1. कृषीपीडिया

मानवावर मधमाशी चे उपकार आणि वैशिष्ठ्ये

मधमाशी स्वत:च्या तसेच पोळ्यात असलेल्या आपल्या परिवाराच्या निर्वाहाकरिता

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
मानवावर मधमाशी चे उपकार आणि वैशिष्ठ्ये

मानवावर मधमाशी चे उपकार आणि वैशिष्ठ्ये

मधमाशी स्वत:च्या तसेच पोळ्यात असलेल्या आपल्या परिवाराच्या निर्वाहाकरिता आजूबाजूच्या झाडांच्या फुलांतून मकरंद आणि परागकण जमा करते. हे करत असतानाच फुलांचे परागीभवन करते मधमाशीची शऱीररचना या कार्यास योग्य अशीच आहे. यासाठी मधमाशीच्या पायांची तिसरी जोडी उपयुक्त ठरते. याठिकाणी परागकण साठविण्याची एक पिशवी आणि फुलांवर सिंचन करण्यासाठी पायांवर विशिष्ट केश रचना दिसून येते. याशिवाय, मुखावाटे प्राशन केलेला फुलांमधील मकरंद तात्पुरता साठविण्यासाठी अन्ननलिकेच्या तोंडाकडील भाग फुगीर झालेला असतो. मकरंद आणि परागकणांचा साठा पोळ्यात होत असल्याने मधमाशीच्या झाडाकडे वारंवार खेपा होतात. यावेळी झाडावरची बहुतेक सर्व फुले त्या धुंडतात. त्यामुळे प्रत्येक फुलाचे परागीभवन होऊन झाडावर फलधारणा होण्याचे प्रमाण वाढते. अशा रीतीने पिक उत्पादनात वाढ होते.

कृषी उत्पादन दुपटीने वाढविण्याचे उद्दिष्ट :

वर्ष २०२२ पर्यंत देशाचे कृषि उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रयन्त सुरू आहेत. पीक उत्पादनात मधमाशी हा घटक समाविष्ट करुन घेतल्यास उत्पादकतेत वाढ हे उदिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. मधमाशी मुळे पीक उत्पादनात सुमारे १५ ते ३५ टक्के वाढ होते आणि हे उत्पादन तुलनेने अधिक पौष्टिक असते. भारतासाठी तर शेतीत मधमाशांचे महत्व अनन्यसाधारण आहे. भारतातील विविध प्रकारची भौगोलिक परिस्थिती तसेच नैसर्गिक झाडेझुडपे आणि विविध हंगामी पिके याव्दारे अक्षयपणे मिळत राहणारा फुलोरा, समृध्द साधनसंपत्ती यांचा आधुनिक शास्त्रीय पध्दतीने योग्य उपयोग करुन मधमाशांचे संवर्धन करणे आणि त्यायोगे देशाचे कृषि उत्पन्न दुप्पट करणे शक्य आहे.

मधमाशांच्या प्रजाती व संगोपन

भारतात प्रामुख्याने चार प्रकारच्या मधमाशा आढळतात. यामध्ये आगेमोहळ, विदेशी सातपुडा, देशी सातपुडा आणि फुलोरी मधमाशा यांचा समावेश आहे. देशी - विदेशी सातपुडा मधमाशांचे संगोपन लाकडी पेट्यांद्वारे केल्या जाते. या मधमाशांपासून मिळणारे मध आणि मेण व्यावसायिक दृष्टीकोणातून घेतल्या जाते. त्यामुळे याचा विविध ठिकाणी उपयोग होतो. त्यामुळे दिवसेंदिवस मधुमक्षिका पालन वाढत आहे. आगे मोहळ आणि फुलोरी मधमाशा ह्या चावतात. त्यामुळे त्यांना पारंपारिक पद्धतीने किंवा विध्वंसक पद्धतीने हाताळून मध वेगळे केले जाते. मात्र, यामध्ये मधमाशांसह घरट्यांचे देखील नुकसान होते. याकरिता आदिवासी बांधवांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. जंगलात उत्पादीत होणारा मध १०० टक्के शुद्ध तसेच औषधीय गुणांनी

परिपूर्ण आढळून येतो. कारण, यामध्ये जंगलातील आवळा, बेहडा, करंज, कडूलिंब, पळस, काटेसावर, आंजन, जोतपुडा, कुकुरांजी, जांभूळ, निलगीरी, निरगुडी आदी नानाविध जंगली वनस्पतींचे औषधी तत्व सामावलेले असतात. त्यामुळे जंगलातील मधाची गुणवत्ता उच्च कोटीची असते. निसर्गतः मध अ‍ॅन्टी बॅक्टेरियल, अ‍ॅन्टी बायोटिक, अ‍ॅन्टी व्हायरल या गुणांनी युक्त असतो. त्यामुळे मधाचे सेवन रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी फार लाभकारी आहे.

