रासायनिक कीटकनाशकांच्या वापरावर विविध कारणाने मर्यादा येत आहेत. अशा वेळी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. त्यात जैविक कीड नियंत्रणाला मोलाचे स्थान आहे. ही पर्यावरणपूरक पद्धत असून, त्यात जिवो जीवस्य जीवनम या नैसर्गिक जीवनचक्राचा डोळसपणे वापर केला जातो. शास्त्रज्ञांनी पिकातील किडीवर उपजीविका करणाऱ्या, किडीचे नैसर्गिक शत्रू (परोपजीवी व परभक्षी कीटक), रोगजंतू घटक (जिवाणू, विषाणू, बुरशी ई.), सूत्रकृमी व वनस्पतिजन्य घटकांची ओळख पटवली आहे. अशा शेतीच्या दृष्टीने मित्र कीटकांची ओळख जाणून घेऊन, त्याचे शेतामध्ये संवर्धन केल्यास जैविक कीड नियंत्रणाला चालना मिळते. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे शक्य होते.
जैविक नियंत्रणातील महत्त्वाचे मित्रकीटक
अ) परोपजीवी कीटक :हे यजमानापेक्षा (नुकसानकारक किडींपेक्षा) आकाराने लहान व चपळ असतात. परोपजीवी कीटकांचा जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी एकच यजमान पुरेसा असतो.
उदा :-कोपिडोसोमा कोहलेरी (अंडी- अळी परोपजीवी मित्रकीटक), ट्रायकोग्रामा (अंडी परोपजीवी मित्रकीटक), अपेंटॅलीस (अळी परोपजीवी मित्रकीटक), चिलोनस ब्लॅकबर्णी ब्रेकॉन ब्रेव्हेकॉर्णीस अळी (बाह्य) परोपजीवी मित्रकीटक इपिरिकॅनिया मेलानोलुका पिल्ले- प्रौढ परोपजीवी मित्रकीटक ब्रॅचिमेरीया निफोनटेडिस एनकार्शिया फॉरमोसा अॅसेरोफॅगस पपई प्लुरोट्रोपीस
ब) परभक्षी कीटक :हे कीटक यजमानापेक्षा (नुकसानकारक किडीपेक्षा) आकाराने मोठे, चपळ व सशक्त असून, ते त्यांच्या आयुष्यक्रमात एकापेक्षा जास्त यजमान किडींना भक्ष बनवतात.
उदा. क्रायसोपर्ला लेडी बर्ड बीटल मायक्रोमस सिरफीड अळी डिफा एफिडीव्होरा परभक्षी कोळी
जैविक कीटकनाशके
परोपजीवी बुरशी/ बुरशी जन्य कीटकनाशके –निसर्गात काही बुरशी आहेत ज्या किडींवर उपजीविका करून व त्या किडींना रोगग्रस्त करून मारतात व किडींचे नियंत्रण करतात, अशा बुरशींना कीटकांवरील परोपजीवी बुरशी व त्यापासून तयार केलेल्या जैविक कीटकनाशकांना बुरशी जन्य कीटकनाशके म्हणतात.बिव्हेरिया बॅसियाना, न्यूमोरीया रिले, मेटारायझियम एनीसोप्ली, व्हर्टीसीलियम लेकॅनी इत्यादी प्रमुख परोपजीवी बुरशी जैविक कीड व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात.
उदा. बिव्हेरिया बुरशी रोगग्रस्त अळी, मेटारायझियम बुरशी रोगग्रस्त अळी व्हर्टीसीलियम बुरशी
सूत्रकृमीनाशक परोपजीवी बुरशी - पॅसिलोमायसीस लीलॅसिनस ही जैविक सूत्रकृमिनाशक बुरशी असून, मुळावरील गाठी करणा-या सूत्रकृमीच्या प्रभावी नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
परोपजीवी विषाणू (विषानुजन्य कीटकनाशके) निसर्गात काही विषाणू आहेत जे किडींवर उपजीविका करून त्या किडींना रोगग्रस्त करून मारतात व किडींचे नियंत्रण करतात, अशा विषाणूला कीटकांवरील परोपजीवी विषाणू व त्यापासून तयार केलेल्या जैविक कीटकनाशकांना विषाणूजन्य कीटकनाशके म्हणतात. घाटेअळीचा विषाणू (HaNPV), लष्करी अळीचा विषाणू (SlNPV), उसावरील खोडकिडीचा ग्रॅनूलिसीस विषाणूसारखे परोपजीवी विषाणू जैविक कीड व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात असून, ते विशिष्ट किडींवरच जगतात.
परोपजीवी जिवाणू (जिवाणूजन्य कीटकनाशके) बुरशी व विषाणूप्रमाणेच काही परोपजीवी जिवाणू असतात, जे किडींवर जगतात, त्यामुळे किडींना रोगग्रस्त होऊन मरतात, अशा जिवाणूला कीटकांवरील परोपजीवी जिवाणू व त्यापासून तयार केलेल्या जैविक कीटकनाशकांना जिवाणूजन्य कीटकनाशके म्हणतात. बॅसीलस थुरिंजीएनसिस, फोटोरॅबडस लुमिनेसन्ससारखे जिवाणू घाटे अळी, लष्करी अळी, फळभाज्यावरील शेंडा व फळ पोखरणारी अळी, कोबीवरील किडी व इतर पतंगवर्गीय किडींच्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता मोठ्या प्रमाणात वापरली जातात.
परोपजीवी सूत्रकृमी (सूत्रकृमीजन्य कीटकनाशके)- निसर्गतःच मातीमध्ये हेट्रोरॅबडीटीस इंडिका, स्टेनरनेमा कार्पोकाप्सीसारखे काही परोपजीवी सूत्रकृमी असतात. हे सूत्रकृमी घाटे अळी, लष्करी अळी, हुमणी अळी व इतर पतंगवर्गीय किडींवर जगतात. त्यामुळे या सूत्रकृमीची जैविक कीटकनाशके तयार करून त्यांचा वापर कीड नियंत्रणामध्ये केला जातो.
लेखक -जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे.
९४०४०७५६२८
Share your comments