समुद्रातील मोठ्या माशांबद्दल कायम आपल्याला आकर्षन असते. व्हेल म्हणजेच देवमासा यातीलच एक !या माशाची उलटीला सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत मिळते. याला वैज्ञानिक भाषेत ‘एम्बर्ग्रिस’ असे म्हंटले जात असून व्हेलच्या उलटीला समुद्रातील सोने म्हणून ओळखले जाते. यामुळेच याची तस्करी होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात देखील या माशाला भरपुर मागणी
नुकतेच वनविभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कोल्हापूरमध्ये सापळा रचून अमूल्य किंमतीची ‘एम्बर्ग्रिस’ व इतर मुद्देमाल जप्त केला.
वन्यजीव किंवा इतर नैसर्गिक संसाधनांच्या तस्करी याआधी होतच होत्या परंतु आता सागरी जीवांच्या तस्करीच्या घटनांमध्ये देखील वाढ झालेली आहे. यामध्ये सुकवलेले समुद्री घोडे, प्रवाळ, सी-फॅन, शार्क माश्यांचे पंख आणि व्हेल माश्यांच्या उलटीचा समावेश आहे. याशिवाय शार्क लिव्हर ऑईल हे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने याची देखील तस्करी केली जाते.
सामान्यपणे उलटी म्हणजे आपल्याला दुर्गंधी वाटते परंतु आश्चर्य म्हणजे व्हेल माशाची उलटी सुगंधी अत्तर तयार करण्यासाठी वापरली जाते.
एम्बर्ग्रिस हा एक ज्वलनशील पदार्थ असून त्याचा रंग काळा, पांढरा आणि राखाडी असा असतो. याचा हवेबरोबर संपर्क वाढत गेला की सुगंध वाढत जातो. म्हणून अत्तर तयार करण्यासाठी ‘एम्बर्ग्रिस’ वापरतात. हे दुर्मिळ असल्याने याची किंमत जास्त आहे.
एम्बर्ग्रिस हे दुर्मिळ असून आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) याची किंमत कोट्यवधी रुपये असू शकते. याची किंमत ऐकून तस्करीचे प्रमाण वाढू शकते म्हणून वनखात्याने आजपर्यंत ‘एम्बर्ग्रिस’ ची किंमत जाहीर केली नाही. एम्बर्ग्रिस’ला अरब देशांमध्ये मोठी मागणी असून गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळमधून ‘एम्बर्ग्रिस’ची तस्करी केली जाते.
महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सागरी परिक्षेत्रात व्हेल म्हणजेच देवमाशाच्या ‘ब्लू व्हेल’, ‘बृडस् व्हेल’, ‘हम्पबॅक व्हेल’, ‘स्पर्म व्हेल’, ‘ड्वार्फ स्पर्म व्हेल’, ‘कुविअरस् बिक्ड व्हेल’ या प्रजातींचा अधिवास आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत १९८६ सालापासून ‘स्पर्म व्हेल’ला संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे त्याची शिकार करणे, वा त्याच्या कोणत्याही शारीरिक अवयवाची वा घटकाची तस्करी किंवा खरेदी-विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. अशी तस्करी आढल्यास वन्यजीव विभागा अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाते.
Share your comments