझोबियम) + पी. एस. बी यांचे मिश्रण करून बियाणांस लावावे.

५)  बीजप्रक्रिया झाल्यानंतर लगेच बियाणे सावलीत वाळवावे.

६) बीजप्रक्रिया केलेले बियाणे ६ तासाच्या आत पेरणीसाठी वापरावे.

जिवाणू संवर्धन लावताना घ्यावयाची काळजी:

१)  जिवाणू संवर्धन घेते वेळी त्या पाकीटावरील अंतिम तारीख अवश्य बघून घ्यावी, अंतिम तारखे पर्यंत किंवा आधिच त्याचा वापर करावा.

२) पाकीट आणल्या नंतर तो कीटकनाशके, बुरशीनाशके, जंतुनाशके व रासायनिक खतापासून दूर ठेवावे.

३)बीजप्रक्रिया करते वेळी अगोदर बुरशीनाशके लावावीत व त्यानंतर जिवाणू संवर्धन लावावे.

४) जर अगोदर बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केली तर नंतर जिवाणू संवर्धनाची मात्रा दीड पट करावी.

५) जिवाणू  संवर्धने  रासायनिक खता सोबत मिश्रण करून देऊ नये.

६) बीजप्रक्रिया करते वेळी ज्या पिकाचे जिवाणू संवर्धन असेल त्याच पिकाला द्यावे, कारण ते पिकानुसार वेगवेगळे असतात.

७) बीजप्रक्रिया करते वेळी सावलीत करावी व नंतर प्रक्रिया झालेले बियाणे ६ तासाच्या आधीच शेतात पेरणीसाठी वापरवे.

 

जिवाणू खतांसाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा:

* विभाग प्रमुख, वनस्पती रोगशास्त्र विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला.

*प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र, कृषि महाविद्यालय, नागपूर.

संपर्क-

श्री.शरद एस.भुरे (वनस्पती रोगशास्त्र)

तंत्रीकी सहा. मोहरी संशोधन प्रकल्प, कृषि महविद्यालय नागपुर.

मो. 958861981

डॉ.श्रीकांत ब्राम्हणकर

डॉ.संदीप कामडी

 

organic fertilizers fertilizers Organic Farming Organic fertilizers types mikoryza मायकोरायझा अ‍ॅसेटोबॅक्टर जैविक खते जैविक शेती जिवाणू खते रायझोबिअम जिवाणू खत जिवाणू खतांचे प्रकार bio fertiliser
English Summary: bio fertilizers important to organic farming; know the types and apply method

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.