रोगराईशी सामना करण्यासाठी मानवाला कोण खटपट करावी लागते. त्या प्रयत्नांत मधमाश्या, माशांच्या अळ्या आणि प्लाझमोडीयम वाहून नेणारे डास अशा कीटकांचा वापर करून रोगोपचार करण्याचे तंत्र काही ठिकाणी विकसित झाले आहे. विलायती औषधांपेक्षा अशा पारंपरिक औषधांचा वापर मुख्यत्वे आदिवासी समाजात होतो. मधमाशीच्या विषाचा उपयोग दाहनाशक, संधिवातावर रामबाण, एकाधिक स्क्लेरोसिस, जुनाट दुखणी, चेतासंस्थेचे विकार, दमा आणि विविध त्वचारोगांवर होतो. हे विष मधमाशीचा डंख मारून शरीरात घातले जाते, किंवा इंजेक्शनद्वारे शरीरात टोचले जाते. हा उपचार योग्य माहीतगार व्यक्तीच्या उपस्थितीमध्येच केला जातो,
अन्यथा मधमाशीच्या चाव्यामुळे काही व्यक्तींना अॅलर्जीचा तीव्र झटका येऊ शकतो. मधमाशीच्या विषामध्ये अनेक प्रथिने आणि पेप्टाइड्स असून त्यात मेलीटीन नावाचे महत्त्वाचे क्रियाशील संयुग असते.
रेशीम फोनिशिया सेरीकॅटा नावाच्या माशीच्या अळ्या चिघळलेल्या जखमा साफ करण्यासाठी वापरल्या जातात. जखमेच्या खालच्या चांगल्या ऊतींना हानी न पोहोचवता नेक्रोटीक ऊती काढून टाकायचे काम बिनबोभाटपणे या अळ्या करतात. याला ‘मॅगॉट डीब्रिजमेंट थेरपी’ असे म्हणतात. या अळ्या पुवाळलेल्या जखमा, सेल्युलाटीस, गांग्रीन, मॅस्टिडॉयटिस ऑस्टिओमायलेटीस, अल्सर्स, अशा विविध व्याधींवर गुणकारी असतात. या अळ्यांच्या कामगिरीमुळे अवयवच्छेदन करून शरीराचे भाग काढून टाकायची गरज भासत नाही.
ही उपचार पद्धती सोळाव्या शतकापासून वापरात आहे. परंतु त्याचे पुनरुज्जीवन विसाव्या शतकात पुन्हा झाले होते. मात्र प्रतिजैविकांचा शोध लागल्यावर जास्त आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीने या पद्धतीला मागे सारले.
अॅमेझॉनच्या आर्मी मुंग्या आणि आफ्रिकेच्या कार्पेंटर मुंग्या यांचा वापर शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा शिवण्यासाठी केला जात असे. या मुंग्यांचे मॅन्डिबल हे मुखावयव एकमेकांत अडकल्यानंतर इतके घट्ट बंद होतात की मुंग्यांची मुंडकी धडापासून वेगळी केली तरी ती पकड सुटत नाही. आधुनिक शस्त्रक्रिया विशारद असे अघोरी उपाय करत नसले तरी स्थानिक आदिवासी त्यांच्या जखमा बांधून घेण्यासाठी याच मुंग्यांचा वापर करतात.
ज्यावेळी आधुनिक उपचार पद्धतीची वानवा होती तेव्हा ‘सिफीलीस’ सारख्या गुप्तरोगाला आळा घालण्यासाठी शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर नेण्याची पद्धत होती. यासाठी हिवताप निर्माण करणाऱ्या प्लाझमोडीयमची कमी क्षमतेची लागण अशा रुग्णाला केली जात असे आणि त्यासाठी त्याला डासांच्या चाव्याला सामोरे जावे लागत असे. या डासांत असणाऱ्या प्लाझमोडीयममुळे त्या रुग्णाचे तापमान वाढून सिफीलीस जिवाणू नष्ट होतात असे समजले जात असे.
Share your comments