संघटीत उद्योगाकडे मधमाशीपालननाची वाटचाल :

पुरातन काळापासून जरी भारतात मधाचे उत्पादन होत असले, तरी त्याचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास अलीकडील काळापर्यंत झालेला नव्हता. त्यामानाने पाश्चिमात्य देशांत या क्षेत्रात खूपच प्रगती झाली. याचे समालोचन अगोदर केलेच आहे. भारतात १८८२ साली बंगाल आणि १८८३ साली पंजाब राज्यात प्रथम या विषयाकडे विशेष लक्ष दिले गेले. याठिकाणी मधमाशी संगोपनाच्या पाश्चिमात्य देशांतील काही पध्दती अंमलात आणल्या गेल्या. नंतर सन १९०७ मध्ये पुसा-नवी दिल्ली येथील कृषी संशोधन संस्थेत हे कार्य हाती घेण्यात आले. दक्षिण भारतात रेव्हरंड न्यूटन यांनी या क्षेत्रात काम केले. 

त्यापरिणामी १९१७ साली त्रावणकोर आणि १९२५ साली म्हैसूर येथे मधमाशीपालन केंद्रे स्थापन झालीत. सन १९२८ साली कृषिविषयक रॉयल कमिशनच्या शिफारशीनुसार कुटिरोद्योगास चालना मिळाली. यामुळे १९३१ मध्ये मद्रास, १९३३ मध्ये पंजाब, १९३४ मध्ये कूर्ग आणि १९३८ मध्ये उत्तर प्रदेश या प्रांतात पुष्कळ ठिकाणी मधमाशीपालन केंद्रांची स्थापना करण्यात आली. ऑल इंडिया बी-किपर्स असोसिएशन ही अखिल भारतीय स्तरावरील संस्थाही १९३८-३९ साली स्थापण्यात आली. या संस्थेतर्फे इंडियन बी जर्नल हे नियतकालिक प्रसिध्द करण्यात येते. १९४५ साली पंजाबात १९५९ साली कोईमतूर (मद्रास) येथे मध्यवर्ती मधमाशीपालन संशोधन संस्था स्थापण्यात आल्या. महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे हे संशोधन केंद्र १९५२ साली सुरू झाले. १९५२-५३ साली अखिल भारतीय खादी ग्रामउद्योग मंडळ स्थापन झाले. सन १९५६ साली या मंडळाचे रूपांतर खादी ग्रामोद्योग आयोगात झाले. या आयोगाने पुणे येथे सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूट १९६२ साली स्थापन केली. भारतातील काही विद्यापीठे, कृषी विद्यापीठे, शासकीय संस्था इ. ठिकाणी निरनिराळ्या स्तरांवर मधमाशी पालनासंबंधीचे शिक्षणक्रम सुरू आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्थेनेही या क्षेत्रातील काही समन्वयी प्रकल्पांना मान्यता आणि अनुदान देऊन या क्षेत्राच्या विकासास गती आणली आहे. भारतीय मानक संस्था आणि दर्जा तथा विशुध्दता दर्शक ‘अँगमार्क’ हे चिन्ह देणारी यंत्रणा यांचेही सहकार्य या प्रकल्पांना लाभले आहे. भारतात खादी ग्रामोद्योग आयोगाने या क्षेत्रात पुढाकार घेऊन बरेच कार्य केले आहे. या सर्व प्रयत्‍नांमुळे मधमाशी पालन उद्योगास संघटित स्वरूप प्राप्त झाले.

मध उत्पादनात देशातील अग्रेसर राज्ये:

ताज्या अहवालानुसार भारतातील मधोत्पादनात प. बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, कर्नाटक, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या प्रमुख राज्यांपाठोपाठ तामिळनाडू आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. उपलब्ध आकडेवारीवरून असे आढळते की, भारतात ५ कोटी हेक्टर जमीन मधमाशीपालनास योग्य तसेच परागीभवनामुळे फळपिकांना उपयुक्त अशी आहे. एवढ्या जमिनीवर मधमाशीच्या कमीत कमी १ कोटी वसाहती सहज जोपासता येतील. हा आकडा जगात सध्या असलेल्या वसाहतींच्या पावपट आहे.

मधमाश्यांची संख्या घटते आहे !!!

