यावर्षी सुरुवातीच्या काळात थंडी उशिरा सुरु झाली व मध्येच तापमान एकदम वाढून पुन्हा थंडी पडली. या वातावरणामुळे आंबा झाडांना पुन्हा पुन्हा मोहर आला. तसेच सद्यःस्थितीमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये हवामान ढगाळ आहे. काही भागात पाऊस होण्याची शक्यताही आहे. अशा वातावरणात विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव आंब्यावर झालेला निदर्शनास येत आहे. पुर्नमोहर व किड-रोगांमुळे आंबा फळांची गळ वाढण्याची शक्यता खूप प्रमाणात वाढत असते. अश्या परिस्थितीमध्ये फळगळीच्या विविध कारणांचा अभ्यास करून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
आंबा बागेत एकाच जातीची झाडे लावल्यास ४० – ५० टक्के संयुक्त फुलांचे परागीकरण होत नाही. परिणामी त्यांचे फक्त अंडाशय वाढून गळ होते. त्यामुळे आंबा बाग लावताना १० टक्के इतर जातीची झाडे लावणे महत्त्वाचे ठरते.
संप्रेरकांचा वापर
ज्या बागांमध्ये नुकतीच फळधारणा सुरू झाली आहे तेथे ताबडतोब ५० पीपीएम (५० मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) जिब्रेलिक अॅसिडची फवारणी केल्यास फळगळ रोखण्यास मदत मिळणार आहे.
अन्नद्रव्ये व्यवस्थापन
बहुतांश आंबा झाडांची फळगळ ही अन्नद्रव्यांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे होते. अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात फळांची गळ होते. ही फळगळ रोखण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट १ टक्का (१० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. तसेच फळांच्या विविध अवस्थेत युरिया २ टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) अधिक एन ए ए २० पीपीएम (२० मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) याची १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
बऱ्याच आंबा झाडांना सुरवातीच्या अवस्थेत आवश्यकतेपेक्षा जास्त फळधारणा होत असते. सर्व फळांना पोसण्याची क्षमता झाडामध्ये नसते. त्यामुळेही फळगळ होताना दिसते. फळे पोसण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी युरिया २ टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी.
काही बागांतील आंबा झाडांवर बोर, लिंब एवढ्या आकाराची फळे व मोहर तसेच नवीन पालवी तिन्ही एकाचवेळी दिसत आहे. नवीन पालवी अन्नद्रव्य ओढून घेत असल्यामुळेही फळांच्या पोषणासाठी अन्नद्रव्य कमी पडून फळगळ होत आहे. अशावेळी होणारी फळगळ रोखण्यासाठी १२:६१:० या विद्राव्य खताची २ टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी.
सिंचन पाण्याचा वापर
आंबा फळांची वाढ होण्यासाठी व फळगळती थांबविण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. वाढीच्या काळात पाणी न मिळाल्याने फळांची मोठ्या प्रमाणात गळ होत असते. त्यामुळे आंबा फळे वाटाणा आकाराची झाल्यानंतर दर दहा दिवसांच्या अंतराने तापमानवाढीचा अंदाज घेऊन पाणीपुरवठा करावा. जेणेकरून फळगळ थांबणे सोईचे होईल.
काही वेळा तापमानात अचानक वाढ झाल्यास फळांची मोठ्या प्रमाणात गळ होत असते. अशावेळी मोठी फळेदेखील गळून पडतात. अशावेळी त्वरित संरक्षित सिंचन करावे. त्यामुळे बागेतील तापमान कमी होऊन फळगळ थांबविणे शक्य होते.
रासायनिक औषधांचा वापर
मागील आठवड्यात राज्यातील काही भागात रिमझिम पाऊस झालेला आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. यामुळे मोठ्या प्रमाणात भुरी व करपा या बुरशीजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेदेखील फळगळ होऊ शकते. अशावेळी भुरी व करपा या रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी.
रासायनिक नियंत्रण –
करपा रोग : फवारणी प्रतिलिटर पाणी
कॅप्टन २ ग्रॅम किंवा
कॉपरऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम किंवा
थायोफिनेट मिथाईल १ ग्रॅम
भुरी रोग : फवारणी प्रतिलिटर पाणी
विद्राव्य गंधक २ ग्रॅम किंवा
डिनोकॅप १ ग्रॅम
गळून पडलेली फळे वेचून बागेबाहेर नेऊन त्यांची विल्हेवाट लावावी जेणेकरून कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळणे सोईचे होईल.
Share your comments