सद्य:स्थितीत मधमाशी किटकांची संख्या मोठ्या वेगाने घटत असल्याचे दिसून येत असून साहजिकच त्याचा पिकांच्या उत्पादन वाढीवरही परिणाम झाला आहे. रासायनिक किडनाशकांचा अनिर्बंध वापर, जागतिक तापमान वाढ, कमी होत असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच सातत्याने होत असलेली जंगलतोड ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. सध्या कृषी क्षेत्रात प्रचलीत होत असलेली एकपीक पद्धती मधमाशांसाठी मारक ठरत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बहुपीक पद्धती अवलंबिल्यास निश्‍चितच उत्पादन वाढून मधमाशांच्या संवर्धनाच्या दृष्टीने देखील पोषक वातावरण तयार होईल.

मधमाशांच्या संवर्धनाकरिता उपाय :

मधमाशांच्या संवर्धनाच्या दृष्टीने व्यक्तिगत स्तरावर काही उपाय करणे सहज शक्य आहे. त्यामध्ये

1. घराच्या अंगणातील परसबागेत मधमाशांना प्रिय असलेली फुलझाडे लावणे,

2. रस्त्यांच्या कडेला तसेच टेकड्यांवर मधमाशांना खाद्य पुरवणाऱ्या वृक्षांची लागवड करणे,

3. उन्हाळ्यात घरातील गच्चीवर किंवा घरातील अंगणात मधमाशांकरता पाणी ठेवणे,

4. उन्हाळ्यात निसर्गामध्ये फुलांचा बहर कमी होतो, अशा वेळी मधमाशांना खाद्यान्नाचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने साखरेचा पाक, आंब्याच्या चोखलेल्या कोयी सावलीत ठेवाव्यात.

5. जंगलातील मध गोळा करणाऱ्यानी मधमाशांना जिवंतपणे न मारता अथवा इजा न पोहोचविता मध काढण्याच्या शास्त्रीय तंत्राचा वापर करावा

6. सामाजिक स्तरावर किटकनाशक विरहीत शेतीतंत्राचा वापर वाढवणे गरजेचे आहे. पिक फुलोऱ्यावर असतांना किटकनाशकांचा वापर करणे टाळावे.

अंगणातील किंवा गच्चीवरील बागेत मधमाशांनी पोळे केले असेल तर तुमच्या बागेसाठी ही नक्कीच उपयोगी बाब आहे. अशा वेळी घाबरून न जाता मधमाशा घरात येऊ नयेत म्हणून तुम्ही दारे-खिडक्यांना बारीक जाळी बसवू शकता.

आपणा सर्वांवर मधमाशांचे फार मोठे उपकार:

मानवाला समुहाने राहण्याची आणि सहजीवनाची प्रेरणा देणाऱ्या मधमाशीला ‘सामाजिक किटक’ म्हटले जाते. मानवी जीवनातील मधमाशीचे महत्व सर्वांपर्यंत पोहचवून मधमाशीचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे तसेच मधमाशी या किटकाप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी हा जागतिक मधमाशी दिन साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश आहे. मानवाची स्वार्थी वृत्ती तसेच जगण्यासाठी निसर्गाला ओरबाडण्याच्या प्रवृत्ती मुळे मधासारखे अमृत निर्माण करणाऱ्या या किटकाचे पृथ्वी वरील अस्तित्वच धोक्यात आले आहे. शेकडो फळे-फुले आणि वन्य झाडांचे परागीभवन मधमाशीवर अवलंबून आहे. एका पाहणीतील निष्कर्षानुसार २२ प्रकारची फळझाडे आणि ३३ प्रकारची अन्नधान्ये निर्माण करणारी पिके मधमाश्याच्या मदतीशिवाय अन्न उत्पादन करूच शकत नाहीत किंवा ते अत्यल्प प्रमाणात होते. माणसाला अन्न वनस्पतीपासून मिळत असले तरीही त्यात मधमाशांची भुमिका अनन्यसाधारण आहे. म्हणूनच आपल्या सर्वांवर मधमाशांचे फार मोठे उपकार असून समस्त मानव प्रजातीचे पृथ्वीवरील अस्तित्व ह्या छोट्याशा कीटकाच्या जगण्याशी निगडीत आहे. आजच्या जागतिक मधमाशी दिनाचा हा संदेश त्यामुळेच सर्वदूर पोहोचला पाहिजे.

 

मधमाशी जगेल तरच - माणूस जगेल.

प्रा. डॉ. उपेंद्र शरदचंद्र कुलकर्णी

सहयोगी प्राध्यापक (किटकशास्त्र)

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

uskulkarni@pdkv.ac.in

English Summary: Benefits and characteristics of bees on humans Published on: 13 May 2022, 11:26 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters